इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयकर विवरणपत्र याविषयी अनेकदा सर्वसामान्य अनभिज्ञ असतात. विशेषतः ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे ते आयकरपात्र ठरत नसल्याने बहुतेकदा ही मंडळी विवरणपत्र भरत नाहीत. उगाचच कशाला भरायचे, असा काहीसा विचार यामागे असतो. पण मंडळी आपले उत्पन्न प्राप्तीकराच्या कक्षेत येत नसले तरीही विवरण भरण्याची नियमित सवय असणे सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक आहे.
काही तरुण मुले किंवा मुली नोकरीला लागतात तेव्हा त्यांचे सुरवातीचे वेतन कमी असते. त्यामुळे अशा नोकरदारांनी विवरणपत्र भरणे गरजेचे आहे का, असा सवाल केला जातो. मात्र कालांतराने उत्पन्न वाढत जाते. त्यामुळे सुरवातीला वर्षाचे पॅकेज एक दोन लाख असेल तरीही आयटीआर ITR भरणे निश्चितच आवश्यक आहे. बरेचदा नवीन नोकरीतूनच नवीन संधी मिळते आणि त्याप्रमाणात उत्पन्नात वाढ होत जाते. शहराबाहेर किंवा परदेशातही नोकरीच्या निमित्ताने जावे लागल्यास विवरणपत्र नियमित भरत असल्याने तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत शंका आणि वाद राहत नाही. परदेशातही नोकरीत रुजू होताना आयटीआर हा एक महत्त्वाचा घटक ठरतो.
आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल अथवा एखाद्या विभागाकडून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तर आयटीआर कामाला येईल. कोणत्याही सरकारी विभागातून कंत्राट मिळवायचे असल्यास मागच्या 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.
जर तुम्ही नियमित प्राप्तीकर विवरण पत्र भरत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहतो. त्याचबरोबर तुमच्याबाबतची विश्वासर्हता राहते. सीबील स्कोअर (Cibil Score) हा आपल्यावरचा विश्वास वाढण्यासाठी फायदेशीर ठरतो. एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल किंवा कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित कंपन्या किंवा बँका या तीन वर्षांच्या विवरपत्राची मागणी करतात. तसेच सिबील स्कोअरही कर्ज देताना तपासला जातो. अशा वेळी तुमचे उत्पन्न कमी असले तरी प्राप्तीकर विवरणाच्या आधारे कर्ज मिळण्यास अडचणी येत नाहीत. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना आयटीआरची मदत उपयोगी ठरते. त्यात कोणतीही कायदेशीर अडचण येण्याची सूतराम शक्यता राहत नाही.
बरेचदा आपल्याला मिळणार्या उत्पन्नातून टीडीएस कापला जातो. त्याचा परतावा हवा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक असते. आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करतो. त्यानुसार तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात परतावा दिला जातो.
याखेरीज आयकर रिटर्न भरल्याची पावती आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते. त्यामुळे ते पत्ता किंवा अॅड्रेस प्रूफ म्हणूनही स्वीकारला जातो.
एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा विमा काढायचा असल्यास विमा कंपनी आयटीआरची मागणी करते.