जगभरातील सुमारे 260 दशलक्ष लोक संवादासाठी हिंदी भाषेचा वापर करतात. जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदी भाषा ओळखली जाते.
हिंदीला जनभाषा बनवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठ, भोपाळ येथे हिंदी भाषा प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे. ही देशातील अनोखी हिंदी भाषा प्रयोगशाळा असेल, ज्यामध्ये हिंदी भाषेतील संशोधनासोबतच हिंदी भाषेचे उच्चार कसे करावेत यावर विशेष पद्धतीने काम केले जाणार आहे. ही आगळीवेगळी प्रयोगशाळा या वर्षअखेरीस तयार होईल. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. प्रयोगशाळेसाठी हिंदी व्याकरण आणि उच्चारांशी संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केले जात आहेत. यासोबतच भाषा सहजरीत्या समजावी यासाठी काही प्रारूप बनवले जाणार आहेत. या सुविधेद्वारे हिंदी भाषेची शास्त्रोक्तता, उच्चारातील बारकावे आणि अशा अनेक गोष्टींची माहिती दिली जाईल, जी अनेक वेळा विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमातून शिकूनही माहीत नसते. याशिवाय भारतातील विविध 22 भाषांचे व्याकरण आणि उच्चार पाहता आणि समजून घेता येणार आहेत.
प्रयोगशाळेत बनवल्या जाणाऱ्या ऑडिओ- व्हिडिओ आणि मॉडेल्सचे स्पष्टीकरण देण्यासाठी येथे तज्ञ देखील असतील. जे संशोधकांना भाषेच्या बारकाव्याची माहिती देतील. अशा प्रकारे काम करणारी देशातील ही पहिलीच हिंदी भाषा प्रयोगशाळा असेल, असा विद्यापीठाने दावा केला आहे.
प्रयोगशाळेसाठी 35 लाख रुपयांचा निधी
विद्यापीठातील कार्यकारिणीच्या बैठकीत या हिंदी भाषा प्रयोगशाळेच्या बजेटवरही मंजुरी मिळाली आहे. या प्रयोगशाळेसाठी सुमारे 35 लाख रुपये खर्च येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून भाषा संवर्धनासाठी काम केले जाणार आहे. हिंदी भाषेवर संशोधन करणाऱ्या देशभरातील नागरिकांसाठी ही प्रयोगशाळा खुली असेल असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.