विम्यामुळे विमाधारकाला विविध प्रकारच्या संभाव्य आर्थिक हानीपासून संरक्षण मिळते. जसे की, कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यास विम्यामुळे त्याच्या कुटुंबियांना ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते. आरोग्य विमा घेतला असेल तर उपचारांचा खर्च विमा कंपनीकडून मिळतो. आगीचा विमा घेतला असेल तर घराचे नुकसान विमा-कंपनीकडून भरून मिळू शकते. त्याचप्रमाणे सागरी विमा काढला असेल तर समुद्रातील धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या जोखमींचे आर्थिक संरक्षण मिळते. सागरी विम्यातून जहाज, नौका, टर्मिनल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवास करताना किंवा वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते. सामानाची जोखीम कमी करणे हा एकमेव हेतू सागरी विम्याचा आहे. आपण सागरी विम्याचे प्रकार आणि त्याची माहिती समजून घेणार आहोत.
मराठी विश्वकोशामध्ये दिलेल्या माहिती अनुसार, प्राचीन बॅबिलोनियात (आताच्या इराक देशामधील प्रांत) सागरी-विमा प्रचलित होता, याचे पुरावे हामुराबीच्या (इ.स.पू. १७९२ ते १७५०) विधिसंहितेत सापडतात. याच दरम्यान परदेशात व्यापार करणारे भारतीय व्यापारीदेखील सागरी-विमा उतरवीत होते. अशा प्रकारचा सागरी आयुर्विमा ग्रीक व रोमन लोकांना ज्ञात होता, असं यात म्हटले आहे. साधारणपणे सागरी विमा हा व्यावसायिक गरजेचा भाग म्हणून घेतला जातो.
सागरी विमा म्हणजे काय?
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात सागरी विम्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. बँकिंग आणि जहाज वाहतूक यांचा सागरी विम्याशी घनिष्ट संबंध आहे. सागरी धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या जोखमींचा विमा ह्या प्रकारात मोडतो. रेल्वे, रस्ता, समुद्र वा आकाश ह्या मार्गांनी वाहतूक होत असताना होणारी हानी ह्या विमाप्रकाराखाली संरक्षित होते. साधारणत: सागरी विम्याचे 3 ढोबलमानाने 3 प्रकारे पडतात.
1. कार्गो विमा (Cargo Insurance)
2. हल विमा (Hull Insurance)
3. मालवाहतूक विमा (Freight Insurance)
1. कार्गो विमा (Cargo Insurance)
कार्गो विमा ही शिपमेंट्सचे भौतिक नुकसान किंवा चोरीपासून संरक्षण करण्यासाठी वापरली जाणारी विमा पद्धती आहे. कार्गो विम्यामुळे मालाचे मूल्य हवाई, समुद्र किंवा जमिनीच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून संरक्षित असल्याची खात्री होते.
2. हल विमा (Hull Insurance)
समुद्रातील सफर ही धोक्याची सफर मानली जाते. नैसर्गिक संकटांबरोबरच समुद्री लुटेरे आणि किनाऱ्यावरील लुटारूंपासून मालाची काळजी घ्यावी लागते. हे धोके लक्षात घेऊन जो विमा उतरवला जातो त्याला हल विमा म्हणतात. विमा विशेष प्रवास करताना किंवा प्रवास करताना ठराविक काळासाठी जहाजाचा विमा उतरवला जातो.
3. मालवाहतूक विमा (Freight Insurance)
मालाची ने-आण असुरक्षितपणे करता यावी यासाठी शिपिंग कंपनीद्वारे हा विमा काढला जातो. मालाची वाहतूक करताना जर काही वस्तू हरवल्यास शिपिंग कंपनींना फ्रेट मिळत नाही.
सागरी विम्यामधून अशी सुरक्षितता मिळू शकते
- मालाची वाहतूक करताना जहाजावरील व्यक्ती किंवा सामान पाण्यात बुडाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.
- जहाजामधील मालाला किंवा जहाजाला आग लागल्यास किंवा कोणत्याही जहाजामध्ये स्फोट झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.
- बंदर, टर्मिनल, वाहक यासारखी ऑफशोअर आणि ऑफशोअर नसलेल्या मालमत्ता देखील जोखीम कव्हरेज अंतर्गत येतात.
- बंदरात मालवाहतूक करताना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.
- दुसऱ्या जहाजाला टक्कर झाल्यास नुकसान भरपाई तर मिळतेच पण या दुर्घनेतील तिसऱ्या पक्षाला देखील नुकसान भरपाई मिळते.
- परदेशी वस्तूंमध्ये पाणी मिसळल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई होते.
सागरी विमा हा सर्वसामान्य प्रवासी तसेच समुद्रावर काम करणारे कर्मचारी, समुद्री जहाज, समुद्री नौका, मालवाहू वाहतुकीची साधने यांच्याबरोबरच त्याच्यावर लादला गेलेला माल किंवा सामान या सर्वाची जोखीम या विम्यामध्ये कव्हर होते. त्यामुळे सर्व सागरी व्यवसायिकांनी अशा प्रकारचा सागरी विमा काढायला पाहिजे.