गुंतवणुकीसाठी जनतेकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुदत ठेवी, शेअर्स, सोने, रिअल इस्टेट, सरकारी योजना इ. यासोबतच बाँड म्हणजेच रोखे हा पर्याय देखील उपलब्ध आहे. मात्र, अनेकजणांना बाँड म्हणजे काय माहिती नसते. त्यातून किती परतावा मिळतो. गुंतवणूक सुरक्षित आहे की नाही? किती कालावधीचे बाँड खरेदी करता येतात? याबाबत माहिती नसते. या लेखात पाहूया बाँडमध्ये कशी गुंतवणूक करू शकता. तसेच मुदत ठेवी म्हणजे FD च्या तुलनेत बाँडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का?
बाँड म्हणजे काय? (What ibs bond)
एखाद्या कंपनीला पैसे उभारायचे असतील तर त्यांच्याकडे विविध पर्याय असतात. जसे की, बाजारात IPO (initial public offering), FPO (Follow-on Public Offer) आणणे, बँकेकडून कर्ज घेणे यासह इतरही काही पर्याय असतात. मात्र, बऱ्याच वेळा कंपनी IPO FPO ऑफर आणत नाही. कंपनीला स्वत:चा हिस्सा कमी करायचा नसतो किंवा भागधारकांची संख्या वाढवायची नसते. अशा वेळी बँकेकडून कर्ज घेणे हा पर्यायही उपलब्ध असतो. मात्र, उद्योगांना बँकेकडून चढ्या दराने कर्ज मिळते.
12 -13 टक्के व्याजदराने बँकेकडून पैसे घेण्याऐवजी बँक थेट जनतेकडून पैसे घेते. त्यासाठी बाजारात रोखे आणते. यावर ठराविक कालावधीसाठी व्याजदर मिळतो. यामध्ये कंपनीचा आणि गुंतवणुकदाराचाही फायदा होता. त्यांना बँकेपेक्षा कमी दराने पैसे मिळतात, आणि गुंतवणुकदारांनाही निश्चित दराने परतावा मिळतो. सरकारी कंपन्या आणि खासगी कंपन्या दोन्ही बाँड बाजारात आणतात.
बाँडमधून किती परतावा मिळू शकतो? (How much return you can expect from bond)
ज्या प्रमाणे एखाद्या शेअरला इश्यू प्राइज असते त्याप्रमाणे कंपनी बाँड बाजारात आणते तेव्हा त्याला इश्यू प्राइज असते. उदाहरणार्थ टाटा मोटर्स कंपनीने बाँड बाजारात आणला आणि त्याची इश्यू प्राइज 2 हजार रुपये ठेवली तर त्यावर एक कूपन रेट जारी केला जातो. हा कूपन रेट म्हणजेच बाँडवरील व्याजदर. हा व्याजदर कंपनी ठरवते. सहसा मुदत ठेवींवर 6-7% व्याजदर मिळतात. त्यापेक्षा बाँडवरील व्याजदर जास्त असल्याची शक्यता असते. बाँडमधील हे व्याज वार्षिक मिळते. एकदा बाँड विकत घेतल्यानंतर त्याची सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीही करता येते. ज्या बाँडवर जास्त व्याजदर आहेत ते बाँड घेण्याकडे गुंतवणुकदारांचा कल असतो. तर कमी व्याजदर असणारे जुने बाँड अनेक जण विकतात. असे बाँड स्वस्तात खरेदीकरून चांगला परतावा ही मिळवता येतो.
बाँडचा कालावधी किती? (Tenure of investment in Bond)
कंपनीद्वारे एका ठराविक कालावधीसाठी बाँड इश्यू केले जातात. त्यास रिडम्शन इयर (Bond redemption year) असेही म्हणतात. हा कालावधी कंपनी ठरवते. 1,2,3,5 असा काहीही असू शकतो. जर पाच वर्षांचा बाँड असेल तर बाँडवर वार्षिक व्याज मिळत राहील आणि पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुद्दल माघारी मिळेल. शेअर्सची जशी सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर चालते. त्या प्रमाणात बाँडची खरेदी विक्री खुल्या जास्त बाजारात होत नाही. आकर्षक बाँड बाजारात आल्यानंतर कमी व्याजदर असलेल्या बाँडची मागणी घटते. त्यामुळे बाँड विकायची इच्छा असूनही विकता येत नाहीत. कारण, खरेदीदारच मिळत नाही. त्यामुळे बाँड खरेदी करतानाच मुदत कालावधीपर्यंत गुंतवणूक करण्याची मानसिकता ठेवली तर योग्य राहील.
यिल्ड टू मॅच्युरिटी म्हणजे काय? (What is yield to maturity in Bond)
कोणताही बाँड खरेदी करताना त्याची यिल्ड टू मॅच्युरिटी किती टक्के आहे हे जरूर तपासा. जेवढी जास्त यिल्ड तेवढा बाँडमधून जास्त परतावा. समजा, 1000 रुपये इश्यू प्राइज असलेल्या बाँडवर 10% व्याजदर मिळतो. मात्र, सेकंडरी मार्केटमध्ये तुम्हाला हा बाँड फक्त 500 रुपयांना मिळाला तर तुमची यिल्ड टु मॅच्युरिटी 20% होईल. असा बाँड तुमच्या फायद्याचा ठरेल. त्यामुळे यिल्ड किती असेल, हे चेक करायला विसरू नका.
बाँडची क्रेटिड रेटिंग तपासा (Bond credit rating)
कोणताही बाँड खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीची क्रेडिट रेटिंग तपासा. अधिकृत संस्थांकडून बाँडचीही क्रेडिट रेटिंग जाहीर केली जाते. याचा अर्थ तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? तुमचे पैसे माघारी करण्याची कंपनीची क्षमता आहे का? हे यातून समजते. ट्रिपल ए (AAA) रेटिंग असणारे बाँड सर्वाधिक सुरक्षित असतात. या पेक्षा कमी रेटिंग असणाऱ्या बाँडमध्ये जोखीम जास्त असू शकते. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती चेक केल्याशिवाय बाँड खरेदीचा निर्णय घेऊ नका.
बाँडमधील गुंतवणुकीत जोखीम किती आहे? (Risk in bond investment)
सरकारी बाँडमधील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. कारण, सरकार दिवाळखोर होण्याची शक्यता खूप कमी असते. त्याखालोखाल सार्वजनिक उद्योगांचे बाँड कमी जोखमीचे समजले जातात. मात्र, खासगी कंपन्यांच्या बाँडमध्ये जोखीम थोडी अधिक असते. त्यामुळेच क्रेडिट रेटिंग चांगली असणारे बाँड खरेदी करा. अन्यथा परतावा आणि मुद्दल दोन्हीही गमावण्याची वेळ येईल. बाँडशी तुलना करता मुदत ठेवींमधील गुंतवणूक जास्त सुरक्षित मानली जाते.
(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड, SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)