Financial Saving & Investment: भविष्यातील गोष्टींचा विचार करता एक चांगला कॉर्पस फंड तयार करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोन्ही संकल्पना तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण बचत आणि गुंतवणुकीबाबत अनेक जणांचा गोंधळ होतो. त्यांना या दोन्ही गोष्टी एकच वाटतात. म्हणजे यातून पैसे वाचतात. हा एकच उद्देश पूर्ण होतो, असे त्यांना वाटते. पण प्रत्यक्षात मात्र असे नाही. बचत आणि गुंतवणूक (Saving & Investment) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन्हीमुळे तुमच्या भविष्यातील आर्थिक अडचणी मात्र नक्की सुटू शकतील. फक्त यातला फरक समजून घेतला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बचत केव्हा आणि कशी केली पाहिजे. तसेच गुंतवणूक कशात केली पाहिजे हे कळले पाहिजे.
बचत आणि गुंतवणूक या दोन्हीमधील सर्वांत मोठा फरक सांगायचा झाला तर तो आहे; जोखीम. म्हणजे तुम्ही किती आणि कशी जोखीम घेऊ शकता यावर बरेचसे अवलंबून आहे. बचत म्हटली तर त्यातून तुम्हाला जोखीम अशी काहीच नाही. पण त्यातून जो परतावा मिळतो तो तुलनेने खूपच कमी असतो. म्हणजे बचतीचे अॅप्रिसिएशन हे तितकेसे नाही. पण गुंतवणूक त्याच्या उलट आहे. गुंतवणूक ही सर्वाधिक परतावा मिळवून देणारी संधी आहे. पण त्याचबरोबर जोखीम ही वाट्याला येतेच.
आपण या दोन संकल्पनांमधील नेमके फरक आणि समानता समजून घेणार आहोत आणि या दोन्ही संकल्पनांचा योग्य पद्धतीने वापर केला तर त्यातून दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण होऊ शकते, हे पाहणार आहोत.
Table of contents [Show]
बचत आणि गुंतवणूक दोन्ही समान आहे का?
बचत आणि गुंतवणूक या दोघांचीही बरीच वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. पण यातून दोघांचंही गोल समान आहे. ते म्हणजे संपत्ती निर्माण करणे. या दोन्हीमधून संपत्ती निर्माण करण्यासाठी काही विशेष खाती सुरू केली जातात. बचत करणारे एखाद्या बॅंकेत सेव्हिंग अकाउंट ओपन करतात आणि त्यात वर्षानुवर्षे पैसे जमा करतात. तर गुंतवणूक बॅंकांच्या मदतीने किंवा ब्रोकर्सच्या मदतीने वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पण गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराकडे बॅंकेत पुरेशी बचत/आपत्कालीन निधी असणे गरजेचे आहे.
बचत आणि गुंतवणुकीत फरक काय आहे?
बचत आणि गुंतवणूक याचा एकत्रित उल्लेख केला की, बहुतांश लोक म्हणजे जवळपास 90 टक्के लोक हे बचत आणि गुंतवणुकीला समान समजतात. काही प्रमाणात यामध्ये साम्य आहे. पण या दोन्हींच्या उदिद्ष्टांमध्ये बराच फरक आहे. जेव्हा आपण बचतीचा विचार करतो. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर बॅंकेतील टिपिकल प्रोडक्टस् येतात. जसे की, बचत खाते, ठेवी इत्यादी. पण जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, ईटीएफ, बॉण्ड्स ही प्रोडक्टस् समोर येतात.
योग्य पर्याय कोणता- बचत की गुंतवणूक?
भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता बचत आणि गुंतवणूक हे दो्ही पर्याय योग्य तर आहेच. पण संपत्ती निर्माण करण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. फक्त यासाठी तुमची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे आणि तुम्ही त्यामध्ये त्याचे प्रमाण कसे निवडता यावर बरेच अवलंबून आहे.
पैशांची बचत केव्हा करावी?
- जर तुम्हाला येणाऱ्या काही वर्षात पैशांची गरज लागणार असेल तेव्हा चांगले व्याज देणाऱ्या बचत खात्यांमध्ये किंवा मनी मार्केट फंडमध्ये पैसे गुंतवणे योग्य ठरू शकते.
- अजून तु्म्ही आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार केला नसेल तर, गुंतवणूक करण्यापूर्वी आपत्कालीन निधीसाठी पैसे जमा करु शकता.
- तसेच तुम्ही कर्ज घेतले असेल आणि त्याचा व्याज जास्त असेल, गुंतवणूक करण्यापूर्वी ते कर्ज बचतीच्या माध्यमातून फेडण्यास प्राधान्य देऊ शकता.
गुंतवणूक केव्हा करावी?
- जर तुम्हाला पुढील 5 ते 6 वर्षांसाठी तातडीने पैशांची गरज भासणार नाही आणि तुम्ही काही प्रमाणात जोखीम घेण्यासाठी तयार आहात. अशावेळी तुम्ही चांगला परतावा मिळवण्याच्या उद्देशाने पैशांची बचत करण्यापेक्षा तो चांगले रिटर्न मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवू शकता.
- तसेच तु्मची सध्याची कोणतीही तातडीची आर्थिक निकड नसेल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तुम्ही चांगल्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी पैसे गुंतवू शकता.