Educational Loan: चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज भासते. पण प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगलीच असते, असे नाही. तसेच आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेला सर्व पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे संयुक्तिक नाही. अशावेळी ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे. त्यांना बँकांकडून शिक्षणासाठी कर्ज मिळते. या कर्जाचा व्याजदर किती असतो? ते किती वर्षांसाठी मिळते? त्याच्यासाठी बेसिक पात्रता काय? शैक्षणिक कर्जाविषयी अशा तुमच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
- एज्युकेशनल लोन म्हणजे काय?
- एज्युकेशनल लोनसाठी कोण पात्र आहे?
- बँकेकडून कोणत्या कागदपत्रांची मागणी केली जाते?
- कोणत्या प्रकारच्या कोर्सेससाठी एज्युकेशन लोन दिले जाते?
- शैक्षणिक कर्जामध्ये कोणत्या प्रकारचे खर्च कव्हर होतात?
- सह-अर्जदाराची गरज लागते का? सह-अर्जदार कोण होऊ शकतो?
- शिक्षणासाठी जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते?
- एज्युकेशनल लोनचा कालावधी काय असतो?
एज्युकेशनल लोन म्हणजे काय?
ज्या विद्यार्थ्यांना पैशांविना उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यांना बँका पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देते. हे शैक्षणिक कर्ज भारतात आणि भारताबाहेरील शिक्षणासाठी वापरता येते. ट्युशन फी व्यतिरिक्त इतर खर्च जसे की, हॉस्टेल फी, कोर्सशी संबंधित उपकरणे आणि इतर खर्चदेखील एज्युकेशनल लोनमध्ये कव्हर होतो. तुम्ही जर भारताबाहेरून शिक्षण घेण्याच्या विचार करत असाल तर, एज्युकेशनल लोन देणाऱ्या काही बँका त्यामध्ये विमानाच्या तिकिटांचाही समावेश करतात.
बरेच विद्यार्थी हे शिक्षण घेणारेच असतात. त्यामुळे त्याची क्रेडिट हिस्ट्री नसते. अशावेळी पालक किंवा गार्डिअन सहकर्जदार म्हणून सही करू शकतो. दरम्यान, काही बँका तारण म्हणून प्रॉपर्टीची कागदपत्रे, मुदत ठेवींची सर्टिफिकेट आदींची मागणी करू शकतात.
एज्युकेशनल लोनसाठी कोण पात्र आहे?
प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम असतात. त्यानुसार एज्युकेशनल लोनच्या पात्रतेसाठी त्यांचे वेगळे नियम असू शकतात. पण आरबीयने घालून दिलेल्या बेसिक नियमांची पूर्तता प्रत्येक बँकेला पूर्ण करावी लागते. त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो.
- शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
- अर्जदाराने देशांतर्गत/परदेशातील शिक्षण संस्थेत निश्चित प्रवेश घेतलेला असावा. त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
- अर्जदाराचे वय 15 ते 35 वर्षे या दरम्यान असावे.
- अर्जदार विद्यार्थ्यासोबत सह-अर्जदार म्हणून पालक किंवा गार्डिअनने हमी देणे आवश्यक.
- एज्युकेशनल लोन 4 लाखापेक्षा अधिक असेल तर तारण म्हणून मुदत ठेवीचे सर्टिफिकेट, प्रॉपर्टीची कागदपत्रे तारण म्हणून ठेवावी लागतात.
बँकेकडून कोणत्या कागदपत्रांची मागणी केली जाते?
विद्यार्थ्याला एज्युकेशनल लोन घेताना बँकेच्या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात.
- शिक्षणासाठी अॅडमिशन घेतल्याचे सर्टिफिकेट. त्याचबरोबर स्कॉलरशिप लागू असेल तर त्याचे प्रमाणपत्र.
- संपूर्ण कोर्सच्या फीचे स्ट्रक्चर.
- परदेशात जाणार असाल तर स्टुडंट व्हिसा आणि फॉरेन एक्सचेंज परमीट.
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- वयाचा दाखला
- पत्त्याचा पुरावा
- 2 पासपोर्ट साईज फोटो
- 4 लाखापेक्षा अधिक कर्ज असेल तर तारण कागदपत्रे
कोणत्या प्रकारच्या कोर्सेससाठी एज्युकेशन लोन दिले जाते?
एज्युकेशनल लोन हे युजीसीने मान्यता दिलेल्या भारतातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी घेता येते. त्याचबरोबर परदेशातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी बँका कर्ज देतात. तसेच कर्ज देणाऱ्या बँकांकडे भारतातील आणि भारताबाहेरील शैक्षणिक संस्थांची यादी असते. त्या यादीतील संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते कर्ज देतात.
हे सुद्धा वाचा: एज्युकेशनल लोनवर इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते का?
शैक्षणिक कर्जामध्ये कोणत्या प्रकारचे खर्च कव्हर होतात?
शैक्षणिक कर्जामध्ये खालील प्रकारच्या खर्चाचा समावेश होतो.
- ट्युशन फी आणि हॉस्टेल फी
- परीक्षा फी, लायब्ररी फी आणि लॅब फी इत्यादी
- विद्यापीठाला / शैक्षणिक संस्थेला दिलेले रिफंडेबल डिपॉझिट
- पुस्तके, युनिफॉर्म आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्च
- प्रवासाचा खर्च (विमानाच्या परतीचा प्रवास)
सह-अर्जदाराची गरज लागते का? सह-अर्जदार कोण होऊ शकतो?
जर तुम्ही फुल टाईम कोर्स करत असाल तर एज्युकेशनल लोनसाठी सह-अर्जदाराची गरज भासते. हा सह-अर्जदार पालक/गार्डिअन किंवा जोडीदार कोणी होऊ शकतो. सह-अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवा. तसेच त्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली असावी.
शिक्षणासाठी जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते?
भारतातील शिक्षणासाठी बऱ्याच बँका जास्तीत जास्त 10 ते 15 लाखापर्यंत कर्ज देतात. तर परदेशातील शिक्षणासाठी 20 ते 30 लाखापर्यंत कर्ज देतात. यापेक्षा अधिक कर्ज हवे असल्यास बँकेकडे काही तारण ठेवल्यास बँक जास्त कर्ज देऊ शकते.
एज्युकेशनल लोनचा कालावधी काय असतो?
सर्वसाधारण भारतातील बँका सरासरी 5 ते 7 वर्षांसाठी कर्ज देतात. तर काही बँका यापेक्षा जास्त म्हणजे 10 ते 15 वर्षांसाठी कर्ज देतात. पण त्यासाठी जास्त व्याजदर आकारतात.