आपल्या वडिलोपार्जित अथवा आयुष्यभर कष्टाने मिळवलेल्या जमापुंजीची आपल्या हयातीत आपण चांगली काळजी घेतली असेल आणि आपल्या पश्चातही आपल्या वारसदारांना त्याचा लाभ मिळावा अशी इच्छा असेल तर त्यासाठी योग्य मृत्यूपत्र तयार करणंही तितकंच गरजेचं आहे.
मृत्यूपत्र लिहीणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं ही अंधश्रध्दा मनातून काढून टाकली पाहिजे.
खरं तर आपल्या संपत्तीचा किंवा आपण केलेल्या गुंतवणूकीचा काही हिस्सा आपल्या वारसांना मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते पण अनेकदा मृत्यूपत्राबद्दल अनेक गैरसमज मनात असल्याने मृत्यूपत्र लिहीलं जात नाही. परिणामी, ती संपत्ती वारसांना मिळताना फार त्रास सहन करावा लागतो. याउलट योग्य प्रकारे मृत्यूपत्र लिहीलं असेल तर आपल्या संपत्तीचा मनाप्रमाणे विनियोग होईल याची खात्रीही बाळगता येते.
आज भारतातील दिवाणी न्यायालयांमध्ये 50 टक्क्यांंहून अधिक खटले हे कौटुंबिक मालमत्तेवरून दाखल झालेले दिसून येतात. मृत्यूपत्राचा अभाव हे यामागचे एक कारण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये सुमारे 80 टक्के लोक इच्छापत्र करीत नाहीत. मृत्यूपत्र लिहीण्यामागचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आपल्या हयातीत त्या संपत्तीवरचा हक्क सोडावा लागतो हा होय. मृत्यूपत्र लिहील्याने आपल्यानंतर त्या संपत्तीची विभागणी कशी करावी ही आपली इच्छा व्यक्त केल्यासारखं आहे. मृत्यूपत्र करणार्याच्या हयातीत त्याचा त्या संपत्तीवरील हक्क अजिबात कमी होत नाही.
मृत्यूपत्र लिहीण्याचे आणखीही काही फायदे आहेत.
एकतर कुटुंबात नंतर संपत्तीवरून भांडणं, कोर्टकचेर्या यात वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत नाही शिवाय मृत्यूपत्राद्वारे वारसांचं टॅक्स प्लॅनिंगही चांगल्याप्रकारे करता येतं. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली कोणतीही सज्ञान आणि कायदेशीररित्या सुजाण व्यक्ती कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या मतानुसार मृत्यूपत्र लिहू शकते.
मृत्यूपत्र हा एक कायदेशीर दस्तावेज असून त्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता आणि संपत्ती ज्या व्यक्तीला अथवा व्यक्तींना मिळणार असते त्यांची नावे व विवरण नमूद केलेले असते. जी व्यक्ती हा दस्तावेज कार्यान्वित करते, ती जीवंत असेपर्यंत तो मागे घेऊ शकते, त्यात बदल करू शकते किंवा त्याच्या जागी दुसरे निर्माण करू शकते. सारांश, स्पष्ट आणि योग्य रीतीने लिहिलेल्या मृत्यूपत्रामुळे नैसर्गिक वारसांमध्ये ताणतणाव टळून त्यांच्यातील नाते टिकून राहण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीला आपली संपत्ती नैसर्गिक वारसांव्यतिरिक्त आणखी कोणाला द्यायची असल्यास मृत्यूपत्राचे महत्व सगळ्यात अधिक असते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                            