पतीच्या निधनानंतर काही महिलांना जगणे अवघड होते. त्यांना मानसिक, भावनिक व आर्थिक मदतीची गरज असते. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, मुलांचे पालनपोषण त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र सरकार अशा गरजू व निराधार महिलांसाठी योजना राबवली जात आहे.
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे गरीब विधवा महिलांसाठी निवृत्तीवेतन (Pension) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला 600 रुपये पेन्शन देते. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना राबविली जाते. विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील महिलांना लागू आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत. पात्र लाभार्थी महिलांना केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला 200 रूपये तर राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत 400 रूपये प्रत्येक महिन्याला असे एकूण 600 रूपये प्रत्येक महिन्याला निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. ही रक्कम दरमहा वेळोवेळी अर्जासोबत जोडलेल्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. लाभार्थी महिलेला या योजनेचा अर्ज नजीकच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयात मिळू शकेल. हा अर्ज भरून त्याच कार्यालयात जमा करावा लागेल.
विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी महिला महाराष्ट्रातील किमान 15 वर्ष स्थानिक रहिवासी असावी.
- पात्र उमेदवाराकडे बॅंक खाते असणे आवश्यक आहे.
- विधवा महिलेचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- विधवा महिलेचे वय 40 ते 65 वर्षे असावे.
- पात्र उमेदवार दारिद्र्यरेषेखालील (Below Poverty Line) असावा.
अर्ज करणारी महिला महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, महाराष्ट्र अपंग निवृत्तीवेतन योजना किंवा इतर योजनांची लाभार्थी नसावी. तसेच सदर विधवा महिलेने दुसरे लग्न केले असल्यास ती या योजनेसाठी अपात्र ठरेल.
महत्त्वाची कागदपत्रे
• लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा ओळख प्रमाणपत्र
• वयाचा दाखला
• वार्षिक उत्पन्नाचा दाखला
• जातीचे प्रमाणपत्र
• पासपोर्टसाईज फोटो
• पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
• लाभार्थ्याचा रहिवासी दाखला
• बॅंक खाते पासबुक
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा
1. पेंशन योजनेसाठी अर्ज डाऊनलोड करा.
2. अर्जामध्ये माहिती भरा.
3. त्या सोबत कागदपत्रे जोडा.
4. कागदपत्रे जोडलेला अर्ज तुमच्या जवळच्या संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय / तहसीलदार किंवा कलेक्टर कार्यालयात जमा करा.