Farmer News: कोरोना काळात सगळ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. त्यामध्ये आपला बळीराजा सुद्धा समाविष्ट होता. विदर्भातील मेळघाटमधील शेतकऱ्यांशी बोलतांना एका शेतकऱ्याने सांगितले की, शेतकरी सुखी कधीच नसतो, पण कोरोंना काळात जी परिस्थिती आम्ही अनुभवली ती या आधी कधीच बघितली नव्हती.
शेतातील माल घरात भरला होता. वापरायला पैसे नव्हते. अशातच माझी पत्नी आजारी पडली. तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यात बँकसुद्धा बंद होत्या.
लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतीउद्योग मोठ्या अडचणीत सापडला होता. आम्ही वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करतो. रोग आणि अति पाऊस यामुळे उत्पादनातही घट झाली होती बाजारभावाही फारसा नव्हता त्यामुळे मजुरांना मजुरी देण्याइतके सुद्धा पैसे सुद्धा आमच्याकडे नव्हते. त्या तुलनेत सध्याची परिस्थिती समाधानकारक आहे.
शेतमाल फुकटसुद्धा कोणी घेत नव्हतं…..
हातूरणा येथील शेतकरी सांगतात की, मी त्या काळात गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, काकडी, कोथिंबीर अशी पीके घेतली होती. गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही दररोज बाजारात घेऊन जावी लागतात. तेव्हा बाजारपेठ बंद होती. आठवडी बाजार सुद्धा बंद होता.
त्यामुळे किती तरी माल फुकट वाटण्यात गेला आणि काही माल घरीच सडला होता. आर्थिक टंचाई होती, घरात खाण्यासाठी धान्य होत पण त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पैसे नव्हते. किराण्याची सोय नव्हती. सरकार कडून किराणा मिळाला तो सुद्धा फक्त भूमिहीन लोकांना.
नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सांगतात, शेतात काम करण्यासाठी मजूर बाहेर गावातून आणावा लागत होता पण लॉकडाऊनमुळे शेतात मजूर कामाला येत नव्हता. शेतीतील किती तरी कामे मी आणि माझ्या पत्नीने स्वतः केली.
मजूर नसल्यामुळे माल काढता येत नव्हता. काढला तर तो विकता येत नव्हता. बाजारात नेण्यासाठी वाहने नव्हती. त्यामुळे माझी आर्थिक स्थिती कोरोंना काळात फार डबघाईला आली होती. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुलांना शिक्षणासाठी मोबाइल घेऊन देण्याचीही परिस्थिती तेव्हा नव्हती.
शेतकऱ्याची आर्थिक स्थिती कधीच चांगली नसते..
काटोल येथील तरुण शेतकरी प्रज्वल बनाईत म्हणतात, शेतकऱ्याची स्थिती कधीच चांगली आहे असे म्हणता येत नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांवर आपत्ती असतेच. बाजारपेठ पेठ बंद, शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती या सगळ्या समस्या आमच्यावर असतात.
कोरोंना काळात बाजार पेठ बंद होती, त्यामुळे माल विकला गेला नाही पण काही खर्च सुद्धा कमी होता मुलांचे शिक्षण, बाहेरील कार्यक्रम या बाबींचा खर्च कमी होता. त्यामुळे घरात अन्न धान्य खाऊ शकलो. आणि आता आवक वाढली तसंच खर्च सुद्धा वाढला. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मध्ये शेतकऱ्यावर फारसा परिणाम, बदल होत नाही.
शेतकऱ्यांच्या मतानुसार….…..
एकूण शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून लक्षात येते की, शेतकऱ्याला नेहमीच कोणत्या न कोणत्या त्रासातून जावं लागत. आर्थिक भरभराट जरी झाली तरी पुढील पेरणीसाठी त्याला तयार राहावं लागत. जसा शेतकरी घरातून गेल्यानंतर परत येईल याची गॅरंटी नसते, त्याचप्रमाणे लागवडीसाठी झालेला खर्च उत्पन्नातून मिळेल याची सुद्धा गॅरंटी नसते. म्हणून कोरोंना काळातील स्थिती आणि आताची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती यात फारसा बदल आणि फरक दिसून येत नाही.