Bank Locker: बँक लॉकरमध्ये पैसे ठेवल्यानंतर खातेदार निश्चिंत राहतो, कारण घरामध्ये रोख रक्कम ठेवण्यात जो धोका असतो तो बँक लॉकरमध्ये नसतो. मात्र, बँक लॉकरमध्येही पैसे सुरक्षित नसल्याची एक घटना समोर आलीय. लॉकरमधील पैशांना वाळवी लागल्याने 18 लाख रुपायांच्या नोटा वाळवींनी फस्त केल्या.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यातील अलका पाठक या महिलेने बँक ऑफ बडोदाच्या शाखेत 18 लाख रुपये ठेवले होते. दीड वर्षांपासून ही रक्कम बँक लॉकरमध्ये होती. मुलीच्या लग्नासाठी पैशांसोबतच काही सोन्याचे दागिनेही लॉकरमध्ये ठेवले होते. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी KYC साठी अलका पाठक यांना बोलावल्यानंतर हा प्रकार समोर आला.
वाळवींनी नोटा केल्या फस्त
पाठक यांनी बँक लॉकर उघडल्यानंतर नोटा वाळव्यांनी खाल्ल्याचे लक्षात आले. वाळव्यांनी अनेक नोटा अर्धवट खाऊन टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तत्काळ बँक अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. नोटांची स्थिती पाहून बँक अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. या प्रकरणी आता बँकेकडून चौकशी सुरू आहे. लॉकरमध्ये पैसे ठेवताना कोणती काळजी घेतली नाही, याची माहिती घेतली जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पाठक यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. तसेच त्या खासगी क्लासेसही चालवतात. मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली रक्कम वाळवींनी खाऊन टाकल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या नोटांची भरपाई बँक करून देणार का? हा प्रश्न त्यांना पडला आहे. अद्याप या प्रकरणी चौकशी सुरू आहे. आघाडीच्या माध्यमांनी बँकेशी या प्रकरणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
अशीच एक घटना राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातही घडली. पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 2 लाख रुपये वाळवींनी खाऊन टाकले होते. एका कापडी पिशवीत हे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते. पैसे घरी घेऊन गेल्यावर खातेदाराच्या हे लक्षात आले होते.