Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian railways: जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची खूशखबर, काय आहे 'खास' घोषणा?

Indian railways: जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची खूशखबर, काय आहे 'खास' घोषणा?

Indian railways: रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं जनरलच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी आता विशेष सेवा सुरू केली आहे. त्यासंदर्भातली घोषणादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा आता प्रवास अधिक चांगला होणार आहे.

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. बसणं दूरच उभं राहायलादेखील अनेक मार्गांवरच्या रेल्वेच्या जनरल डब्यात जागा नसते. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. विशेषत: लांब पल्ल्याचा (Long route) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. अनेक मार्गांवरच्या रेल्वेला जनरलचे कोच (General coach) कमी-जास्त असतात. त्यामुळे कमी जनरल कोच असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय अधिक होते. आता जनरलच्या प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता रेल्वेनं विशेष सेवा सुरू केली आहे. जर तुम्ही सर्वसाधारण बोगीतून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खास घोषणा करण्यात आली आहे. एबीपी लाइव्हनं हे वृत्त दिलं आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पुरेशा सुविधांचा अभाव

जनरलच्या डब्यात आधीच मोठी गर्दी असते. त्यामुळे सुविधा तोकड्या पडतात. अनेक जनरल डब्यांची अवस्था फारशी चांगली नसते. पाण्याची सुविधा नसते. कचरा टाकण्यासाठी तसंच स्वच्छतेचीदेखील योग्य ती काळजी घेण्यात कमतरता जाणवतात. त्या सर्वांचा विचार आता रेल्वेनं काही प्रमाणात केला आहे.

कोणकोणत्या व्यवस्था

भारतीय रेल्वेच्या वतीनं, सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या पुढच्या आणि मागील सामान्य श्रेणीच्या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांचा प्रवास अधिक चांगला व्हावा, यासाठी एक मिशन सुरू करण्यात आलं आहे. सुरुवातीला सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सर्व थांब्यांवर अनारक्षित डब्यांजवळ स्वस्त अन्न, पिण्याचं पाणी आणि वेंडिंग ट्रॉलीच्या उपलब्धतेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑन बोर्ड हाउसकीपिंग

बोर्डवर स्वच्छता आणि पाण्याची उपलब्धता योग्य प्रकारे होण्यासाठी, डब्यांच्या स्वच्छतेसाठी नियमित अंतरानं ऑन-बोर्ड हाउसकीपिंग कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. रेल्वे व्यवस्थापनाला वाटेत पाणी भरणाऱ्या स्थानकांवर अनारक्षित डब्यांच्या टॉयलेटमध्ये पाणी भरण्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे बूथदेखील बसविण्यात येणार आहेत.

रेल्वे बोर्डानं सूचना दिल्या

रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनी या नव्या सुविधेविषयी अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, की उन्हाळा अद्यापही संपलेला नाही. थोडक्यात या परतीच्या उन्हाळ्याच्या गर्मीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात प्रवासी वाहतूकही वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीएस डब्यांमध्ये मूलभूत सेवा मिळत आहेत की नाही, याची खात्री करणं गरजेचं आहे.

सुपरफास्टसाठी स्वतंत्र तिकीट

द हिंदू मधल्या वृत्तानुसार, इंटिग्रल कोच फॅक्टरीमधल्या डिझाइन केलेल्या डब्यांची वहन क्षमता 90 अनारक्षित सामान्य वर्ग कोच आणि 99 लिंके हॉफमन बुश कोचची आहे. विशिष्ट गंतव्य स्थानासाठी अनारक्षित तिकीट असलेले प्रवासी त्या दिशेनं धावणाऱ्या कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. परंतू त्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांची स्वतंत्र तिकिटं घ्यावी लागणार आहेत.

काय म्हणालं रेल्वे बोर्ड?

रेल्वेनं प्रवास करणारे अनेक प्रवासी जनरल म्हणजेच जीएस डब्यातून प्रवास करतात. प्रवाशांना आरक्षित तिकीट भाडं परवडत नाही त्यामुळे ते अनारक्षित बोगीतून प्रवास करतात, असं रेल्वे बोर्डानं म्हटलं आहे. जनरल डब्यात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांचे विशेषत: महिला प्रवाशांचे अधिक हाल होतात. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र अनारक्षित डबे तयार करण्यात आले आहेत. अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाण्यापिण्याच्या आणि इतर मूलभूत गोष्टी पुरवल्या जातील, असं रेल्वे बोर्डानं म्हटलं आहे.