Wheat shortage: बाजारामध्ये गहू, आटा आणि मैद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गव्हावर प्रक्रिया करणाऱ्या मिल्स आणि स्नॅक्स तयार करणाऱ्या कंपन्यांना वेळेत मालाचा पुरवठा होत नाही. दिल्लीमध्ये गहू प्रतिकिलो 32 रुपयांवर पोहचला असून विविध राज्यांमध्ये गहू, आटा, आणि मैद्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने गव्हापासून तयार होणाऱ्या स्नॅक्स पदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे निर्मिती खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे पाव, बटर, ब्रेड आणि गव्हापासून तयार होणाऱ्या विविध स्नॅक्स अन्नपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
मिल गव्हाअभावी बंद( Mills closed due to reduced wheat supply)
गव्हाचे पीठ तयार करणाऱ्या अनेक लहान मिल्स कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने बंद झाल्या आहेत. तर मोठ्या मिल्स 50 ते 70% क्षमतेनेच काम करत आहेत. गहू कमी पडत असल्याने मिल बंद ठेवण्याची वेळ मिल मालकांवर आली आहे. याचा परिणाम बाजारातही दिसून येत आहे. किरकोळ बाजारात गहू, आटा आणि मैद्याच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाही झळ बसत आहे. दिल्लीमध्ये गव्हाच्या किंमती 7% वाढल्या आहेत. अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्या स्नॅक्स उद्योगात आहेत. त्यांना मैद्यासाठी बाजारात फिरावे लागत आहे. तसेच मैदा खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
गव्हाच्या किंमत वाढण्यामागील कारणे? (Reasons behind wheat price hike)
मागील वर्षी गहू उत्पादक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा आल्याने पिकाचे नुकसान झाले. 2021-22 आर्थिक वर्षात गव्हाचे उत्पादन अडीच टक्क्यांनी कमी झाले. सरकारकडून होणारी खरेदीही 55% कमी झाली. खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारला गहू न देता जास्त किंमतीत बाजारामध्ये विकला. सध्या रब्बी हंगाम मातील गहू अद्यापही शेतातच आहे. काढणी होऊन चालू हंगामातील गहू बाजारात आल्यानंतर किंमती कमी होतील. मात्र, अद्याप किंमत वाढीस दिलासा नाही.
स्नॅक्सच्या किंमती वाढू शकतात(Snacks prices may rise)
स्नॅक्स निर्मिती करणाऱ्या मोठ्या कंपन्या कंत्राटी पद्धतीने शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करतात. तसेच काही लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्याही कंत्राटी पद्धतीने मोठ्या स्नॅक्स ब्रँड्स कंपन्यांना गहू, मैदा आणि आट्याचा पुरवठा करतात. मात्र, अचानक किंमत वाढीमुळे या कंपन्यांनाही गहू कमी पडू लागला आहे. जास्त किंमतीने गहू खरेदी केल्यामुळे ब्रेड, पाव आणि विविध स्नॅक्सच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किंमत वाढीचा बोजा शेवटी ग्राहकांच्या खिशावरच पडण्याची शक्यता आहे.