पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी हे नक्की कोण आहेत, यांच्याबाबत जाणून घेऊयात. एक भारतीय उद्योगपती म्हणून मेहूल चोक्सी यांची ओळख आहे. मुंबई विद्यापीठातून चोक्सी यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. ते मोठ-मोठया नामांकित ज्वेलरी ब्रॅंडचे मालक आहेत. त्याचबरोबर पॉलिश्ड हिऱ्यांची सर्वात मोठी निर्यातकदेखील ते होते. 1986 मध्ये, मेहुल चोक्सीने गीतांजली जेम्स लाँच केले.
मेहुल चोक्सी यांचा व्यवसाय काय आहे?
भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये मेहुल चोक्सीचा व्यवसाय पसरला होता. मेहुल चोक्सीच्या कंपनीने 2006 मध्ये सॅम्युअल्स या अमेरिकन ज्वेलरी कंपनीचे 100 स्टोअर्स विकत घेण्यासाठी 200 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले. मेहुल चोक्सीच्या कंपनीचे अमेरिकेत 150 हून अधिक स्टोअर्स आहेत. 1994 मध्ये चोक्सीने 'गिल्ली' नावाचा नवीन ब्रँड सुरू केला. पीएनबी घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंतर मेहुल चोक्सी देशाबाहेर पळून गेले.
मेहुल चोक्सी आणि पीएनबी बॅंक घोटाळा
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणारा मेहुल चोक्सी भारतात वाँटेड आहे. पण हा सगळा प्रकार उघड होऊन त्याचा शोध सुरू होण्याआधीच मेहुल चोक्सी परदेशात पलायन झाला. आधी अमेरिका आणि तिथून अँटिग्वामध्ये गेलेला चोक्सी भारतात कधी परत येतोय, याचीच वाट इथल्या तपास यंत्रणा पाहात आहेत. नुकतेच भारतीय बॅंकेतील सर्वाधिक कर्ज बुडविल्याच्या यादीत मेहुल चोक्सीचा समावेश झाला आहे. कालच त्याबाबतची ही माहिती लोकसभेतदेखील सादर करण्यात आली.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            