बऱ्याच वेळा पैशाची बचत आणि गुंतवणूक (Investment Vs Saving) यांना समान समजले जाते. मात्र, या दोन्ही संज्ञामध्ये फरक आहे. सर्व खर्च भागवल्यानंतर बँक खात्यात पडून राहिलेले पैसे म्हणजे झाली बचत. पण तीच रक्कम शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोने, बाँड यांसारख्या फायनान्शिअल इनस्ट्रुमेंटमध्ये स्मार्ट पद्धतीने गुंतवल्यावर दीर्घ कालावधीत संपत्ती निर्माण होते जी तुम्हाला निवृत्तीनंतर किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरता येऊ शकते. पारंपरिक पद्धतीने फक्त बँक खात्यात किंवा घरामध्ये तिजोरीत रक्कम ठेवण्यापेक्षा इतर कोणते असे पर्याय आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळेल हे पाहिले पाहिजे.
बचत म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा असा भाग जो तुम्ही वैयक्तिक गरजांसाठी खर्च केला गेला नाही. तुमचे सर्व निश्चित आणि मासिक खर्च जसे की घरभाडे, विविध प्रकारची बिले, अन्न, इंधन, वाहन दुरुस्ती आणि इतर प्रकारचे खर्च भागवल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम. या रकमेस बचत म्हणता येईल.
दीर्घ कालावधीत चांगला परतावा
गुंतवणूक हा बचतीचाच भाग आहे जो भांडवल बाजार किंवा इतर आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवला जातो. तुम्ही जर फक्त बचत खात्यात पैसे ठेवत असाल तर तुम्हाला ३.५ ते ४% या दराने त्यावर व्याज मिळेल. मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवले तर सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान परतावा मिळेल. मात्र, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली तर दीर्घ कालावधीत चांगला परतावा मिळू शकतो जो परतावा तुम्हाला बचत खात्यातून मिळणे शक्य होणार नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, भांडवली बाजारात पैसे गुंतवताना जोखीमही पत्करावी लागते. ती प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असते. जर तुम्हाला कमी जोखमी घ्यायची असेल तर तुम्ही भांडवली बाजारातील सुरक्षित योजनांमध्ये पैसै गुंतवले पाहिजे. जसे की डेब्ट फंड.
गुंतवणूकीची कालमर्यादा -
बँकेच्या बचत खात्यात जर तुम्ही पैसे ठेवले असतील तर तुम्हाला ते गरज असतील तेव्हा कधीही पैसे काढता येतात. मात्र, जर दीर्घ काळासाठी तुम्हाला पैशांची गरज नसेल तरीही तुम्ही फक्त बचत खात्यात लाखो रुपये ठेवत असाल तर त्यावर खूप अत्यल्प परतावा मिळेल. त्याऐवजी तुम्ही शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर रक्कम गुंतवताना आर्थिक ध्येय डोळ्यासमोर ठेवू शकता. पुढील दहा ते पंधरा वर्षांनंतर जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने पैसे गुंतवून तुम्ही नियोजन करू शकता. मुलांचे शिक्षण, विवाह, निवृत्तीनंतरचा खर्च, अचानक येणारा वैद्यकीय खर्च यासाठी तुम्ही आतापासून नियोजन करायला हवे.
गुंतवणूकीने महागाईवर कराल मात
बँकेमधील बचत खात्यामध्ये तुम्ही पैसे ठेवले असतील तर तुम्हाला ३.५ ते ४ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. मात्र, महागाईचा दर हा ७ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याने बचत खात्यातील रक्कम खरे तर कमी होत आहे. त्यामुळे शेअर बाजार, म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकाळ पैसे गुंतवल्यामुळे चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. जास्तीत जास्त १५ ते २० टक्क्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तही परतावा मिळू शकतो. मात्र, तेच पैसे सेविंग खात्यात असल्याने त्यांचे मूल्य महागाईच्या तुलनेत घटत जाईल.
अचानक पैशांची गरज भासली तर?
गुंतवणूक ही दीर्घ काळाचा विचार करून केली जाते. कारण, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, नॅशनल पेन्शन स्कीम, लॉक-इन पिरियड असलेल्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये पैसे गुंतवल्यानंतर लगेच पैसे काढता येत नाही. मॅच्युरिटी पिरियडपर्यंत तुम्हाला थांबावे लागते. आणीबाणीच्या काळात अचानक पैशांची गरज पडली तर अडचण होऊ शकते. त्यामुळे अशी शक्यता गृहीत धरून तुम्ही काही रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे, जी तुम्हाला लगेच वापरता येईल.