G20 Aurangabad Summit: छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवार (दि. 27 फेब्रुवारी) सकाळपासून G20 मधील शिष्टमंडळाच्या पाहणीला आणि बैठकांना सुरूवात झाली. जी20 च्या शिष्टमंडळाचे सकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानतळावर स्वागत केले. या शिष्टमंडळाचे महाराष्ट्रीयन परंपरेनुसार ढोल-ताशे आणि लेझीमने स्वागत करण्यात आले. हे शिष्टमंडळ दिवसभरात शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या जी20 च्या बैठकीत वुमेन 20 (Women 20) अंतर्गत स्टार्टअप उद्योगातील महिलांचे सक्षमीकरण, महिला नेत्यांसाठी तळागाळापर्यंत सक्षम परिसंस्था तयार करणे आणि महिलांसाठी पूरक असे धोरण तयार करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
Women 20 अंतर्गत खालील 5 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार
- तळागाळातील महिला नेतृत्वाला संधी
- महिला नवउद्योजकतेवर भर
- डिजिटल लैंगिक भेदभाव दूर करणे
- हवामान बदल कार्यक्रमात महिला आणि मुलींचा सहभाग
- शिक्षण आणि कौशल्याद्वारे स्वत:चा करणे
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या डब्ल्यू 20 च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी Women 20 बाबत सांगताना नमूद केले की, प्रत्येक महिला सन्मानाने जगू शकेल, असे समानता आणि समतेने परिपूर्ण जग महिलांसाठी निर्माण करणे, हे भारतात होत असलेल्या W-20 बैठकीचे उद्दिष्ट आहे. महिलांच्या विकासातील अडथळे दूर करून त्यांच्या जीवनात भरभराट यावी. त्यांना दिलखुलासपणे प्रगतीची झेप घेता यावी, यासाठी एक पोषक वातावरण उपलब्ध देणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
वुमेन 20 च्या बैठकीमध्ये जी 20चे सदस्य देश, निमंत्रित देशाचे प्रतिनिधी आणि विशेष निमंत्रित असे सुमारे 150 प्रतिनिधी सहभागी होत आहेत. देश-विदेशातून आलेल्या या प्रतिनिधी येथील स्थानिक पातळीवरील कार्यक्रमात सहभागी झाले. या सदस्यांनी अंगणवाडी कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि विविध स्तरांवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. वुमेन 20 च्या या शिष्टमंडळात इंडोनेशियन शिष्टमंडळाच्या प्रमुख डॉ. फराहदिबा तेनरिलेम्बा, रशियाच्या एलेना मायकोतनीकोवा, दक्षिण कोरियाच्या अँगेला जू युन कांग, दक्षिण आफ्रिकेच्या सिबुलेले पोसवायो आणि जपानच्या साटोको कोनो या संवादात्मक सत्रात सहभागी झाल्या.