सध्या ऑनलाईन शाॅपिंगचा जमाना असल्याने लोक आता सोनंही ऑनलाईन (Digital Gold) खरेदी करत आहेत. म्हणजे गोल्ड घ्यायचे असेल तर ज्वेलर्स शाॅपमध्ये जायची गरज नाही. घरात बसूनही ते ऑनलाईन खरेदी करता येतं. तुम्ही म्हणाल, त्याची सुरक्षितता काय? तर हा प्रश्नही योग्यच आहे. मात्र, गोल्ड खरेदी केल्यावर ते एका सुरक्षित इन्शुरन्स कव्हर असलेल्या वॉलेटमध्ये ठेवले जाते. त्यामुळे सोने खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे तुम्ही एक रुपया गुंतवून ही सोने खरेदी करु शकता.
डिजिटल सोने खरेदीत वाढ का झाली?
भारतीय सणासुदीच्या वेळेत काही जमा असलेले पैसे सोन्यामध्ये गुंतवतात. ती गुंतवणूक आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी असते. त्यामुळे डिजिटल सोन्यात गुंतवणूक केल्यास बऱ्याच गोष्टींची बचत होते. म्हणूनच लोक डिजिटल सोने खरेदीचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे डिजिटल सोने खरेदीत वाढ होत असल्याची दिसून येत आहे. याशिवाय डिजिटल सोने खरेदी करायचे म्हटल्यावर तुम्ही ते घरी बसून मोबाईलवरूनही खरेदी करू शकता. त्यामुळे सोने खरेदी करणे आता खूप सहज आणि सोपे झाले आहे. तसेच, सोने सांभाळून ठेवायचेही आता टेन्शन नाही आहे.
डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचे फायदे
डिजिटल गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. महत्वाचा फायदा म्हणजे ते तुम्हाला 24K शुद्धतेच्या हमीसह ते मिळणार आहे. याशिवाय कमी किमतीत डिजिटल पेमेंट अॅप्सद्वारे सहज खरेदी करता येणार आहे. तसेच, बॅंक व्हाॅल्टमध्ये सुरक्षित स्टोरेज करता येणार आहे. त्यामुळे सोन्याच्या सुरक्षेची काळजी राहणार नाही. तसेच, कमी गुंतवणूक करुनही त्यावर मिळणाऱ्या चक्रवाढीचा लाभ घेता येणार आहे. तसेच, दुकानात जाऊन सोने घ्यायचे म्हटल्यावर, मेकिंग शुल्क द्यावे लागते. मात्र, डिजिटल सोने खरेदी करताना ते शुल्क देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ते अधिक फायदेशीर आहे. त्याचबरोबर रिकरिंग वार्षिक शुल्क देण्याची देखील आवश्यकता नाही.
कुठे करायची गुंतवणूक?
डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्ही गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड, सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड आणि काही अॅप्स जसे की, गुगल पे आदी ठिकाणांवरुनही तुम्ही गोल्ड खरेदी करु शकता. पण, तुम्हाला ते सोयीचे वाटत असल्यास, तुम्ही त्यात खरेदी करु शकता. कारण, काही जणांना शाॅपमध्ये जाऊन खरेदी करायला आवडते. त्यामुळे ज्यांना जो मार्ग सोपा वाटतो, ते त्याचीच निवड करतात. मात्र, गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने सोने खरेदी करायचे असेल तर भविष्यात डिजिटल सोने खरेदीला अजून जास्त मागणी होऊ शकते.