Wheat Prices Hike: दसरा दिवाळी मोठे सण तोंडावर आले असताना देशात गव्हाच्या किंमती 8 महिन्याच्या उच्चांकावर पोहचल्या आहेत. पुढील काही महिने किंमती चढ्याच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मागील 2 वर्षांपासून देशात अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या लाटांमुळे गव्हाच्या पिकाला फटका बसला आहे.
मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने किरकोळ बाजारही किंमती वाढल्या आहेत. आयात गव्हावर शुल्क जास्त असल्याने मिल मालकांना असा गहू परवडत नाही. त्यामुळे सरकारला काही दिवसांतून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांतील गहू बाहेर काढावा लागू शकतो. अन्यथा अन्नधान्य पदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर महागाई वाढलेले सरकारला परवडणार नाही. त्यामुळे गव्हाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रति क्विंटल दर किती?
नवी दिल्लीत मंगळवारी प्रति टन गव्हाचे दर 1.6 टक्क्यांनी वाढून 27,390 झाले आहेत. फेब्रुवारीतील दरांशी तुलना करता हे दर सर्वाधिक आहेत. मागील 6 महिन्यात गव्हाचे दर 22 टक्क्यांनी वाढले आहेत.
सध्या आयात गव्हावर 40% शुल्क आकारले जाते. मात्र, हा कर तूर्तास कमी किंवा रद्द करण्याचा विचार नसल्याने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. 1 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामांमध्ये 24 मिलियन टन गहू आहे. पाच वर्षांपूर्वी सरासरी 37 मिलियन मेट्रिक टन गहू सरकारी गोदामात होता. मात्र, खराब हवामान, उष्णतेच्या लाटांमुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            