Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold jewellery : सोन्याच्या दागिन्यांवर का कमी खर्च करत आहेत भारतीय ग्राहक?

Gold jewellery : सोन्याच्या दागिन्यांवर का कमी खर्च करत आहेत भारतीय ग्राहक?

Gold jewellery : सोन्याच्या दागिन्यांवर भारतीय ग्राहकांनी कमी खर्च केल्याचं समोर आलंय. मागच्या तिमाहीचा विचार केल्यास मागणी कमी होती. पारंपरिकरित्या भारतात सोन्याची नेहमीच मागणी अधिक असते मात्र यावर्षी ट्रेंड बदललेला पाहायला मिळत आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनं (World Gold Council) आपला रिपोर्ट दिलाय. या रिपोर्टनुसार, 2023च्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी अत्यंत कमी होती. 2020नंतरच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर ही सर्वात कमी मागणी होती. अहवालात सविस्तर आकडेवारी टक्क्यांमध्ये देण्यात आलीय. 2023च्या पहिल्या तिमाहीमधली सोन्याची मागणी 2022च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 17 टक्के कमी होती. याउलट, चिनी ग्राहकांनी पहिल्या तिमाहीत 198 टन सोन्याचे दागिने विकत घेतले. जगाच्या एकूण आकडेवारीच्या हे प्रमाण 41 टक्के होतं. चीनी ज्वेलरी बाजारपेठेत 2015पासूनची ही सर्वाधिक मागणी होती.

किंमतीचा परिणाम

पहिल्या तिमाहीत भारतीयांनी सोन्याची खरेदी का कमी केली, हे पाहू. पहिल्या तिमाहीत (2023) भारतातली सोन्याची मागणी 17 टक्के ईअर टू ईअर खाली घसरून 112.5 टन झाली. सोन्याच्या किंमतीनं विक्रमी टप्पा गाठला. त्याचबरोबर सोन्याच्या किंमतीतदेखील अस्थिरता असल्याची पाहायला मिळाली. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दागिन्यांची मागणी 2022च्या पहिल्या तिमाहीतल्या 94.2 टनांवरून 78 टनांवर घसरलं, असं वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे रिजनल सीईओ सोमासुंदरम पीआर म्हणाले.

100 टनांच्या खाली घसरण्याची चौथी वेळ

कोविडचा काळ वगळता साधारण 2010पासून पहिल्या तिमाहीत सोन्याच्या दागिन्यांची मागणी 100 टनांच्या खाली घसरण्याची ही चौथी वेळ आहे. या रिपोर्टनुसार, 2023च्या पहिल्या तिमाहीमध्ये सोन्याच्या किंमती, त्यातली अस्थिरता यामुळे भारतीय ग्राहकांनी आपलं सोनेखरेदीचं नियोजन पुढे ढकललं. सोन्याचे दागिनेच नाही तर बार आणि नाण्यांमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय. 2023च्या पहिल्या तिमाहीत ईअर टू ईअर 41.3 टनांवरून 34.4 टनांपर्यंत 17 टक्के घसरण झाली.

व्याज दरवाढीचा परिणाम

सोन्याच्या कमी मागणीचं आणखी एक कारण आहे. अमेरिकेच्या व्याज दर वाढीचा परिणाम, रुपयाचं मूल्य घसरुन अमेरिकन डॉलरचं वाढलेलं मूल्य यामुळे सोन्याच्या किंमती वधारल्या. प्रति 10ला 60,000च्या वर किंमती गेल्या. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 19 टक्क्यांची होती. देशातली आर्थिक गती स्थिर राहील. आरबीआय दराचं चक्र सध्या थांबलंय. त्यामुळे या वर्षात मागणी संथच राहील, असा अंदाज या अहवालात करण्यात आलाय. अक्षय्य तृतीयेतही यंदा सोन्याची मागणी संथच पाहायला मिळाली. तर गुंतवणूकदारांनी दर कमी होईपर्यंत वेट अँड वॉचचंच धोरण स्वीकारल्याचं पाहायला मिळालं. मात्र सोन्याच्या दरात फारशी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पुढच्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत 70,000पर्यंतही दर जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होतेय.

चीनमध्ये कशी वाढली मागणी?

चीनच्या जीडीपीनं वार्षिक 4.5 टक्क्यांनी वाढ नोंदवली. तर अंतर्गत उत्पन्नातही 4 टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळाली. त्यामुळे देशात सोन्याची मागणी वाढल्याचं पाहायला मिळालं. कोविड-संबंधित निर्बंधांच्या शिथिलतेनंतर वेडिंग सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी ही चायनिज ग्राहक प्रामुख्यानं गुंतवणुकीच्या हेतूनेच करतो. बचत करण्याची प्रवृत्ती चीनमध्ये अत्यंत उच्च स्तरावर पाहायला मिळते. सोन्याच्या वाढत्या किंमतीनंही सध्या ग्राहकांच्या आशा गुंतवणुकीच्या दृष्टीनं पल्लवितच केल्या आहेत. दरम्यान, नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या तिमाहीतल्या विक्रीच्या वाढीसाठी दागिने हीच प्रमुख आणि मजबूत श्रेणी होती.