सेंद्रिय शेतीबद्दल (Organic Farming) तुम्ही अनेकवेळी ऐकलं असेल. ऑनलाइन किराणा दुकानातून भाज्या, फळे खरेदी करतेवेळी तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल, की हे सर्व खूप महाग (Expensive) असतं. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांशी तुलना केल्यास त्यांचे दर दोन ते तीन पटीनं अधिक असतात. केवळ फळं आणि भाजीपालाच नाही तर सेंद्रिय शेतीतले सर्व धान्यंही (Grain) खूप महाग असतात. असं का असतं, हे जाणून घेण्यापूर्वी सेंद्रिय शेती म्हणजे काय, हे पाहणं गरजेचं आहे. झी बिझनेसनं यासंदर्भातली माहिती दिली आहे.
Table of contents [Show]
सेंद्रिय शेती म्हणजे काय?
सेंद्रिय फळं, भाजीपाला किंवा धान्ये महाग असतात. कारण सेंद्रिय शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन वापरलं जात नाही. खते आणि कीटकनाशके देखील फक्त सेंद्रीयच वापरली जातात. केमिकलचा मारा केल्यानं जमिनीची सुपीकता नष्ट होते. भाजीपाला आणि फळांवर रोगांचा धोकाही यामुळे वाढतो. या रसायनांना स्लो पॉयझन असंही म्हणतात. यामुळेच हळूहळू सेंद्रिय शेतीकडे ओढा वाढत चालला आहे.
सेंद्रिय शेती का महत्त्वाची?
शेतीमध्ये रसायनांचा वापर प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. दुसरीकडे शेतातली मातीही कमकुवत होत आहे. एवढंच नाही तर पाण्याबरोबरच ही घातक रसायनं भूगर्भातल्या पाण्यापर्यंत पोहोचून ते पाणीही दूषित करत आहेत. पावसात शेतातून गेल्यावर हे पाणी नद्या-नाल्यांमध्ये पोहोचते, तेव्हा त्यात अनेक रसायनंही आढळून आली आहेत. त्याचा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
कशी केली जाते सेंद्रिय शेती?
सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत, गांडूळ खत, पिकांचा उरलेला भाग कुजवून तयार केलेलं कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट खत वापरलं जातं. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पिकांच्या उत्पादनातही वाढ होते. या खतांमुळे जमिनीला नैसर्गिकरित्या नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अॅक्टिनोमायसीट्स यांसारखे आवश्यक पोषक घटक मिळतात.
कीटकनाशकही असतात सेंद्रिय
शेती करताना पिकावर किडीचा प्रादुर्भाव किंवा रोगाचा प्रादुर्भाव या काही नवीन गोष्टी नाही. अशा स्थितीत पिकांचं किडींपासून रक्षण करण्यासाठी कीटकनाशकाची गरज असते. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करता येत नाही, त्यामुळे सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. कडुलिंबाच्या तेलात किंवा गोमूत्रात कडुलिंब मिसळून सेंद्रिय कीटकनाशक तयार केलं जातं आणि ते शेतातल्या झाडांवर फवारलं जातं.
का महाग असतात सेंद्रिय उत्पादनं?
सेंद्रिय भाजीपाला-फळे किंवा धान्ये महाग असतात. याचं कारण सेंद्रिय शेतीत वापरली जाणारी खतं आणि कीटकनाशकं ही रसायनांपेक्षा महाग असतात. त्यामुळेच त्यांचा वापर करून केलेली शेतीही महाग पडते. रसायनांच्या तुलनेत सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनही थोडं कमी होतं, कारण भाजीपाला आणि फळांची संख्या रसायनांनी वाढवली जात नाही. अशा स्थितीत आपला नफा काढणंही गरजेचं असतं. त्यामुळे शेवटी त्याची किंमत वाढते.