Loan NOC: तुम्ही कोणत्याही कारणास्तव वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या संदर्भातील प्रक्रिया माहिती असायला हवी. ही सर्व प्रक्रिया 4 टप्प्यात केली जाते. ज्यामध्ये कर्जासाठी अर्ज करणे, कर्ज मंजूरी, कर्ज मिळवणे आणि शेवटी तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. एकदा का तुम्ही कर्जाचे सर्व हप्ते भरले की, महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कर्जाचे ना हरकत प्रमाणपत्र(NOC) मिळवणे. NOC म्हणजे तुमचे कर्ज बंद झाल्यावर बँकेकडून मिळणारे ना हरकत प्रमाणपत्र आहे. यासंदर्भात बँक तुम्हाला NOC जारी करते. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कर्जाची परतफेड केल्यानंतर NOC घेणे का आवश्यक आहे? चला यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात.
ना हरकत प्रमाणपत्र(NOC) कधी घ्यावे?
तुम्ही तुमच्या कर्जाच्या संपूर्ण रकमेची परतफेड केली की, बँक तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर NOC पाठवते. पत्त्याच्या अडचणीमुळे तुम्हाला NOC मिळाली नसेल, तर यासंदर्भात तुमच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांना थेट विनंती करा.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
NOC साठी तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही तुमचे सर्व थकीत कर्ज भरले असल्याचा पुरावाही असणे आवश्यक आहे. तुम्ही कर्जाची परतफेड केल्यानंतर बँका बऱ्याचवेळा कर्ज नोंदणी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर NOC पाठवते. जर तुम्हाला तुमच्या बँकेकडून NOC मिळाली नाही, तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून NOC तात्काळ मिळवा.
NOC नसेल तर काय अडचणी येऊ शकतात?
तुम्हाला बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC ) मिळाले नसेल तर परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर दिसून येऊ शकतो. त्यामुळे पुढे कर्ज घेताना तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच NOC न घेतल्यास आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता असते. तुम्ही NOC न घेतल्यास तुम्हाला पुन्हा हफ्त्याची रक्कम भरण्यासाठी सांगितले जाऊ शकते. याशिवाय NOC न घेतल्याने तुमच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येऊ शकते. कारण तुम्ही कर्ज फेडल्याचा कोणताही पुरावा तुमच्याकडे नसतो. त्यामुळे NOC हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे.