• 27 Mar, 2023 07:12

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Fraud : मुंबईत 83 वर्षीय आज्जीबाईंना 10 लाखांना फसवलं, तुमची फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

PPF Fraud

PPF Fraud : मुंबईत एका वृद्ध महिलेला अधिकच्या पेन्शनचं आमीष दाखवून लुबाडण्यात आलंय. आपण फसवले गेलो आहोत हे समजण्यापूर्वी तीन हप्त्यांमध्ये महिलेनं दहा लाख रुपये दुसऱ्यांच्या खात्यात जमाही केले होते. समजून घेऊया नेमकं काय झालं. आणि अशी फसवणूक कशी टाळता येईल.

ही गोष्ट मुंबईतल्या कुलाबा या उच्चभ्रू वस्तीत खुसरूबाग भागात राहणाऱ्या महिलेची आहे. 83 वर्षांच्या या आजी 1997 मध्ये सिंडिकेट बँकेतून व्यवस्थापक पदावर निवृत्त झाल्या. तेव्हापासून आपला आणि कुटुंबीयांचा उदरनिर्वाह त्या पेन्शनमधून येणाऱ्या पैशावर करत आहेत. सरकारी पेन्शन बरोबरच त्यांनी काही निवृत्तीवेतन योजनांमध्येही पैसे गुंतवले आहेत.      

अलीकडे, सातव्या वेतन आयोगाच्या बातम्या वारंवार मीडियामध्ये येत होत्या, तेव्हा आजीबाईंना एक विचित्र अनुभव आला. अंजली वर्मा असं नाव सांगणाऱ्या एका महिलेनं आजींना फोनवरून संपर्क केला . आपण, ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो असं तिने भासवलं. आणि पुढे सातव्या वेतन आयोगा अंतर्गत सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांना दिली.      

बँकेतल्या असूनही झाली फसवणूक     

बँकेत नोकरी केल्यामुळे आजींना या बोलण्यात रसही होता. या अनोळखी बाईंबरोबरच्या गप्पांमध्ये आजीही रंगल्या. आणि अशा नाजूक वेळी अंजली वर्मा यांनी त्यांच्याकडे असलेली एक योजना आजीबाईंना सांगितली.      

योजना सरकारी PPF योजनाच आहे. आणि PPF खात्यातली तुमची गुंतवणूक वाढवलीत तर तुमच्या पेन्शनमध्ये वाढ होईल असं या बाईने आजींना सांगितलं. आणि नेमका आजींचा विश्वास बसला.      

मुंबई पोलीस किंवा इतरही तपास यंत्रणा वारंवार आपल्याला फसव्या योजनांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. पण, आपलं दुर्लक्षच होतं.      

आजींनी विचार केला की, अधिक जोखमीच्या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवण्याऐवजी ते सरकारी PPF खात्यातच जमा करू. त्यामुळे आपल्याला जास्तीचं पेन्शन मिळेल. आणि त्यांनी पहिलाच हप्ता दिला तो साडे चार लाख रुपयांचा. पण, पैसे त्यांनी दिले ते अनोळखी व्यक्तीला. तुमच्या PPF खात्यात जास्तीचे 4,75,000 रुपये जमा होतील, असं अंजलीने आजींना सांगितलं होतं.      

आजीबाईंनी आपले पैसे कधीही न भेटलेल्या एका महिलेच्या सांगण्यावरून एका अनोळखी बँक खात्यात वळते केले. हे इतक्यावरच थांबलं नाही.      

अनोळखी लोकांच्या खात्यात गुंतवणुकीसाठी पैसे दिले      

काही दिवसांनी तथाकथित अंजली वर्माच्या वरिष्ठांचा फोन आला. यावेळी फोनवर एक गृहस्थ होते. त्यांनी आजींचे पैसे वाढत असल्याचं त्यांना सांगितलं. आणि सातव्या वेतन आयोगानुसार पैसे कसे वाढणार याचं एक गणित मांडून आजींना सांगितलं.      

यावेळी कॉल संपवताना या गृहस्थाने आजींकडे आणखी साडे पाच लाख रुपयांची मागणी केली. आजीबाईंनी हे पैसे गृहस्थाने सांगितलेल्या खात्यात वळते केले. आजीबाईंना वाटत होतं आपली पेन्शनची रक्कम खरंच वाढेल.      

अंजली वर्मा आणि तिचे वरिष्ठ आता पुन्हा कॉल करायला लागले. यावेळी ते आधी दिलेल्या रकमेवर सर्व्हिस चार्ज लागेल असं म्हणत होते. आणि सेवा कराच्या रुपात आणखी पैेसे मागत होते. आता मात्र आजींना संशय यायला सुरुवात झाली. त्यांनी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. आणि तेव्हा त्यांना कळलं हे सगळं फ्रॉड होतं. त्यांची फसवणूक झाली होती. मग त्यांनी कुलाबा पोलीस स्टेशनात धाव घेतली. तोपर्यंत आधी सतत संपर्कात असलेले अंजली वर्मा आणि तिचे वरिष्ठ अधिकारी फोनवरही गायब झाले होते.      

आजीबाईंना आता आर्थिक गुन्हे शाखेचाच सहारा होता.      

PPF Fraud

आजीबाईंची का झाली फसवणूक?      

कुठलीही गुंतवणूक करताना तज्ज्ञ सल्ला देतात तो जागरुक राहून गुंतवणूक करण्याचा. आणि आपले पैसे कुठे जातायत हे नीट माहिती करून घेण्याचा. इथं आजी बँकेतल्या असूनही त्या योजना गळ्यात मारणाऱ्या लोकांच्या गोड बोलण्याचा फसल्या. अशी फसवणूक होऊ नये यासाठी बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूर काही गुंतवणुकीची पथ्य पाळण्याचाच सल्ला देतात.      

आजीबाईंच्या घटनेमध्ये त्यांना गुंतवणुकीचा निर्णय घेताना सहा त्रुटी दिसतात,      

  • बँकेतल्या खात्याविषयीची आपली माहिती कदाचित त्यांनी गुप्त ठेवली नसावी      
  • अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याचीही तसदी घेतली नाही     
  • आणि परस्पर अनोळखी बँक खात्यात रक्कम वळवली     
  • हीच रक्कम निदान चेकने आणि योजनेच्या नावावर देता आली असती. दुसऱ्या व्यक्तीच्या नावे चेक देणं धोकादायक असतं      
  • योजनेची सत्यता तपासून पाहिली नाही     
  • गुंतवणूक तज्ज्ञ किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतला नाही     

देवीदास तुळजापूरकर एका मानवी स्वभाव वैशिष्ट्याकडेही बोट दाखवतात. ‘या महिलेला जास्त पैशाची भूल पडली. नियमित परतावा देणारी योजना सोडून जास्तीच पैसे मिळवण्याचा विचार मनात येतो तेव्हा आपली पहिली फसगत झालेली असते. कारण, अशावेळी योग्य तो अभ्यास खातरजमा आपण करतच नाही. इथंही या महिलेला सरकारी योजनेतले पैसे वैयक्तिक खात्यावर का जमा करायचे हा प्रश्नही पडला नाही, ही मोठी चूक झाली,’ तुळजापूरकर यांनी आपला मुद्दा सांगितला.      

विशेष म्हणजे अगदी ही अशाच प्रकारची फसवणूक झालेली ही पहिली केस नाही. यापूर्वी बँकेच्याच महिला कर्मचाऱ्याला PPF चं आमीष दाखवून बरोबर 10 लाखांच्या रकमेलाच फसवण्यात आलं होतं. आणि इंटरनेटवर आजही सर्च केलंत तर अशी कित्येक प्रकरणं तुम्हाला आढळतील.      

मग अशावेळी पोलिसांची मदत कशी घ्यावी. आपले पैसे परत मिळण्याची शक्यता काय आहे?      

How to file FIR with economic offence wing

आजींना पैसे परत मिळू शकतील का?      

झालेली फसवणूक ऑनलाईन असेल आणि पैसे आपल्या बँक खात्यातून वळते झाले असतील तर अशा प्रसंगी ऑनलाईन प्रक्रिया करून तुमचे पैसे तुम्हाला दहा दिवसांत परतही मिळवता येतात. बँकेकडे तक्रार करून बँक सांगेल ती प्रक्रिया तुम्हाला पार पाडावी लागते.      

पण, आजीबाईंनी अनोळखी इसमाच्या खात्यात स्वत:हून पैेसे वळते केले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मार्ग आहे तो आर्थिक गुन्हे पोलिसांकडे याविषयी तक्रार करण्याचा. आणि पोलीस तपासाची वाट बघण्याचा. पोलिसांनी समजा ही टोळी पकडलीच तर आजींना पैसे दिल्याचे पुरावे आणि त्या पैशांचा स्त्रोत पुढे जाऊन सिद्द करावा लागेल.      

तुळजापूरकर यांनीही आजींना कायद्याचं संरक्षण किती मिळेल याबद्दल शंका व्यक्त केली. कारण, त्यांचे पैसे त्यांनी स्वत:हून दुसऱ्यांच्या खात्यात वळते केल्याचं स्पष्ट दिसतंय.      

पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी आजी खालील गोष्टी करू शकतात,     

  • आजींना फोन आले तेव्हाच्या संभाषणांची सगळी माहिती तारीखवार लिहून काढणे, कोणा - कोणाशी त्यांचं बोलणं झालं, काय बोलणं झालं ते आठवून शक्य होईल ती सगळी कागदपत्रं पोलिसांना देणं.      
  • ज्यांच्याशी फोनवर संभाषण झालं, त्यांनी स्वत:विषयी दिलेली सर्व माहिती (नावं खोटी असली तरीही), त्यांनी सांगितलेली संस्था आणि त्यांचं पद, फोन क्रमांक तसंच ईमेल      
  • पैसे ज्या माध्यमातून वळते केले त्याविषयीचे कागदी किंवा डिजिटल पुरावे     

या सगळ्या गोष्टी अनेकदा एकदम आठवतही नाहीत. पण, तारीखवार घटनाक्रम आठवून असे पुरावे गोळा करता आले तर पोलीस तपासात त्यांचा खूप उपयोग होऊ शकतो. पण, अशाप्रकारची फसवणूक टाळण्यासाठी नेमकं काय करता येईल?      

आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून…      

बँकिंग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांनाही फसवणूक झाल्यानंतर पावलं उचलण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं वाटतं. ‘हल्ली आर्थिक फसवणूक करणारे लोक सोशल मीडियावरचा आपला वावर बघून सावज हेरतात. त्यामुळे सोशल मीडियावर आपण नेमकं काय पोस्ट करतो याबाबतीतही जागरुक राहण्याची गरज आहे,’ तुळजापूरकर यांनी सांगितलं.      

शिकलेले आणि सुशिक्षित लोकही चोरांच्या जाळ्यात अलगद सापडतात याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. म्हणूनच, फसवणूक होऊ नये म्हणून काही गोष्टी आपण पाळण्याची गरज आहे.      

या गोष्टी कराच     

  • ज्यांच्या मार्फत आर्थिक व्यवहार करू पाहात आहात, त्यांचा इतिहास, अधिकृत रेकॉर्ड, ओळखपत्र यांची खातरजमा करून घ्या     
  • वर्तमानपत्र किंवा मीडियाच्या माध्यमातून अवती भवती काय घडतंय याची अद्ययावत माहिती ठेवा     
  • अनोळखी व्यक्तीचा फोन घेतलात तरी ते काय म्हणतायत यावर तज्ज्ञांचं मत किंवा दुसऱ्या व्यक्तीचं मत नक्की घ्या     
  • शक्यतो अनोळखी व्यक्तींच्या फोन संभाषणावर विश्वास ठेवू नका     
  • फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला पत्ता, वैयक्तिक माहिती अशा गोष्टी विचारा. आणि मग त्या खऱ्या आहेत की नाही याची खातरजमा करून घ्या     
  • सोशल मिडियाची गोपनीयता सेटिंग्ज नीट तपासा. तिथूनच अनेकदा गुन्हेगारांना तुमची माहिती मिळत असते     
  • गुन्हेगारीचा संशय असेल तर व्यक्तीचा ईमेल नीट तपासा. तो वेगळा असेल तर फिशिंगची शक्यता लगेच समजते.      

हे करू नका     

  • अनोळखी व्यक्तींचे पैशासाठीचे कॉल आणि ईमेल यांना शक्यतो उत्तर देऊच नका     
  • क्रेडिट कार्ड किंवा इतर पैसे भरण्याचे मार्ग याविषयी कुठलीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका     
  • शक्यतो प्री-पेड कार्ड, आधीच सही केलेला चेक अशी माध्यमं पैसे हस्तांतरणासाठी वापरू नका     
  • वॉट्सअॅप सारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्रणालीवर संशयित व्यक्तींशी बोलू नका. बोलणं एसएमएसवर करा     
  • फोन देशाबाहेरच्या किंवा राज्या बाहेरच्या नंबरवरून आला असेल, ईमेलही संशयास्पद असेल तर व्यवहार करू नका     
  • कुठली थर्ड पार्टी संस्था किंवा व्यक्ती यांनी ओळख करून दिलेल्या व्यक्तीशी व्यवहार करू नका. व्यक्ती थेट परिचयातली असेल तरंच व्यवहार कर     

तहान लागल्यावर विहीर खणू नये असं आपण म्हणतो. तसंच काहीसं इथं आहे. आर्थिक दृष्ट्या जागरुक राहण्यासाठी फसवणुकीचा अनुभव घेण्याची गरज नाही. उलट कधीच फसवणूक होऊ नये यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे.