FD Investment Strategy: म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक वाढत असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर भारतीय मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवतात. जोखीम कमी आणि निश्चित परतावा असल्यामुळे मुदत ठेवी प्रसिद्ध आहेत. तसेच सध्या अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे FD अलीकडच्या काळात अधिक आकर्षक झाल्या आहेत.
दरम्यान, एकाच बास्केटमध्ये सर्व अंडी ठेवू नयेत, हा विचार गुंतवणूक करताना सर्सास वापरला जातो. आणि तो अगदी बरोबर देखील आहे. सोने, रिअल इस्टेट किंवा इक्विटीमध्ये सर्व गुंतवणूक न ठेवता सर्व पर्यायांमध्ये विभागून गुंतवणूक करावी. (FD laddering strategy) तसेच मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवताना एकाच मुदत ठेव योजनेत सर्व पैसे गुंतवण्याचा निर्णयही चुकीचा ठरतो. त्यामुळे लँडरिंग ही रणनीती FD मध्ये गुंतवणूक करताना फायद्याची ठरू शकते.
FD लँडरिंग रणनिती म्हणजे काय?( What is FD laddering strategy)
लँडरिंग रणनीती म्हणजे एकाच योजनेत गुंतवणूक करण्याऐवजी विविध मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणे. तसेच योजनांचा कालावधी देखील 1,2,3,4 किंवा 5 असा वेगवेगळा असावा.
उदाहरणार्थ, एक वर्ष FD योजनेत काही रक्कम ठेवावी. त्यानंतर दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेत आणि तीन वर्ष कालावधीच्या योजनेत काही रक्कम ठेवावी.
असे केल्याने दरवर्षी एक FD परिपक्व होईल. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही ते वापरू शकता. अन्यथा व्याजासह दीर्घकालावधीच्या दुसऱ्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवा येतील. आणखी एक वर्षाने दोन वर्ष कालावधीची एफडी परिपक्व होऊन पैसे हातात येतील. एकाच बँकेत या सर्व एफडी न ठेवता विविध बँकांत ठेवल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
आणीबाणीच्या काळात पैशांची गरज होईल पूर्ण?
जास्त परताव्याच्या आशेने दीर्घ मुदतीच्या एकाच योजनेत सर्व पैसे गुंतवल्याने अचानक पैशांची गरज लागली तर अडचणीय याल. मात्र, लँडरिंग पद्धतीने तुम्हाला दरवर्षी परिपक्व झालेल्या FD चे पैसे आणि व्याज मिळेल. (FD laddering strategy) जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही ते पैसे तसेच आणखी दुसऱ्या योजनेत गुंतवू शकता. पैशांची निकड भागण्यासाठी हे अत्यंत फायद्याचे ठरेल. अन्यथा दीर्घकालावधीची FD मोडून तोटा करून घ्यावा लागेल.
लँडरिंग रणनीतीनुसार पैसे गुंतवण्याचे फायदे काय?
बँका सातत्याने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवत असतात. त्यामुळे कमी कालावधीची एफडी परिपक्व झाल्यानंतर त्यातील पैसे काढून तुम्ही जास्त व्याजदर देणाऱ्या योजनेत गुंतवू शकता.
पैशांची तरलता (लिक्विडिटी) निर्माण होते. आणीबाणीच्या काळात पैसे मिळण्याची अडचण दूर होते.
दीर्घमुदतीची एफडी परिपक्व झाल्यानंतर पुनर्गुंतवणूक करत असताना जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता वाढते.
ज्या बँकेत किंवा वित्तसंस्थेत चांगला व्याजदर आहे त्या बँकेत परिपक्व झालेली रक्कम पुन्हा गुंतवण्याचे स्वातंत्र्य मिळते.
विविध योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास कर नियोजन करताना फायदा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी अधिकृत आर्थिक सल्लागाराची मदत लागू शकते.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड सह इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)