स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीत जगभरातील उद्योजक सामील झाले आहेत. भारतातील अनेक बड्या व्यक्तींनीही या बैठीकीत सहभाग घेतला आहे. जगभरातील गुंतवणूकदार, नेते अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर येथे चर्चा करत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब (klaus schwab) यांनी म्हटले आहे की त्यांनी भारतातील मंत्री आणि तेथील प्रमुख उद्योगपतींची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली, भारतात हवामान बदलाच्या विषयांवर होत असलेले काम कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या आर्थिक मॉडेलची केली प्रशंसा
श्वाब म्हणाले की जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रात भारताच्या योगदानाचे, महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेले आर्थिक मॉडेल आणि सार्वजनिक डिजिटल सुविधांवर भारताने महत्त्वाचे काम केले आहे. जागतिक भौगोलिक-आर्थिक आणि भू-राजकीय संकटाच्या काळात भारत हे औद्योगिक वाढीसाठी अनुकूल असे ठिकाण बनले आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भारतासोबत गेल्या 38 वर्षांचा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत G-20 परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. अशा परिस्थितीत भारताशी औद्योगिक भागीदारी सुरू ठेवण्यास अनेक राष्ट्र उत्सुक आहेत. G-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात भारत जगामध्ये सर्वांसाठी समान आणि न्याय्य विकासाचा प्रचार करत आहे, अशी स्तुती देखील श्वाब यांनी केली. श्वाब पुढे म्हणाले की, भारताचे G-20 अध्यक्षपद एका संवेदनशील वेळी आले आहे. या दुभंगलेल्या जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरते.
यावेळी, टाटा सन्सच्या अध्यक्षांनी,नटराजन चंद्रशेखरन यांनी या बैठकीत सांगितले की, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात आहेत. देशाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी हा एक महत्वाचा घटक आहे. कोरोना महामारीच्या काळात भारताने अतिशय उत्तमरीत्या परिस्थिती हाताळली होती.भारताने कोरोना काळात स्वतःच्या देशी लसीचे उत्पादन भारतातच केले होते. गेल्या काही वर्षांत भारतात डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात झालेला बदल देखील उल्लेखनीय असल्याचे चंद्रशेखरन म्हणाले.