Economic Survey: केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी, 2023 रोजी संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman, Finance Minister, Govt of India) या हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यापूर्वी त्याच्या एक दिवस अगोदर अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल संसदेत सादर केला जातो. हा आर्थिक अहवाल का महत्त्वाचा असतो. हे आपण आज जाणून घेणार आहोत.
अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी म्हणजे 31 जानेवारीला संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाईल. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022-23 या आर्थिक वर्षाचा असेल. या अहवालात गेल्या वर्षभरातील आकडेवारी दिलेली असते.
Table of contents [Show]
आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात काय असते?
देशातील उद्योगांची संख्या कितीने वाढली किंवा कमी झाली. देशावर कर्ज किती आहे. या वर्षभरात सरकारने कोणत्या विभागावर किती पैसे खर्च केले. त्याचा लाभ किती जणांना मिळाला, अशाप्रकारची संख्यिक माहिती यात दिलेली असते. या माहितीच्या आधारे सर्वसामान्य किंवा अभ्यासकांना देशातील प्रगतीचा किंवा एकूण देशाचा कारभाराचा आढावा कळण्यास मदत होते. तसेच येणाऱ्या काळात देशाची आर्थिक परिस्थिती काय असू शकते, याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षणातून कळू शकतो. या अहवालातून देशाचे अर्थ खाते देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडते.
आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल कोण तयार करतं?
आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल हा अर्थ विभागाचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांची टीम तयार करते. मुख्य आर्थिक सल्लागारांची निवड भारताचे पंतप्रधान करतात. तसेच हा अहवाल अर्थमंत्री संसदेत मांडतात.
अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात काय फरक आहे?
अर्थसंकल्प हा नेहमी आगामी वर्षाचा मांडला जातो. यामध्ये मागील वर्षाचा जमा-खर्च दिला जातो. जसे की, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सितारामण या 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. तर आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल हा 2022-23 या आर्थिक वर्षाचा असेल. यामध्ये चालू वर्षातील योजनांचा, खर्चाचा आणि आकडेवारींचा समावेश असतो.
आर्थिक सर्वेक्षण अहवाल लाईव्ह कोठे पाहता येईल?
आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र सरकारच्या अधिकृत वाहिन्यांवर पाहता येईल. यामध्ये संसद टीव्ही, पीआयबी इंडिया यावर थेट लाईव्ह प्रक्षेपण प्रसारित होते.
PIB ची YouTube लिंक
https://www.youtube.com/@pibindia/videos
अर्थ मंत्रालयाची फेसबुक लिंक
https://www.facebook.com/finmin.goi
Twitter वरील अपडेटसाठी
https://twitter.com/FinMinIndia
आर्थिक पाहणी 2022-23 अहवाल
आर्थिक पाहणी 2022-23 अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर ती खालील वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध असेल. https://www.indiabudget.gov.in/economicsurvey
केंद्र सरकारच्या इंडियन बजेट या वेबसाईटवर आर्थिक पाहणीचा अहवाल उपलब्ध असतो. मागील वर्षाचा म्हणजे 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा पाहणी अहवाल सादर केला होता. हा अहवाल वेबसाईटवर उपलब्ध असून त्यात सरकारच्या विविध विभागांची आकडेवारी दिलेली आहे. 31 जानेवारी, 2023 रोजी 2022-23 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडल्यानंतर तो इतरांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध होईल.