आर्थिक नुकसानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी विमा काढला जातो. विमाधारकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी विविध प्रकारचा विमा उतरवला जातो. आरोग्य विमा (health insurance), जीवन विमा (life Insurance), कार विमा (car insurance), प्रवास विमा (travel insurance), मालमत्ता विमा (property insurance), मोबाईल विमा (mobile insurance), आग विमा (fire insurance) असे विम्याचे विविध प्रकार आहेत. या विम्या प्रकारातील फायर इन्श्युरन्स (आग विमा) विषयी आपण आज माहिती घेणार आहोत.
तुम्ही फायर इन्श्युरन्स घेतला असेल आणि तुमच्या घराला, मालमत्तेला आग लागली तर या विम्याद्वारे तुम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाते. फायर इन्श्युरन्स काढल्यानंतर त्याचा हफ्ता न चुकता भरत असाल आणि आगीमुळे तुमच्या घराचे, मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनी तुम्हाला पैसे देते. फायर इन्श्युरन्स हा घरासाठी, ऑफिससाठी, दुकानासाठी उतरवला जातो. घरात, दुकानात अथवा कंपनीत कोणत्या कारणानेही आग लागू शकते. आग लागल्यानंतर तुमचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे हा विमा अतिशय महत्त्वाचा असतो. आगीच्या घटनेमुळे तुमचे झालेले नुकसान या विम्यामुळे भरून निघते. अनेक कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकल असते. अशा ठिकाणी फायर इन्श्युरन्स हा अतिशय गरजेचा असतो.
फायर इन्श्युरन्सचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. आपण या प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत.
व्हॅल्ह्यू पॉलिसी (Valued Policy)
आग लागल्यानंतर मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान भरून काढणे सर्वसामान्यांसाठी शक्य नसते. अशावेळी व्हॅल्यू पॉलिसी घेतली असेल तर तुमच्या घरात, दुकानात अथवा कंपनीत आग लागल्यानंतर तुम्हाला किती पैसे विमा कंपनी देणार हे आधीच ठरलेले असते. ही रक्कम तुमच्या मालमत्तेपेक्षा कमी किंवा अधिक असू शकते. ज्या वस्तूंचे मूल्य सहजपणे निश्चित करता येत नाही, अशा गोष्टींसाठी ही पॉलिसी उतरवली जाते. चित्रं, शिल्पं यासाठी या पॉलिसीचा अधिक वापर केला जातो.
स्पेसिफिक पॉलिसी (Specific Policy)
स्पेसिफिक पॉलिसी किंवा विशिष्ट धोरणांतर्गत या पॉलिसीद्वारे ठरावीक रक्कमेपर्यंतच विमाधारकाचे झालेले नुकसान भरून दिले जाते. विमा काढतानाच आगीमुळे नुकसान झाल्यास किती पैसे विमाधारकाला मिळणार हे ठरलेले असते. पण विमाधारकाला मिळणारी ही रक्कम कधीही वास्तविक मूल्यापेक्षा कमी असते.
एव्हरेज पॉलिसी (Average Policy)
एव्हरेज पॉलिसीत एका विशिष्ट सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून ठरवली जाते. यासाठी पुढील सूत्र वापरले जाते. विमाधारकाला मिळणारी रक्कम = (विमा काढलेली रक्कम/मालमत्तेचे मूल्य)* वास्तविक नुकसान. या सुत्रानुसार आग लागल्यानंतर विमाधारकाला किती पैसे मिळणार हे ठरवले जाते. ही रक्कम मालमत्तेच्या रक्कमेपेक्षा कमी अथवा अधिक असू शकते.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या घराची किंमत 2 लाख रुपये असेल आणि त्याने त्या घरासाठी एक लाखाचा विमा काढला असेल आणि त्या घराला आग लागल्यामुळे त्या व्यक्तीचे दीड लाखाचे नुकसान झाले असेल तर (100000/200000)*150000 = 75000 इतकी रक्कम विमाधारकाला कंपनीकडून मिळेल.
फ्लोटिंग पॉलिसी (Floating Policy)
फ्लॉटिंग पॉलिसी ही सामान्य लोक जास्त प्रमाणात घेत नाहीत. ही पॉलिसी व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात घेतात. व्यापाऱ्यांचा माल हा वेगवेगळ्या गोदामांमध्ये साठवलेला असतो. या पॉलिसी अंतर्गत गोदामांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींचे आगीपासून नुकसान झाल्यास संरक्षण मिळते. त्यामुळेच विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेला आगीपासून संरक्षण मिळावे यासाठी व्यापारी फ्लॉटिंग पॉलिसी घेण्याला प्राधान्य देतात. आयात-निर्यात करणाऱ्या कंपन्या फायर इन्श्युरन्स घेताना फ्लोटिंग पॉलिसीच घेतात. कारण त्यांचा माल हा कधीच एका ठिकाणी नसतो.
कॉम्प्रेहेन्सिव पॉलिसी (comprehensive policy)
फायर इन्श्युरन्सच्या कॉम्प्रेहेन्सिव पॉलिसीच्या अंतर्गत घरफोडी, आग, संप, युद्ध, चोरी या कोणत्याही गोष्टीमुळे वस्तूचे नुकसान झाले तर तुम्हाला संरक्षण मिळते.
रिप्लेसमेंट पॉलिसी (Replacement Policy)
आगीमुळे तुमचे जितक्या पैशांचे नुकसान झालेले असते, तितकी रक्कम तुम्हाला विमा कंपनीकडून दिली जाते. रिप्लेसमेंट पॉलिसी तुम्ही घेतली असेल आणि तुमच्या मालमत्तेचे आगीमुळे नुकसान झाले तर पैसे देण्याऐवजी कंपनी तुम्हाला त्याच रक्कमेची दुसरी जागा देखील देऊ शकते.
फायर इन्श्युरन्समध्ये या गोष्टींचा समावेश होतो
आग ही अचानक लागलेली असावी.
मालमत्तेचे नुकसान हे आगीमुळे झालेले असावे.
आग लागल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे किंवा धुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.
आग लागल्यानंतर मालमत्ता वाचवण्यासाठी त्या वस्तू फेकण्यात आल्या आणि त्यात त्या वस्तूंचे नुकसान झाले तरी या विम्या अंतर्गत संरक्षण मिळते
आग विझवताना पाण्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले असेल तरीही विमाधारकाला पैसे मिळतात.
वीज पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.
विमानाचा एखादा भाग मालमत्तेवर पडल्यामुळे नुकसान झाल्यास विमाधारकाला कंपनीकडून भरपाई मिळते.
फायर इन्श्युरन्समध्ये या गोष्टींचा समावेश होत नाही
विमाधारकाच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे जर आग लागली असेल किंवा विस्फोट झाला असेल तर विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देत नाही
भूकंप ,विदेशी आक्रमण ,नागरिकांमध्ये काही संघर्ष झाल्यावर लागलेल्या आगीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देत नाही
इन्श्युरन्सचा हफ्ता किती भरायचा हे कशाप्रकारे ठरवले जाते?
प्रत्येक इन्श्युरन्स कंपनीचे नियम वेगवेगळे असतात. त्यामुळे इन्श्युरन्सचा हफ्ता किती असणार? विमाधारकाला आग लागल्यास किती रूपयांपर्यंतचे संरक्षण मिळणार? हे प्रत्येक कंपनीच्या नियमानुसार ठरवते. मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे. ती कोणत्या ठिकाणी आहे. तिचा आजूबाजूचा परिसर काय आहे. मालमत्तेत आगीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी केल्या आहेत का? यानुसार कंपनी विम्याच्या हफ्त्याची रक्कम ठरवते.
पॉलिसी विषयी महत्त्वाच्या गोष्टी
फायर इन्श्युरन्स पॉलिसी घेताना विमाधारकाने कंपनीला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट विमाधारकाने कंपनीपासून लपवू नये. अन्यथा त्याचा परिणाम पॉलिसी क्लेम करताना होऊ शकतो. अनेक फायर पॉलिसींचा कालावधी हा एका वर्षाचा असतो. त्यामुळे या पॉलिसीचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागते आणि पॉलिसी ज्याच्या नावावर आहे, त्याच व्यक्तीला आग लागल्यानंतर नुकसान भरपाई मिळते.