बँकेचं घेतलेलं कर्ज फेडणं यांसारख सुख नाही असं म्हणतात. कुणाचही कर्ज आपल्या डोक्यावर असणं म्हणजे एक मोठा मानसिक भार देखील असतो. मोठ्या कष्टाने, बचतीने आपण कर्जाची परतफेड करत असतो. कर्जाची थकीत रक्कम पूर्णपणे भरणे आणि ते संपुष्टात आणणे यासाठी देखील एक मोठी प्रोसेस असते.
कर्जाचा प्रकार (गृह, वाहन, वैयक्तिक इत्यादी) आणि कर्ज देणारी बँक यानुसार कर्जाची क्लोजिंग प्रोसेस बदलू शकते. कर्ज संपवताना नेमकी काय खबरदारी आपण घ्यायला हवी? कोणती कागदपत्रे बँकेकडून घ्यायला हवीत याबद्दल आपण आज बोलणार आहोत.
Table of contents [Show]
कर्ज करार नजरेखालून घाला
कर्ज घेताना बँकेत आणि तुमच्यात एक करार झालेला असतो. तुमच्या कर्ज करारामध्ये (Loan Agreement) नमूद केलेल्या अटी आणि शर्तीं काळजीपूर्वक वाचा. तुम्ही प्रीपेमेंट करत असाल तर त्यावर काही अतिरिक्त शुल्क तर नाही याची खात्री करून घ्या. फ्लोटिंग कर्ज प्रकार जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला प्रीपेमेंट करताना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही हे लक्षात असू द्या.
थकबाकीची रक्कम बघा
बँकेला तुम्ही किती देणे लागतात याची गोळाबेरीज करा. यामध्ये मूळ रक्कम, व्याज आणि इतर शुल्क तपासून बघा. यात काही शंका असल्यास तुम्ही बँकेत जाऊन किती रक्कम कर्ज देणे बाकी आहे याची माहिती करून घ्या. जेणेकरून कर्ज भरणा करणे तुम्हांला सोपे जाईल.
पैशाची व्यवस्था करा: थकीत कर्जाची रक्कम फेडण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याची व्यवस्था करा. तुमची वैयक्तिक बचत, गुंतवणुकीतील परतावा इत्यादी मार्गातून तुम्ही जमा केलेले पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.
बँकेला कल्पना द्या: तुम्हांला तुमचे कर्ज बंद करायचे आहे असे तुम्हाला तुमच्या बँकेला लेखी कळवावे लागेल किंवा मेल करावा लागेल. जेणेकरून बँकेकडून त्याबाबतीत कारवाई केली जाईल. तुम्ही जर गृह कर्ज, वाहन कर्ज घेतलेले असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे तुम्ही बँकेकडे जमा केलेली असतात. ही कागदपत्रे वेगवगेळ्या बँका वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठेवत असतात. तुमची कागदपत्रे तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचावीत यासाठी बँकेला लेखी पत्र देणे किंवा मेल करणे आवश्यक आहे.
यात कर्ज खाते क्रमांक, थकबाकीची रक्कम आणि तुम्ही ज्या तारखेला पैसे भरण्याची योजना आखत आहात त्याचा उल्लेख करायला विसरू नका.
तुमचे कर्ज खाते बंद झाले, तुम्ही तुमच्या संपत्तीची कागदपत्रे ताब्यात घेतली म्हणजे तुमचं काम संपलं असं नाही. तुम्हांला आणखी काही महत्वाचे सर्टिफिकेट बँकेकडून ताब्यात घ्यायचे असतात, त्याबद्दल जाणून घेऊया.
नो ड्युज सर्टिफिकेट (NDC)
तुम्ही तुमच्या बँकेचे कर्ज बंद केल्यावर बँकेकडून दिले जाणारे हे एक महत्वाचे दस्तऐवज आहे. हे सर्टिफिकेट प्रमाणित करते की तुम्ही बँकेची सर्व थकबाकी भरलेली आहे आणि तुमची बँकेकडे कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही. हे सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या कर्जाच्या परतफेडीच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचा पुरावा म्हणून काम करते.
लोन क्लोजर सर्टिफिकेट
एकदा कर्जाचे पैसे भरले की, कर्ज बंद केल्याचे प्रमाणित करणारी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला पुरवण्यासाठी बँकेला विनंती करा. यामध्ये पेमेंटची पोचपावती, कर्ज बंद करण्याचे पत्र बँकेकडून दिले जाते. याला लोन क्लोजर सर्टिफिकेट असे म्हणतात.
कर्ज बंद केल्याची सर्व कागदपत्रे आणि पावत्या तुमच्याकडे सुरक्षित राहतील याची काळजी घ्या, भविष्यात ही कागदपत्रे कामी येऊ शकतात. भविष्यात उद्भवणारे कोणतेही संभाव्य वाद किंवा गैरसमज टाळण्यासाठी कर्ज बंद केल्याचा पुरावा सांगणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
नो ड्युज सर्टिफिकेट (NDC) चे महत्त्व
कायदेशीर पुरावा: NDC हा कायदेशीर पुरावा म्हणून काम करतो की तुम्ही सर्व थकबाकीची परतफेड केली आहे आणि कर्जदात्या बँकेकडे तुमचे कोणतेही दायित्व नाहीत. हे भविष्यातील कोणत्याही संभाव्य विवाद किंवा कर्जदात्याच्या दाव्यांपासून तुमचे संरक्षण करू शकते.
क्रेडिट स्कोअर: चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यात NDC महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. NDC हे सुनिश्चित करते की तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कर्जाशी संबंधित कोणतीही विसंगती नाही.ज्यामुळे तुमच्या भविष्यातील क्रेडिट योग्यतेवर सकारात्मक परिणाम होतो आणि भविष्यात पुन्हा कर्ज घेताना कुठलीही अडचण येणार नाही.
हे लक्षात घ्या की भविष्यातील कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा आर्थिक सेवांसाठी अर्ज करताना NDC ची आवश्यकता असते. बँका किंवा वित्तीय संस्था तुमच्या कर्जाच्या परतफेडीचा इतिहास आणि आर्थिक विश्वासार्हता तपासण्यासाठी करण्यासाठी तुमच्याकडे नो ड्युज सर्टिफिकेटची विचारणा करू शकते.
मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण: तुम्ही जर तुमची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज घेण्याचा विचार करत असल्यास किंवा त्याची विक्री करून संपत्तीची मालकी हस्तांतरित करत असल्यास किंवा मालमत्तेची विक्री किंवा गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यावेळी तुमच्याकडे बँक NDC ची मागणी करते.
म्हणजेच कर्जाची परतफेड केल्यानंतर देखील तुम्हाला ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतले होते त्या बँकेकडून संपत्तीच्या कागदपत्रांशिवाय नो ड्युज सर्टिफिकेट (NDC) आणि लोन क्लोजर सर्टिफिकेट (Loan Closer Certificate) घेणे आवश्यक आहे.