नोकरी करत असलेल्या व्यक्तीला ओव्हरड्राफ्ट लोन (Overdraft loan) मिळू शकतं. सर्व बँका चालू खातं, पगार खातं आणि मुदत ठेवींवर (Fixed deposit) ही सुविधा देत असतात. तुमच्या पगार खात्यावर तुम्ही या सुविधेचा लाभ कसा घेऊ शकता. कसं ते जाणून घेऊ. त्यासाठी पहिल्यांदा ओव्हरड्राफ्ट लोन म्हणजे काय ते समजून घेऊ. ओव्हरड्राफ्ट लोनला ओव्हरड्राफ्ट सुविधा असंही म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या पगार खात्यावर या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेची सर्वात आधी मंजुरी घेणं गरजेचं आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही पगार खात्यातून (Salary account) जास्तीची रक्कम काढू शकता. ही रक्कम किती असावी, हे बँक ठरवते.
Table of contents [Show]
प्रत्येक बँकेचे स्वतःचे नियम
पगाराच्या ओव्हरड्राफ्टबाबत प्रत्येक बँकेचे स्वतःचे नियम असतात. म्हणजेच प्रत्येत बँकेचे नियम वेगवेगळे असू शकतात. काही बँका तुमच्या पगाराच्या दोन ते तीन पट ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात, तर काही बँका फक्त मासिक पगाराच्या 80 ते 90 टक्के रक्कम काढण्याची परवानगी देतात. अशाप्रकारच्या सुविधेला अल्पकालीन कर्ज असंदेखील म्हटलं जातं.
सर्व रेकॉर्ड तपासूनच मंजुरी
पगाराशिवाय एफडी, शेअर्स, विमा पॉलिसी, बाँड्स यांवरदेखील ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. ज्यावर तुम्ही ही सुविधा घेत आहात, तुम्हाला ती बँकेकडे गहाण ठेवावी लागते. ओव्हरड्राफ्ट सुविधेनुसार, पैसे तर दिले जातात. मात्र ते देत असताना तुमचं सर्व रेकॉर्ड तपासलं जातं. त्यनंतरच रक्कम मंजूर केली जाते. यामध्ये तुम्हाला व्याजही भरावं लागतं. समजा तुम्ही वेळेवर रक्कम परत करू शकला नाहीत, तर बँक तुमच्या गहाण ठेवलेल्या वस्तूतून त्याची भरपाई करू शकते.
मुदत ठेवीवर ओव्हरड्राफ्ट लोन
मुदत ठेवीवर तुम्ही ओव्हरड्राफ्ट लोन घेणार असाल तर बँक तुमची एफडी स्वतःकडे गहाण ठेवणार आहे, हे लक्षात घ्यावं. तुम्हाला ओव्हरड्राफ्ट लोनची एका निश्चित कालावधीत परतफेड करावी लागणार आहे. ती करण्यात तुम्हाला अपयश आलं तर बँक तुमच्या एफडीमधून कर्जाची परतफेड करणार आहे. जर ओव्हरड्राफ्टची रक्कम तुम्ही तारण ठेवलेल्या रकमेपेक्षा समजा जास्त असेल, तर तुम्हाला तारण ठेवलेल्या रकमेतून त्याची भरपाई केल्यानंतर उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे. मात्र जर तुमच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नसेल, तर तुम्ही क्रेडिट कार्ड काढण्याच्या स्वरूपात असुरक्षित ओव्हरड्राफ्ट सुविधेचादेखील लाभ घेऊ शकता.
काय आहेत फायदे?
कमी व्याजदर - ओव्हरड्राफ्ट कर्जाचा हा पहिला फायदा आहे. त्याचा व्याजदर क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच कमी असतो.
प्री-पेमेंट शुल्क नाही - या सुविधेनुसार तुम्ही देय तारखेपूर्वी कर्ज फेडलं तर तुम्हाला प्री-पेमेंट शुल्क भरावं लागणार नाही. पर्सनल लोनमध्ये तुम्हाला प्री-पेमेंट चार्ज भरावा लागतो. याशिवाय तुमच्याकडे ओव्हरड्राफ्टची रक्कम आहे त्याच कालावधीसाठी व्याज भरावं लागणार आहे.