Chit Fund: वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही वाचले किंवा असेलच की, 3 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याच्या नादात ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक. यापूर्वी शेरेकर स्कीम किंवा शारदा चिट फंडद्वारे लोकांची अशीच फसवणूक करण्यात आली होती. सरकारने अशा फसवणुकीपासून गुंतवणूकदारांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी 1982 मध्ये चिट फंड नियमन कायदा आणला होता. चला तर जाणून घेऊयात चिट फंड म्हणजे नेमके काय? आणि याद्वारे लोकांची कशी फसवणूक केली जाते.
Table of contents [Show]
चिट फंड म्हणजे काय?
चिट फंड कायदा, 1982 मध्ये केलेल्या व्याख्येनुसार, चिट म्हणजे चिट, चिटफंड, चिठ्ठी, कुरी किंवा इतर कोणत्याही नावाने केले जाणारे व्यवहार. चिट फंड याला भारतात अनेक वर्षांचा इतिहास आहे. याचा वापर बचत योजना म्हणूनही केला जातो. बऱ्याचवेळा आपली निकडीची गरज भागवण्यासाठी अशा चिट फंडचा वापर केला जातो. चिट फंडच्या कायद्यानुसार चिट फंड कंपन्यांचे रजिस्ट्रेशन आणि नियमन हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. कायद्यातील कलम 61 अनुसार चिट रजिस्ट्रारची नियुक्ती सरकारद्वारे केली जाते.
चिट फंडमध्ये प्रामुख्याने बऱ्याचदा आपल्या परिचयातील, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये एका नियमाला धरून पैशांची देवाण-घेवाण केली जाते. या नियमानुसार, एक ठराविक रक्कम लोकांकडून जमा केली जाते आणि त्याची दिलेली मुदत संपली की, ती जमा केलेली रक्कम ठरलेल्या व्याजासह लोकांना परत केली जाते.
चिट फंड कंपन्यांचा व्यवसाय कसा चालतो?
चिट फंड कंपन्यांचा व्यवसाय हा अशा एजंट / दलालांद्वारे चालतो जे आपल्या जवळचे नातेवाईक, शेजारी आणि ओळखीच्या लोकांकडून गुंतवणुकीसाठी पैसे गोळा करत असतात. बऱ्याचदा हे एजंटच गॅरंटी म्हणून मानले जातात. त्यांच्या विश्वासावर गावागावातून गुंतवणूक केली जाते. सुरूवातीला या स्कीममध्ये प्राथमिक पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले जाते. ते पूर्णही केले जाते. पण जसजसा लोकांचा विश्वास बसतो. तसे लोक मोठमोठ्या रकमेची गुंतवणूक करतात. काही लोक कर्ज काढून गुंतवणूक करतात. अशाप्रकारे लोकांना कमी दिवसांत पैसे दुप्पट मिळवून देण्याचे आमिष दाखवले जाते.
बऱ्याचवेळी चिट फंड कंपन्यांकडून जाहिरातींसाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींची मदत घेतली जाते. त्यांना घेऊन जाहिरात केल्याने लोकांचा त्यावर लगेच विश्वास बसतो आणि लोक त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागतात. या अशाप्रकारच्या कामासाठी चिट फंड कंपन्या दलालांना 25 ते 40 टक्क्यापर्यंत कमिशन देते. त्यामुळे हे दलाल कमिशनसाठी आपल्या जवळच्या लोकांनाच चिट फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात.
चिट फंड कंपन्या जमा निधी कुठे गुंतवतात?
चिट फंड कंपन्या प्रामुख्याने गुंतवणूकदारांकडून जमा झालेला निधी शेअर मार्केट, रिअल इस्टेट, हॉटेल, मनोरंजन आणि ट्रॅव्हलिंग, मायक्रो फायनान्स, न्यूजपेपर, न्यूज चॅनेल आणि राजकीय व्यक्ती किंवा सेलिब्रिटींशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत असतात.
चिट फंडमध्ये फसवणूक कोठे होते?
चिट फंड कंपन्यांमध्ये सुरूवातीला गुंतवणूकदारांना सांगितल्याप्रमाणे लहान रक्कम दुप्पट करून दिली जाते. पण जेव्हा गुंतवणुकीचे आकारमान वाढते तेव्हा चिट फंडमधील कंपन्यांना पैसे दुप्पट करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू लागते. त्यात नवीन गुंतवणूकदार येत नसतील तर कंपनीवरील प्रेशर वाढते आणि कंपनीला लोकांचे पैसे देणे अवघड जाते. तेव्हा बहुतांश चिट फंड कंपन्या आपला गाशा गुंडाळून पसार होतात. जोपर्यंत नवीन गुंतवणूकदार येत असतात, तोपर्यंत ही स्कीम व्यवस्थित चालत राहते. पण त्यात खंड पडला की, कंपनीचे पितळ उघडे पडते.
फसवणुकीपासून संरक्षण कसे करावे?
चिट फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वप्रथम ती कंपनी कोणत्या राज्यामध्ये नोंद केलेली आहे, याची माहिती घ्यावी. ज्या कंपन्यांकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही अशा कंपन्यांपासून दूरच राहावे. आणि ज्या कंपन्या रजिस्ट्रेशन नंबर दाखवत असतील. त्या कंपन्यांकडे अधिकृत कागदपत्रांची मागणी करून त्याची सत्यता सरकारी यंत्रणेकडून पडताळून घ्यावी. तसेच ज्या चिट फंड कंपन्या कमी वेळेत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत असतील, अशा कंपन्यांपासून दूरच राहावे.