आजच्या आधुनिक पण धकाधकीच्या जीवनात आपण अनेक ताणतणावांचा सामना करत असतो. त्यामुळे आरोग्य विमा ही आजच्या काळातील अपरिहार्य गरज आहे. चांगल्या वैद्यकीय विम्यामुळे निदान, उपचार आणि आरोग्य सेवा या परवडणाऱ्या दरात मिळू शकतात. वेगवेगळी औषधे, वैद्यकीय चाचण्या, हॉस्पिटलायझेशन आणि कन्सल्टेशन फी, या सर्व किमतीत सातत्याने वाढ होताना दिसते. अशा वेळी कौटुंबिक विम्याचे दरही वाढणारच. आयुष्याचे वाढते टप्पे, उत्पन्नातील चढ-उतार आणि अटळ महागाई या सर्व पार्श्वभूमीवर दर ३ वर्षांनी कौटुंबिक आरोग्य विम्याच्या गरजांचा आढावा घेणे व त्यात वेळोवेळी उचित बदल करणे योग्य आहे.
सध्याच्या काळात पुरेसे आरोग्य विमा संरक्षण नसेल तर आपल्या बचत निधीवर परिणाम होऊ शकतो.
प्रत्येक वयातील व्यक्तींच्या विशिष्ट वैद्यकीय गरजा असतात. घरात लहान मुलं असतील तर ती खेळताना , बाहेर जाताना पडू-धडपडू शकतात तर मध्यमवयातील व्यक्तींना अपघाताचा धोका असतो. ज्येष्ठ नागरिकांना वयानुसार येणाऱ्या आजारपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुटुंबात जर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकही असतील तर दोन्ही वयोगटासाठी उपयुक्त ठरेल अशा संयुक्त (विमा) प्लॅनची निवड करणे योग्य ठरेल. कधीही फक्त एकाच पॉलिसीवर अवलंबून राहू नका. फॅमिली फ्लोटर प्लॅन, एम्प्लॉयर्स ग्रुप इंश्युरन्स आणि पालकांसाठी प्रत्येकी वेगवेगळ्या (वैयक्तिक) विमा योजनांचा लाभ घ्या.
पालकांसाठी वैयक्तिक विमा योजना खरेदी करा
फॅमिली फ्लोटर योजनेत पालकांना समाविष्ट करणे खर्चिक ठरू शकते. कारण प्रीमियमचा दर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या वयानुसार ठरवण्यात येतो. ज्येष्ठ व्यक्तीने वयाची कमाल मर्यादा गाठल्यास पॉलिसीची मुदत संपते. त्यामुळेच पालकांसाठी प्रत्येकी वेगवेगळी / वैयक्तिक विमा योजना घेणे योग्य ठरते.
60व्या वर्षी, पॉलिसीधारक व्यक्तीला वयानुसार येणाऱ्या किंवा पूर्वीच्या काही आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. अशावेळी वैयक्तिक योजनेंतर्गत, पॉलिसीधारक व्यक्तीस आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीसाठी व्यापक कव्हरेज मिळू शकते. त्यामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयापूर्वी आणि नंतरची काळजी, रुग्णवाहिकेचे शुल्क अशा अनेक बाबींचा समावेश असतो. प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे/वैयक्तिक योजना घेतल्यास गंभीर किंवा पूर्वीपासून असणाऱ्या आजारावरील उपचाराचा जास्तीत जास्त खर्च योजनेत अंतर्भूत असतो.
एम्प्लॉयर्स ग्रुप कव्हर
एम्प्लॉयी बेनिफिट प्रोग्रॅम किफायतशीर विमा योजना आहेत. या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी तसेच तुमच्या कुटुंबियांसाठी परवडेल असे कव्हरेज ऑफर केले जाते. पूर्वीपासूनचे काही आजार असतील किंवा प्रसूतीच्या खर्च असेल, त्यासाठी कॅशलेस क्लेम वाढवला जातो. तसेच यात कोणताही प्रतीक्षा कालावधी नसल्यामुळे हे एम्प्लॉयर्सना परवडणारे कव्हर बनते. तातडीचे वैद्यकीय खर्च आल्यास हे खूप उपयोगी पडते.