इक्विटी मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना टॉप-डाऊन आणि बॉटम-अप अशा दोन पद्धती सहसा विचारात घेतल्या जातात. म्युच्युअल फंड मॅनेजर चांगल्या कंपन्या निवडण्यासाठी या दोन्ही पद्धतीपैकी जी योग्य वाटेल ती निवडतो. तसेच शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असतानाही हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या कंपनीत गुंतवणूक करताना तिची फायनान्शिअल हेल्थ पाहिली जाते. या लेखात पाहूया टॉप डाऊन आणि बॉटम अप पद्धत काय आहे. ती कसे काम करते.
टॉप डाऊन पद्धत (What is top-down approach?)
टॉप डाऊन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्था, जागतिक घडामोडी, अर्थव्यवस्थेतील एखाद्या क्षेत्राची स्थिती, कच्चा माल मागणी-पुरवठा अशा गोष्टींकडे आधी पाहिले जाते. यास EIC अप्रोच असेही म्हणतात.
E म्हणजे इकॉनॉमी. गुंतवणूक करताना देशाची तसेच जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे. महागाई, वस्तू-सेवांची मागणी, जागतिक धोरणे त्यानुसार गुंतवणूक करणे योग्य ठरेल की नाही हे पाहले जाते.
I म्हणजे इंडस्ट्री. जर अर्थव्यवस्थेची स्थिती योग्य असेल तर तुम्ही इंडस्ट्री म्हणजे त्या क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे ते पाहता. उदाहरणार्थ, निर्मिती, बँकिंग, टुरिझम, विमा अशा क्षेत्रांची एकूण स्थिती काय आहे याचा विचार करता. या क्षेत्राची प्रगती, कच्च्या मालाच्या किंमती, तयार मालाला बाजारात मागणी किती आहे, मागणी रोडवली आहे का वाढत आहे? व्यवसायातील अडथळे अशा गोष्टींचा अभ्यास तुम्ही करता.
C म्हणजे कंपनी. इकॉनॉमी आणि इंडस्ट्रीचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रातील ठराविक कंपनीचा अभ्यास करता. त्यामध्ये मग कंपनीचे बाजार मूल्य, नफा, कर्जाचे प्रमाण, व्यवस्थापन, तरलता अशा मुद्द्यांचा आढावा घेता. यामध्ये जर ती कंपनी योग्य वाटली तर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता येईल. या प्रकारच्या गुंतवणूक पद्धतीला टॉप डाऊन अप्रोच असे म्हणतात.
बॉटप-अप पद्धत म्हणजे काय? (What is bottom up approach?)
बॉटम-अप पद्धत टॉप डाऊन च्या अगदी विरुद्ध आहे. या पद्धतीत अर्थव्यवस्था, इंडस्ट्री या घटकांकडे बारकाइने न पाहता थेट कंपनीची स्थिती कशी आहे हे आधी पाहिले जाते. अर्थव्यवस्था जरी रेंगाळलेली असली तरी चांगली कंपनी नफा कमावून फायद्यात राहू शकते, हा विश्वास यात असतो. अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही मागील काही वर्षात चांगल्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अर्थव्यवस्था आणि एखाद्या क्षेत्राची वाताहत झाली असतानाही कंपनी नफ्यात राहू शकते, हा विचार येथे महत्त्वाचा ठरतो.
सद्यस्थितीचा विचार करता जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती कमकुवत आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनी मंदीच्या तडाख्यात सापडली आहे. अमेरिकेत कर्ज संकट उभे राहिले आहे. सर्वच देशांत महागाई वाढलेली आहे. भारतातही वस्तू आणि सेवांची मागणी रोडावलेली आहे. अशी परिस्थितीत गुंतवणूक करताना टॉप डाऊन पद्धत योग्य ठरू शकते.