Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nandini vs Amul: कर्नाटकात 'अमूल'ला का केला जातोय विरोध? जाणून घ्या सविस्तर

Amul Milk

एक व्यवसाय म्हणून आम्ही बाजारात उतरत आहोत. कुणा प्रतिस्पर्धी कंपनीला नामोहरम करण्यासाठी आम्ही व्यवसाय करत नाही, अशी भूमिका अमूलने मांडली आहे. असं नेमकं काय घडलं की अमूलला असं स्पष्टीकरण द्यावं लागलं? जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात.

सध्या कर्नाटकात अमूल दूध आणि नंदिनी दूध यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. व्यावसायिक चढाओढीचं हे प्रकरण आता राजकीय रंगात देखील न्हाऊन निघालं आहे. देशातील नावाजलेल्या अमूल दूध कंपनीला कर्नाटकात का विरोध केला जातोय हे या लेखात आपण जाणून घेऊयात.

नेमकं घडलं काय? 

मागच्या आठवड्यात अमूलने बेंगळुरूमध्ये दूध आणि दही विक्री व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली. कर्नाटकात अमूल कंपनी औपचारिक प्रवेश करणार असल्याचं जाहीर होताच अमूलला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला गेला. अमूल विरोधात एक ऑनलाईन कॅम्पेन देखील चालवलं गेलं.

कर्नाटकातील जनतेने राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या 'नंदिनी' दूध प्रकल्पाला समर्थन दर्शवलं आणि #GoBackAmul या हॅशटॅगसह ट्विटर, फेसबुकवर मोहीम उघडली. कर्नाटक दूध संघ हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दूध उत्पादक संघ आहे.

हॉटेल्सने देखील अमूलवर टाकला बहिष्कार

या अमूल विरोधी आंदोलनात कर्नाटकातील हॉटेल व्यावसायिकांनी देखील उडी घेतली. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी अमूल दूध आणि त्यांची इतर उत्पादने खरेदी करणार नाही अशी भूमिका घेतली. बृहत बेंगळुरू हॉटेल संघटनेनं याबाबतीत एक पत्रकच काढलं. कर्नाटक दूध संघाला (Karnataka Milk Federation) आर्थिक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

कर्नाटक सरकारचं स्पष्टीकरण

अमूल-नंदिनी दूध प्रकरण विकोपाला गेल्यानंतर कर्नाटकाच्या सहकार मंत्र्यांनी, एस. टी. सोमशेखर यांनी स्पष्टीकरण दिले. 'नंदिनी' आणि 'अमूल' दूध यांचे एकत्रीकरण करण्याचा सरकारचा कुठलाही हेतू नाही किंवा योजना नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

अमूलने मांडली भूमिका

अमूल कंपनीला कर्नाटकात होत असलेला वाढता विरोध बघता अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की एक व्यवसाय म्हणून आम्ही बाजारात उतरत आहोत. कुणा प्रतिस्पर्धी कंपनीला नामोहरम करण्यासाठी आम्ही व्यवसाय करत नाही. कर्नाटकातील दुधाची बाजारपेठ इतकी मोठी आहे की तिथे इतर दूध कंपन्या देखील व्यवसाय करू शकतात.

2015 पासून कर्नाटकात अमूल कंपनी कार्यरत असून हुबळी आणि बेंगळुरू येथे आईस्क्रीम बनवण्याचे प्लँट आधीपासूनच कार्यरत आहेत, अशी माहिती देखील जयेन मेहता यांनी दिली. आजवर आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे दूध आम्ही कर्नाटक दूध संघातूनच खरेदी करत आलो आहोत. दूध संघाला आम्ही कायम पाठिंबा दिला आहे असेही ते म्हणाले.

वादाची पार्श्वभूमी

गेल्या वर्षाच्या अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केएमएफ (KMF) आणि अमूल यांच्या विलीनीकरणाबाबत एक वक्तव्य केले होते. ज्यामध्ये अमूल आणि नंदिनी यांनी एकत्र काम केल्यास तीन वर्षांत त्या देशातील प्रमुख दूध उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या बनतील असे म्हटले होते. नंदिनी आणि अमूल एकत्र आल्यास संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावेळी देखील विरोधी राजकीय पक्षांनीही या वक्तव्याचा विरोध केला होता.

अमूल आणि नंदिनीची वार्षिक उलाढाल 

गुजरात सहकारी दूध संघाद्वारे (GCMMF) अमूल दूध हे उत्पादन विक्रीसाठी बाजारात आणले जाते.उपलब्ध माहितीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात अमूलने 55,055 करोड रुपयांची कमाई केली आहे. येत्या आर्थी वर्षात ही कमाई 66,000 करोड इतकी होण्याचा अंदाज आहे.

अमूलच्या तुलनेत नंदिनीने कमी व्यवसाय केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कर्नाटक दूध संघाने 25,000 करोड रुपयांची कमाई केली आहे. यापैकी तब्बल 20,000 करोड रुपये उत्पादन खर्च आला आहे. म्हणजे केवळ 5000 कोटींचा फायदा कर्नाटक दूध संघाला झाला आहे.