केंद्र सरकारने क्रिप्टो करन्सीला भारतात मान्यता दिली नसली तरी त्यामधील गुंतवणूक आणि नफ्यावर कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष 2022 मधील बजेटमध्ये सरकारने क्रिप्टो करन्साला व्हर्च्युअल डिजिटल असेट अशी व्याख्या जाहीर केली होती. यात क्रिप्टो करन्सी, एनएफटी टोकन्स (Crypto/NFTs) अशा डिजिटल चलनांचा समावेश आहे. यातून होणाऱ्या उत्पन्नावर 30% कर लागू केला जाणार आहे.
आयकर रिटर्न फायलिंगची प्रक्रिया सुरु झाली आहे. वैयक्तिक करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत रिटर्न फायलिंग करता येईल. विलंब शुल्काद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत रिटर्न फायलिंग करता येणार आहे.
आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये क्रिप्टो करन्सीशीसंबधित ज्या गुंतवणूकदारांनी उत्पन्न मिळवले आहे अशांना आयकर रिटर्न भरताना क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील सादर करावा लागेल. हे उत्पन्न भांडवली नफा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. जर क्रिप्टो आणि एनएफटीमध्ये गुंतवणूक ट्रेडिंगसाठी केलेली असेल तर त्यातून मिळणारे उत्पन्न व्यावसायिक स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न असे आयकर रिटर्नमध्ये दाखवावे लागेल.
व्हर्च्युअल डिजिटल असेटसाठी नवीन आयटीआर फॉर्ममध्ये स्वतंत्र विभाग दर्शवण्यात आला आहे. त्यात क्रिप्टो करन्सी आणि एनएफटीमधून मिळणाऱ्या नफ्याचा उल्लेख करता येईल.
क्रिप्टो करन्सीवर कसा कर लागू होणार
- क्रिप्टो करन्सीचा व्हर्च्युअल डिजिटल असेटमध्ये समावेश करण्यात आल्याने त्यावर कर लागू होणार आहे.
- आयकर सेक्शन 115BBH नुसार क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमधील नफ्यावर 30% कर लागू होईल.
- आयकर सेक्शन 194S नुसार क्रिप्टो मालमत्ता हस्तांतर केल्यास त्यावर 1% टीडीएस लागू होणार आहे.
- टीडीएस कर लागू होण्यासाठी क्रिप्टो असेट ट्रान्सफरचे मूल्य 10000 रुपये ते 50000 रुपयांच्या दरम्यान असेल तरी टीडीएस लागू होणार आहे. 1 जुलै 2022 पासून हा कर लागू झाला आहे.
- आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये ज्यांनी क्रिप्टो ट्रान्सफर केले आहेत अशा सर्वच श्रेणीतील गुंतवणूकदारांना कर द्यावा लागणार आहे.
- क्रिप्टो ट्रेडिंगमधील मिळालेल्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गेनसाठी एकच कर लागू असेल.
- क्रिप्टो करन्सी, एनएफटी टोकन्समधील ट्रेडिंग, विक्री किंवा करन्सी स्वॅपिंगसारख्या व्यवहारांवर 30% टॅक्स आणि 4% सरचार्ज लागू होईल.
- क्रिप्टो करन्सी किंवा एनएफटीमधून मिळालेले उत्पन्न भांडवली नफा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
- क्रिप्टो आणि एनएफटीमधील उत्पन्नावर कोणतेही कर सवलत किंवा वजावट नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
क्रिप्टो करन्सीचे कोणते व्यवहार टॅक्ससाठी पात्र ठरतील
- वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना क्रिप्टो करन्सीने व्यवहार केल्यास
- दोन भिन्न क्रिप्टो करन्सीची अदला बदल केल्यास
- रुपयाचा वापर करुन क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग केल्यास
- क्रिप्टो करन्सीमधून पेमेंट स्वीकारले तर टॅक्स लागू होऊ शकतो.
- गिफ्ट म्हणून क्रिप्टो करन्सीचा स्वीकार केला असल्यास
- क्रिप्टो करन्सीची छपाई केल्यास
- क्रिप्टो करन्सीमध्ये सॅलरी घेतली असल्यास त्यावर कर लागू होतो.
- क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून एखाद्या कंपनीची हिस्सेदारी खरेदी केल्या
- एअरड्रॉप्स स्वीकारल्यास टॅक्स लागू होऊ शकतो.