आपल्या मालकीचे घर खरेदी करणे हे सामान्य माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करताना आपल्या घराचे नैसर्गिक आपत्ती आणि अन्य कारणांनी नुकसान झाल्यास आपण ते कसे भरुन काढणार याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी घराचा विमा (Home Insurance) काढणे ही सध्याच्या काळात अत्यावश्यक गोष्ट बनली आहे.
भूकंप, पूर, वादळे, पाऊस, आग यांसारख्या आपत्तींच्या काळात घरातील फर्निचर तसेच फ्रीज, टिव्ही, वॉशिंग मशीन, एसी, कुलर यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे नुकसान होऊ शकते. अशा नुकसानीची भरपाई गृह विमा अंतर्गत मिळू शकते. घराच्या विमा पॉलिसीत दोन गोष्टींचा विचार केला जातो. पहिली गोष्ट ही नैसर्गिक आपत्तीची असते. आपत्तीत घर पूर्णपणे नष्ट झाले, घराच्या बांधकामाचे मोठे नुकसान झाले तर ते विमा कंपनीकडून भरुन दिले जाते. यामध्ये फक्त घर बनविण्यासाठी येणारा खर्चच भरुन दिला जातो. घराच्या बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जात नाही.
घराची किंमत 50 लाख रुपये असेल आणि त्यातील जमिनीची किंमत 30 लाख रुपये असेल तर विमा कंपनी तुम्हाला 10 लाख रुपयांचीच भरपाई प्रदान करेल. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही ते घर परत बांधू शकता. विमा कंपनीकडून दिली जाणारी भरपाई ही त्या घराचा बिल्ट ऑफ एरिया आणि घराच्या बांधकामासाठी येणार्या खर्चावर अवलंबून असते. घराचा बिल्ट ऑफ एरिया 2 हजार चौरस फूट असेल आणि बांधण्यासाठी 10 हजार रुपये प्रति चौरस फूट एवढा खर्च करावा लागत असेल तर तुम्हाला 20 लाख रुपयांचे विमासंरक्षण कवच मिळेल.
घराला नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान होण्याची शक्यता कितपत आहे याचा विचार विमा कंपनीकडून केला जातो. घर नदीजवळ असेल आणि तेथे अतिवृष्टी होऊन पूर येण्याची शक्यता असेल तर अशा वेळी गृह विमा पॉलिसीसाठी अधिक हफ्ता भरावा लागतो.
दुसर्या प्रकारात घरामध्ये कोणकोणत्या मौल्यवान वस्तु आहेत याचा विचार केला जातो. फर्निचरपासून इलेस्ट्रॉनिक वस्तू, दागदागिन्यापर्यंत सर्व वस्तुंना विमा संरक्षण कवच मिळू शकते. या वस्तुंचा घसारा (Depreciation) काढून जेवढी किंमत येईल, त्या किमतीवर विमा कंपन्या संरक्षण कवच देतात. त्या वस्तुंची सध्याची किंमत तुम्हाला मिळत नाही. त्या वस्तू खरेदी करुन किती वर्षे झाली आहेत, याचा विचार भरपाई देताना विमा कंपन्याकडून केला जातो.
याखेरीज विमा कंपन्या आणखीही काही कारणांसाठी विमा संरक्षण देतात. घर तयार करण्यासाठी येणारी आर्किटेक्टची फी, बांधकामासाठी झालेला राडा-रोडा हटविण्याचा खर्च, अपघात या गोष्टींनाही विमा संरक्षण कवच दिले जाते.
हे लक्षात ठेवा
- घर आणि मौल्यवान वस्तू यांचा वेगवेगळा विमा काढता येतो. घराबरोबर सर्व वस्तुंचाही विमा काढण्याचा पर्याय कंपनीकडून दिला जातो.
- आपल्या गरजेनुसार तुम्ही कोणती विमा पॉलिस घ्यायची याचा निर्णय घेऊ शकता.
- अधिक वर्षाची पॉलिसी असेल तर ग्राहकाला हफ्त्यामध्ये सवलत दिली जाते.
- पॉलिसी काढताना मालमत्तेची किंमत, घरातील वस्तूच्या किंमतीचा हिशोब केला जातो. म्हणून वस्तुंची बिले सांभाळून ठेवणे आवश्यक असते.
- इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किमती वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात.