BCCI Chief Selector Salary: भारतीय क्रिकेट संघाला नवा मुख्य चीफ सिलेक्टर मिळाला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनवण्यात आले आहे. माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांच्यानंतर ही जबाबदारी अजित आगरकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मंगळवारी (4 जुलै) बीसीसीआयने नवीन याबाबत घोषणा केली. याआधी कमी पगारामुळे अनेक माजी भारतीय खेळाडूंनी या पदासाठी स्वारस्य दाखवले नसल्याचे बोलले जात होते.
वार्षिक 3 कोटी रुपये पगार मिळणार
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या चीफ सिलेक्टरला वार्षिक पगार एक कोटी रुपये दिला जात होता. मात्र आता त्यात जवळपास तिपटीने वाढ करण्यात आली आहे. 'क्रिकबज'च्या रिपोर्टनुसार, आता चीफ सिलेक्टरला वार्षिक 3 कोटी रुपये पगार मिळणार आहे. दुसरीकडे, निवड समितीच्या उर्वरित सदस्यांना वार्षिक वेतन म्हणून आधी ९० लाख रुपये देण्यात येत होते, आता त्यातही वाढ होणार आहे. मात्र, उर्वरित सदस्यांच्या पगाराचा निर्णय अद्याप झालेला नाही.
माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर शिव सुंदरदास अंतिम चीफ सिलेक्टर म्हणून काम करत होते, पण आता टीम इंडियाला नवा चीफ सिलेक्टर मिळाले. अजित आगरकर याआधी आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सशी जुळलेले होते, परंतु त्यांनी तेथून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित आगरकर हे नवे चीफ सिलेक्टर म्हणून निवडण्यात आले.
अजित आगरकर यांची कारकीर्द
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आगरकरने एप्रिल 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 47.32 च्या सरासरीने 58 बळी घेतले. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.85 च्या सरासरीने 288 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर आगरकरने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्येही उत्कृष्ट धावा घेतल्या.