आरबीआयनं (Reserve Bank of India) दिलेल्या आदेशानुसार आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणर आहेत. 2016ला नोटाबंदीनंतर 2000ची नोट चलनात आली होती. आता नोटाबंदीच्या निर्णयाचं चक्र पूर्ण झालंय. 2000 रुपयांची नोट तसंही चलनासाठी फारशी कधी लोकप्रिय झाली नाही, असंही चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Table of contents [Show]
'2000 रुपयांची नोट बँड-एड'
नोटाबंदीचा निर्णय हा मूर्खपणाचा होता. तो झाकण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला. आता अपेक्षेप्रमाणं आरबीआयच्या आदेशानंतर सरकारनं 2000 रुपयांची नोट काढून घेतलीय. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आलीय. विनिमयासाठी 2000 रुपयांची नोट फारसं लोकप्रिय माध्यम नव्हतं. हेच आम्ही नोव्हेंबर 2016मध्ये सांगितलं होतं. आता आम्ही बरोबर असल्याचं सिद्ध झालंय. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा या लोकप्रिय आणि विनिमयासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात होत्या. मात्र त्या बंद करण्यात आल्या. त्याऐवजी 2000 रुपयांच्या नोटा आणण्यात आल्या. हा निर्णय मूर्खपणाचा होता. या मूर्खपणाच्या निर्णयावर पांघरूण घालण्यासाठी एक बँड-एड होते, अशी टीका चिदंबरम यांनी केलीय.
As expected, the government/RBI have withdrawn the Rs 2000 note and given time until September 30 to exchange the notes
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 19, 2023
The Rs 2000 note is hardly a popular medium of exchange. We said this in November 2016 and we have been proved correct
The Rs 2000 note was a band-aid to…
1000 रुपयांची नोट परत येणार?'
चिदंबरम पुढे म्हणाले, की 500 रुपयांच्या नोटेप्रमाणंच आता सरकारनं 1000 रुपयांची नवी नोट पुन्हा बाजारात आणली तर आश्चर्य वाटणार नाही. नोटाबंदीच्या काही आठवड्यांनंतर, आरबीआय तसंच सरकारला 500 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्यास भाग पाडण्यात आलं. त्यामुळे आता 1000 रुपयांची नोटही सरकारनं पुन्हा बाजारात आणली तर मला आश्चर्य वाटणार नाही. नोटाबंदीचं एक वर्तुळ यानिमित्तानं पूर्ण झालं, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
काळा पैसा लपवण्यासाठी...
चिदंबरम यांनी सरकारवर याबाबत ताशेरे ओढले. 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश कधीही स्वच्छ नव्हता. शिवाय त्या लोकप्रियही झाल्या नाहीत. 2000ची नोट बहुसंख्य लोकांनी वापरलीच नाही. ती फक्त आपला काळा पैसा ठेवण्यासाठीच लोक वापरत होते, तात्पुरत्या स्वरुपात, असं ते म्हणाले.
Rs 2000 note was never a 'clean' note. It was not used by the vast majority of the people. It was used only by people to keep their black money, temporarily!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 19, 2023
एकावेळी 10 नोटा बदलून मिळणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवार 19 मेला सांगितलं, की बँकांनी तत्काळ प्रभावानं 2000 रुपयांच्या नोटा जारी करणं थांबवावं. ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या असतील त्या लोकांना 30 सप्टेंबरपूर्वी बँकांमधून त्या बदलून घेण्यास सांगण्यात आलंय. 2,000 रुपयांच्या नोटा बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी आरबीआयनं विशिष्ट अशी मर्यादा नमूद केलेली नाही. जास्तीत जास्त 20,000 रुपयांच्या (म्हणजेच 10 नोटा) बदलण्याची परवानगी देण्यात आलीय. 2,000 रुपयांच्या अधिकच्या नोटा इतर वेळी बदलून मिळतील, मात्र एकावेळी दहाच नोटा बदलून मिळणार आहेत.
30 सप्टेंबरनंतर पुढे काय?
आरबीआयच्या आदेशानंतर चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद होतील. 30 सप्टेंबरनंतर सर्व 2000 रुपयांच्या नोटा बेकायदेशीर निविदा बनतील. या नोटा कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापरता येणार नाहीत. म्हणजेच यावर्षीच्या 30 सप्टेंबरनंतर तुम्ही 2000 रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करून वस्तूंची खरेदी करू शकणार नाही किंवा बँकांमध्येदेखील त्या जमा करू शकणार नाहीत. तुम्ही वस्तू खरेदी करण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा आत्ता वापरू शकता किंवा त्या 30 सप्टेंबर 2023पूर्वी बँकांमध्ये जमा करू शकता, असंच आरबीआयच्या आदेशाचा अर्थ आहे.