Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अशी मिळवा विमा भरपाई… Insurance Reimbursement

अशी मिळवा विमा भरपाई… Insurance Reimbursement

मृत्यूच्या दाव्यानंतर वारसदारांना विम्याची भरपाई मिळवण्याची ही प्रक्रिया करावी लागते पूर्ण.

सर्वसाधारणपणे कोणत्याही विमा कंपन्या (Insurance Company) दाव्याचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी सजग असतात. मात्र अनेकदा विमा उतरवताना महत्त्वाची माहिती सांगितली जात नाही. कालांतराने महत्त्वाची माहिती दडवून घेतल्यामुळे कदाचित दाव्याचे पैसे वेळेवर मिळण्यास अडचणी येतात.

दाव्याच्या वेळी पॉलिसी सक्रिय हवी

पॉलिसी खरेदी करताना व्यक्तीने आपल्या उत्पन्नावर नेहमीच लक्ष ठेवायला हवे. यानुसार हप्ता भरण्यात खंड पडणार नाही. हप्ता वेळेवर जमा झाला नाही तर पॉलिसी लॅप्स होण्याची शक्यता अधिक राहते. पॉलिसी बंद असेल तर मृत्युच्या दाव्यापासून वारसदारांना वंचित राहावे लागते. नियमित हप्ते न भरल्यास कंपनीकडून दावा फेटाळला जावू शकतो.

प्लॅन खरेदी करताना स्वत: अर्ज भरा

विमा पॉलिसीची खरेदी करताना ग्राहकाने प्रस्तावाच्या मुद्याचे आकलन करून अर्ज भरायला हवा. सर्व माहितीची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. विमा ही परस्पर विश्वासाची गोष्ट आहे. कंपनीने उत्पादनाची इंत्यभूत माहिती देण्याबरोबरच ग्राहकांनी देखील स्वत:चे आरोग्य, कौटुंबिक पार्श्वभूमी, सवयी याची माहिती कंपनीला द्यायला हवी. या सर्व माहितीच्या आधारे कंपनी ग्राहकाला विमा जोखमीबाबतचा सल्ला देते आणि त्यानुसार विमा उतरवला जातो. यानुसार प्रक्रिया पार पाडली तर दाव्याचा निपटारा सुरळीतपणे होऊ शकतो. याशिवाय आजारपण गंभीर असेल तर विमा कंपनी त्यानुसार हप्ता निश्चित करते. म्हणूनच अर्ज भरताना केलेली एक चूक देखील महाग पडू शकते. लपवलेल्या गोष्टींमुळे दाव्याची भरपाई मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

वारसदाराची नोंद करा

विमा कायदा 1938 च्या सेक्शन 39 मध्ये विमाधारकाला पॉलिसीत 18 पेक्षा अधिक वयोगटातील मुलांना वारस म्हणून नोंद करता येते. तसेच कमी वयोगटातील व्यक्तीला नॉमिनी करायचे असेल तर पॉलिसीच्या सेक्शन 38 नुसार काही प्रक्रिया पार पाडावी लागेल. याशिवाय विम्याच्या प्रस्तावपत्रात  प्रौढ वारसदाराचा उल्लेख असेल तर पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर त्याला दावा करण्याचा अधिकार मिळतो. विमाधारकाने वारसदार नेमण्या संदर्भातील हक्काचा चांगल्या रितीने वापर करायला हवा. उदा. एखाद्या व्यक्तीने विवाहापूर्वी पॉलिसी खरेदी केली असेल आणि त्याने आई वडिलांना नॉमिनी केले असेल आणि विवाहानंतर नॉमिनीत बदल करून पत्नीला वारस म्हणून नेमले असेल तर त्याची माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे आहे. याशिवाय नॉमिनीचे निधन झाले असेल तर त्याची माहिती देखील विमा कंपनीला तातडीने देणे गरजेचे आहे.

दाव्याच्या वेळी कागदपत्रे जमा करा

विमाधारकाच्या मृत्यूनंतर जेव्हा कुटुंबाकडून विमा कवचची रक्कम मिळवण्याबाबत दावा केला जातो. तेव्हा त्यावेळी आवश्यक कागदपत्रेही जोडणे गरजेचे आहे. गरजेनुसार नॉमिनीचा फोटो असणे आवश्यक आहे. विमा धारकाच्या मृत्युचे कारण, पोस्टमार्टमचा रिपोर्ट, अन्य कागदपत्रे सादर करायला हवेत. पुरेशी कागदपत्रे असतील तर विमा कंपनीकडून दावा फेटाळला जाणार नाही. याशिवाय दाव्याच्या अर्जाबरोबरच मृत्यु प्रमाणपत्र, स्मशानभूमीचे प्रमाणपत्र, मूळ पॉलिसी बाँड, आजारपण असेल तर त्याच्या उपचाराची कागदपत्रे, अपघाती मृत्यू झाल्यास पोलिसांकडील FIR ची प्रत किंवा नोंदीची प्रत आदी कागदपत्रे देणे गरजेचे आहे. तसेच वारसदाराचे पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासी पुरावा, पासबुक आदी गोष्टी देखील द्याव्या लागतात. यानंतरही दावा फेटाळला जात असेल तर प्रत्येक कंपनीत भरपाई विभागात क्लेम रिव्ह्यू समिती असते. पॉलिसी धारक या समितीकडे अर्ज करू शकतो. या समितीत फेटाळलेल्या दाव्याची पडताळणी केली जाते. यावरही आपले समाधान होत नसेल तर विमा लोकपालकडे तक्रार करता येऊ शकते.