Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे काय?

Online Shopping

Online Shopping : सध्या इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या बेवसाईट्स आणि अ‍ॅप्स आहेत. यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, Myntra, मेशो, Snapdeal, ebay आणि Nykaa अशा बऱ्याच वेबसाईट ऑनलाईन शॉपिंगसाठी उपलब्ध आहेत.

प्रत्यक्षात बाजारात न जाता इंटरनेटद्वारे ई-कॉमर्स साईट किंवा शॉपिंग अ‍ॅपद्वारे केलेली खरेदी म्हणजे ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping). ऑनलाईन शॉपिंग ही इंटरनेटद्वारे होत असल्यामुळे ती तुम्ही घरातून, ऑफिसमधून, इंटरनेट असलेल्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून करू शकता. तसेच ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी कुठलेही बंधन नाही. इथे तुम्ही घरातील वापरातील वस्तूपासून कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाण्याच्या गोष्टी, लॅपटॉप-कॉम्प्युटरपासून, रेल्वे-विमानांची तिकीटं किंवा पुस्तकं अशी कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकता.

सध्या इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या बेवसाईट्स आणि अ‍ॅप्स आहेत. यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, Myntra, मेशो, Snapdeal, ebay आणि Nykaa अशा बऱ्याच वेबसाईट ऑनलाईन शॉपिंगसाठी उपलब्ध आहेत.


ऑनलाईन शॉपिंग का? (Why Online Shopping?)

ऑनलाईन शॉपिंग ही ग्राहकांसाठी खूप मोठी सोय आहे. यामुळे खरेदीदारांचा वेळ वाचतो. त्याला शॉपिंग करण्यापूर्वी त्या वस्तूंची संपूर्ण माहिती घेता येते. एखादी वस्तू पसंत पडल्यानंतर ती खरेदी करण्याचे बरेच पर्याय ऑनलाईन उपलब्ध आहेत. जसे की, तुम्ही ती वस्तू कॅश ऑन डिलेव्हरी (Cash on Delivery), क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड(Debit Card), किंवा ऑनलाईन ट्रान्सफर (Online Transfer) असे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे पेमेंट करू शकता. तसेच सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुम्हाला एखादी वस्तू पसंत पडली नाही तर तुम्ही ती परत करू शकता.

ऑनलाईन शॉपिंगचे फायदे (Benefits of Online Shopping)

ग्राहकांची सोय (Facilities)

ऑनलाईन शॉपिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांची सुविधा. इथे तुम्हाला खरेदी करताना कोणाची वाट पाहावी लागत नाही किंवा ते कोणीतरी दाखवेल यासाठी थांबण्याची गरज नाही. ऑनलाईन शॉपिंगमधली ही सर्वांत महत्त्वाची सोय आहे. इथे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे खरेदी करू शकता. 

परवडणाऱ्या किमतीत खरेदी (Affordable Price)

ऑनलाईन शॉपिंगमध्ये थेट ग्राहक आणि विक्रेता यांचा संबंध असल्याने इथे ग्राहकांना थेट आणि माफक किमतीत वस्तू विकली जाते. या शॉपिंगमध्ये इतर मध्यस्थी नसल्यामुळे विक्रेत्याला कमी किमतीत वस्तू विकणे परवडते. याशिवाय ऑनलाईन विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देतात.

दुकानदारांचा आग्रह (Insistence of Shopkeepers)

बऱ्याच वेळा आपण जेव्हा खरेदीसाठी बाजारात जातो. तेव्हा आपल्याकडून नकळत नको त्या गोष्टींची भरमसाठ खरेदी होते. तर काहीवेळेस दुकानदाराच्या आग्रहामुळे विनाकारण खरेदी केली जाते. ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांवर अशाप्रकारचा कोणताही दबाव नसतो.

प्रोडक्टस आणि किमतीची तुलना (Product & Price Comparison)

खरेदी करताना नेहमी प्रोडक्टस आणि त्यांच्या किमतीची तुलना केली जाते. पूर्वी ही तुलना करण्यासाठी दुकानांमध्ये फिरावे लागायचे. पण आता एखाद्या प्रोडक्टबद्दली इत्यंभूत माहिती, त्याचे फीचर्स आणि किंमत अशी सर्व गोष्टींची इतर प्रोडक्टसबरोबर तुलना करणं सोप्पं झालं आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये काही कंपन्या प्रोडक्टसवर रेटिंगही उपलब्ध करून देतात. ज्यामुळे खरेदीदाराला ती वस्तू विकत घेणं खूप सोप्पं होतं.

वेळेची बचत (Time Saving)

ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांचे पैसे भरण्यासाठी कॅश काउंटरवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ते त्यांच्या घरातून किंवा कामाच्या ठिकाणांहून खरेदी करू शकतात आणि त्यांना खरेदी करण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. 

सुलभ रिफंड आणि रिटर्न (Easy Refund & Returns)

ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना रिफंड आणि रिटर्नचा अधिकार आहे. यामुळे ग्राहकांना एखादी वस्तू पसंत नसेल तर ती वस्तू विशिष्ट कालावधीत परत करता येते. त्याबदल्यात दुसरी वस्तू घेण्याचा किंवा पैसे पुन्हा मिळवण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.

जुन्या वस्तूंची खरेदी (Purchase of secondhand goods)

इंटरनेटवर नवीन वस्तूंसह जुन्या किंवा थोड्या प्रमाणात वापरात नसलेल्या पण तितक्याच महत्त्वाच्या वस्तुही विक्रीसाठी उपलब्ध असतात. तुम्हाला जर जुन्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या शोधण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगपेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही.

प्रायव्हसी (Privacy)

ऑनलाईन खरेदीमध्ये प्रायव्हसी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. काही जणांना बिनधास्तपणे बाजारात जाऊन विशिष्ट गोष्टींची खरेदी करता येत नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग हा चांगला पर्याय आहे. इथे अंडरगारमेंट किंवा इतर गोष्टींचा खरेदी करताना खरेदीदाराशिवाय कोणीही नसते. त्यामुळे मनसोक्त खरेदी करता येते.

ऑनलाईन शॉपिंगचे तोटे (Disadvantage of Online Shopping)

डिलिव्हरीची वाट पाहणे (Waiting for Delivery)

ऑनलाईन शॉपिंगमधून खरेदी केलेली वस्तू कधी येणार आहे; याची आपल्याला माहिती असली तरी ग्राहक म्हणून खरेदीदाराला ऑर्डरसाठी वाट पहावी लागते. साधारण डिलिव्हरीसाठी 2 ते 3 दिवस लागतात. पण काही अडचणींमुळे तीच वस्तू येण्यासाठी एक आठवडा लागला तर खरेदीचा हिरमोड होतो.

वस्तुंच्या स्पर्शाचा अभाव

ऑनलाईन शॉपिंगमध्ये कपडे खरेदी करताना त्यांना स्पर्श करता येत नाही. किंवा त्याची ट्रायल करता येत नाही. बऱ्याचवेळा दिसणारे प्रोडक्ट हे हाताळल्यानंतर पसंतीस पडत नाही. त्यामुळे शक्यतो कपड्यांची खरेदी ऑनलाईन करू नये. 

प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव घेता येत नाही (Miss the actual shopping experience)

प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करताना भलेमोठे शोरूम, तिथले वातावरण, वेगवेगळ्या ग्राहकांची आवड-निवड या आपण मिस करतो. तसेच एखाद्या प्रोडक्टबद्दल प्रत्यक्ष त्या दुकानातील सेल्स गर्लने दिलेली माहिती ही प्रत्यक्ष वापरातली किंवा अनुभवाच्या बळावर दिलेली असते. त्याचा आनंद ग्राहक म्हणून ऑनलाईन शॉपिंगमध्ये आनंद घेता येत नाही.

किमतीत घासाघीस करता येत नाही (No Bargaining)

दुकानामध्ये खरेदी करताना दुकानदाराने सांगितलेल्या किमतीवर घासाघीस करणे, याचा आनंद काही वेगळाच असतो. तो ऑनलाईन श़ॉपिंगमध्ये घेता येत नाही. तिथे सांगितलेली किंमत दिल्याशिवाय ती वस्तू मिळत नाही.

फसवणुकीची शक्यता (Fraud)

ऑनलाईन खरेदी करताना फसवणुकीची मोठी शक्यता असते. तसेच ऑनलाईन शॉपिंगमुळे क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे फसवणूक होण्याची शक्यता खूप असते. तर काही वेळेस खरेदी करताना पाहिलेल्या वस्तुंऐवजी ग्राहकांना चुकीच्या वस्तू मिळू शकतात. काहीवेळेस शॉपिंग वेबसाईटच काही दिवसात बंद होतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे काही प्रमाणात तोटे ही आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना खरेदीदाराने आपली फसवणूक होणार नाही. याची काळजी घेणं गरजेचं आहे.