Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय? समजून घ्या त्याचे फायदे, तोटे आणि व्याजदर

ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय? समजून घ्या त्याचे फायदे, तोटे आणि व्याजदर

Image Source : www.navi.com

कठीण परिस्थितीत पैशांची गरज लागते तेव्हा ते कोणाकडून मागायचे असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी बॅंकेतून मिळणाऱ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा (Overdraft facility), म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही पैसे काढू शकता, या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता.

ओव्हरड्राफ्ट (Overdraft) ही एक आर्थिक सुविधा आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही त्यातून पैसे काढू शकता, त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. प्रत्येक ग्राहकासाठी ओव्हरड्राफ्टची मर्यादा निश्चित केली जाते. जी बहुतांश तुमचे बँकेशी असलेल्या संबंधांवर अवलंबून असते. ओव्हरड्राफ्ट या सुविधे अंतर्गत ग्राहक ठराविक मर्यादेपर्यंत त्यातून पैसे काढू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ओव्हरड्राफ्ट म्हणून काढलेल्या पैशावर बँक व्याज आकारते.

ओव्हरड्राफ्ट कर्जावरील व्याजदर

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधेवरील व्याज दर हे अर्जदारानुसार बदलतात. कर्जाची रक्कम, परतफेडीचा कालावधी आणि संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेशी बॅंक खातेदाराचे असलेले संबंध यावर बरेचसे अवलंबून असते.

ओव्हरड्राफ्ट खात्याची वैशिष्ट्ये

  1. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ कोणतेही बँक खाते सांभाळून घेता येतो.
  2. अनेक खाजगी बँका, पगार खाते (Salary Account) आणि बचत खातेधारकांनाही (Saving Account) सुविधा देतात.
  3. ओव्हरड्राफ्टची सुविधा ही तुमच्या बॅंक खात्यातील व्यवहाराचे तपशील, पेमेंट रेकॉर्ड किंवा क्रेडिट स्कोअरवर आधारित दिली जाते.
  4. हे बँकेद्वारे दिले जाणारे अल्प-मुदतीचे कर्ज म्हणून ओळखले जाते. याची ठराविक वेळेत परतफेड करणे आवश्यक असते.
  5. ओव्हरड्राफ्टवर व्याज आकारले जाते. ओव्हरड्राफ्ट परतफेडीचा कालावधी बँक निश्चित करते. 
  6. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, चालू खाते (Current Account) आणि रोख क्रेडिट खात्यातून  (Cash Credit Account) प्रत्येक आठवड्याला 50 हजार रूपये ओव्हरड्राफ्ट म्हणून काढू शकतो.

ओव्हरड्राफ्ट सुविधेचे फायदे

  • व्यवसायातील रोख रक्कम व्यवस्थापित करण्यात मदत
  • रोख रकमेची त्वरीत गरज पूर्ण 
  • वापरलेल्या रकमेवरच व्याज दर 
  • अल्प मुदतीचे कर्ज - मर्यादा दरवर्षी बदलते
  • कमी पेपरवर्क
  • बँकांना हमीची गरज नाही
  • लहान भागांमध्ये रोख रकमेचा वापर

ओव्हरड्राफ्टचे सुविधेचे तोटे

  • उच्च व्याज दर
  • फक्त बँक खातेदारांसाठी सुविधा
  • ओव्हड्राफ्टची मर्यादा अर्जदाराच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून
  • अल्प सूचनेवर पैसे काढता येतात
  • व्याजदरातील बदलानुसार व्याज शुल्क बदलते
  • दीर्घकालीन रकमेसाठी योग्य नाही

ओव्हरड्राफ्ट खात्याचे प्रकार

वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्हरड्राफ्ट खात्यांमध्ये भिन्न पात्रता निकष असतात.

पगाराच्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट (Salary Account Overdraft) : कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उघडलेल्या पगाराच्या खात्यांवर ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. फक्त त्या खात्यात प्रत्येक महिन्याला पगार जमा होणे आवश्यक आहे.

बचत खात्यासाठी ओव्हरड्राफ्ट (Saving Account Overdraft) : प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत सुरू केलेल्या खात्यांवर, ज्यात 5 हजार रूपये किंवा मागील महिन्यात जेवढी शिल्लक रक्कम होती. त्याच्या 4 पट रक्कम ओव्हरड्राफ्ट म्हणून घेता येईल. यासाठी ते खाते 6 महिने सतत सुरू असेल पाहिजे. यासाठी कुटुंबातील एकच सदस्य पात्र असून ही सुविधा फक्त कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला, विशेषत: स्त्रीला दिली जाते.

टाइम डिपॉझिटसाठी ओव्हरड्राफ्ट  (Time Deposit Overdraft) : मुदत ठेवींवरही ओव्हरड्राफ्ट घेतला जाऊ शकतो. पण, सर्व बँका ही सुविधा देत नाहीत. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ठेवींवर ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. एसबीआयचे एकल (Single Account), संयुक्त (Joint Account) खातेधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तसेच यासाठी ते इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करू शकतात.