Wheat price: देशामध्ये गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र, सरकारने गोदामातील गहू विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशातील गव्हाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मागील आठवड्यात 10 टक्क्यांनी गव्हाच्या किंमती कमी झाल्याची माहिती आज शुक्रवारी सरकारने दिली. दरवाढ रोखण्यासाठी सरकारी गोदामातील गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
30 लाख टन सरकारी गव्हाची विक्री (30 lakh tonnes wheat to be sold in open market)
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आत्तापर्यंत 9.2 लाख टन गव्हाची विक्री केली आहे. एकूण 30 लाख टन गहू बाजारात विकण्यात येणार आहे. विक्रीचा दर प्रति क्विंटल 2 हजार 474 रुपये ठेवण्यात आला आहे. म्हणजेच प्रति किलो 24.4 इतका गव्हाचा दर ठेवला आहे. इ- लिलावाद्वारे हा गहू विकण्यात आला. यापैकी 25 लाख टन मिल्स आणि घाऊक खरेदीदारांना विकण्यात येणार आहे. तर 3 लाख टन नाफेड आणि 2 लाख टन गहू राज्य सरकारांना विकण्यात येणार आहे.
देशामध्ये गव्हाची दरवाढ झाल्याने मिल्स आणि कंपन्यांना गहू मिळणे मुश्लिक झाले होते. मात्र, आता पुन्हा गव्हाच्या किंमती खाली येऊ लागल्या आहेत. सरकारी गहू खरेदीसाठी एक हजारापेक्षा जास्त कंपन्यांनी लिलावात भाग घेतला होता. हा लिलाव 23 राज्यांमध्ये घेण्यात आला. 15 मार्चपर्यंत सलग लिलावाद्वारे सरकारी गोदामातील गहू विक्री करण्यात येणार आहे.
गव्हाच्या किंमती रोखण्यासाठी सरकारचे पाऊल
देशातील गहू आणि पिठाच्या किमती रोखण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशात गव्हाचा दर 3000 रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला आहे, तर पीठही 40 रुपये प्रति किलो (Atta Price) वर पोहोचला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता 29.50 रुपये किलो दराने पीठ विकण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे आता लोकांना बाजारभावापेक्षा सुमारे 11 रुपयांनी स्वस्त पीठ मिळणार आहे. 6 फेब्रुवारीपासून, नॅशनल ऍग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड (NCCF) स्वस्त पिठाची विक्री सुरू करणार आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            