Study in Germany: दर्जेदार उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठात अॅडमिशन घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. अमेरिका, युरोप, कॅनडात जाण्यासाठी अनेक भारतीय विद्यार्थी उत्सुक असतात. मागील वर्षी अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास 1 वर्षापर्यंतचा वेटिंग पिरियड होता. युरोपातील जर्मनी हा देश देखील विद्यार्थ्यांचा फेवरेट स्टडी डेस्टिनेशन ठरत आहे.
या लेखात पाहून जर्मनी विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा देते ज्यामुळे जगभरातील विद्यार्थी जर्मनीकडे आकर्षित होत आहेत. तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जायचा विचार करत असाल तर जर्मनीबद्दलची माहिती उपयोगी ठरेल.
2021-22 या कालावधीत जर्मनीमध्ये 440,564 विद्यार्थी जगभरातून उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत जर्मनीतील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या 30% वाढली. तर 2014 ते 2022 या कालवधीचा विचार करता 37% विद्यार्थी वाढले. तरी कोरोना काळात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती. मात्र, आता कोरोना संकट गेल्यानंतर पुन्हा जर्मनीमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
परदेशातील विद्यार्थ्यांना जर्मनी का खुणावतेय?
जर्मन सरकारने BintHo नावाचा एक सर्व्हे नुकताच केला. यामध्ये 1 लाख 20 हजार परदेशी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेतून असे लक्षात आले की, जर्मनी हे विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे स्टडी लोकेशन आहे. नोकरीच्या संधी जर्मनीत वाढत असून तेथील विद्यापीठांतून मिळणारे शिक्षणही दर्जेदार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 76% मुलांनी जर्मनी हा शिक्षणासाठी पहिल्या पसंतीचा देश असल्याचे म्हटले.
विविध कोर्सेसची उपलब्धता, शिक्षणासाठी परवडणारे शुल्क, विद्यापीठांचा उत्तम दर्जा, इंग्रजीतून अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने जर्मनीला पसंती दिल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले.
जर्मनीतील विद्यापीठांत दर्जेदार शिक्षण मिळते, असे 91 टक्के विद्यार्थ्यांनी म्हटले.
विद्यापीठांचा दर्जा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी म्हटले.
जर्मनीत जे परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यातील 50% विद्यार्थी फक्त इंग्रजी भाषेतून शिक्षण घेत आहेत. मास्टर्स डिग्री करणारे विद्यार्थी इंग्रजीतून शिकण्यावर भर देत आहेत.
2014 साली जर्मनीने संपूर्ण देशातील शिक्षणासाठी ट्युशन फी माफ केली. हा नियम परदेशी विद्यार्थ्यांनाही लागू केल्याने जर्मनीत जाण्याऱ्यांची संख्या वाढली. ट्युशन फी माफ असल्याने विद्यापीठांचे शुल्क कमी आहे.
सुमारे 60% विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला.
जर्मनीतील राहण्याचा खर्च वाढला
दरम्यान जर्मनीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी रीघ लागलेली असताना राहण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या युरोपात महागाई आणि मंदीचे वातावरण असल्याने कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढली आहे. अनेक विद्यार्थ्यांना जर्मनीत राहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. विद्यार्थ्यांसाठी खास परवडणाऱ्या घरांची सुविधाही जर्मनीत आहे. मात्र, वाढती विद्यार्थी संख्या पाहता ही सोय अपुरी पडत आहे. 35 हजार विद्यार्थ्यांचे 11 विद्यापीठातील होस्टेल अॅडमिशनचे अर्ज वेटिंगवर आहेत.