स्टँडर्ड डिडक्शनसारख्या (Standard deduction) ही सूट कर्मचार्यांना जुन्या आणि नव्या अशा दोन्ही कर प्रणालींमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र नवी कर प्रणाली निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही कर लाभ मिळू शकणार नाहीत. कोणती करप्रणाली (Tax regime) आपल्याला हवी आहे, ज्याच्या माध्यमातून आपला अधिक लाभ होईल, हे संबंधित करप्रणाली निवडण्यापूर्वीच तपासून पाहायला हवं. काही कर लाभ पाहू
Table of contents [Show]
वजावट 80C, 80CCC आणि 80CCD (1) :
याअंतर्गत 1.5 लाख रुपयांची एकत्रित सूट मिळू शकते. कर्मचार्यांना आयुर्विमा प्रीमियम, भविष्य निर्वाह निधी, केंद्र सरकारच्या पेन्शन योजना, एलआयसी किंवा इतर कोणत्याही विमा कंपनीच्या पेन्शन योजनेसाठी दिलेल्या पेमेंटसाठी ही सूट मिळते. ही सूट केवळ जुन्या कर प्रणालीच्या अंतर्गतच उपलब्ध आहे.
कलम 80CCD (2) :
याअंतर्गत जुन्या आणि नव्या अशा दोन्ही प्रणाली सूट देतात. केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत नियोक्त्यानं (नोकरी देणारा) केलेल्या योगदानावर ही सूट दिली जाते. नोकरी प्रदान करणार जर सार्वजनिक क्षेत्रातला, राज्य सरकार किंवा इतर संस्था असेल तर कपातीची मर्यादा ही 10 टक्के आहे. त्याचबरोबर कर्मचारी केंद्र सरकारसाठी काम करत असेल तर या कपातीची मर्यादा पगाराच्या 14 टक्के ठेवण्यात आलीय.
कलम 24(B): सूट
जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडणाऱ्यांना ही सुविधा मिळते. स्वत:च्या मालमत्तेसाठी गृहकर्जावरच्या व्याजासाठी 24(B) अंतर्गत सूट मिळू शकते. नवीन कर व्यवस्था निवडणाऱ्यांना भाड्यानं घेतलेल्या मालमत्तेवरच्या गृहकर्जावरच्या व्याजावरील कपातीचा लाभ घेता येवू शकतो.
स्टँडर्ड डिडक्शन :
नव्या-जुन्या अशा दोन्ही कर प्रणालीच्या अंतर्गत 50,000 रुपयांची सरळ सूट उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांनी कितीही नोकऱ्या बदलल्या तरी त्याचा विचार यात होत नाही. कर्मचारी याचा लाभ घेऊ शकतात.
घरभाडे भत्ता :
जुन्या कर व्यवस्थेत हा लाभ मिळू शकतो. जुनी कर व्यवस्था पगारदार करदात्यांना आयकर कायदा 1961च्या कलम 10 (13A) अंतर्गत कपातीचा दावा करण्याची परवानगी देतं. एचआरएची (Home Rent Allowance) गणना पगार, भाडं, निवासी शहर आणि नोकरी प्रदान करणाऱ्यानं दिलेला एचआरए या आधारे केली जाते.
घरून काम करणाऱ्यांसाठीही सुविधा :
या सरकारी नियमांनुसार मिळणाऱ्या लाभांसोबत पगारदारानं आणखी काही मुद्दे विचारात घेतले तर करात सूट मिळण्याची शक्यता अधिक वाढते. जर तुम्ही घरून काम करत असाल तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा करता करात सूट मिळू शकते. घरून काम करताना वापरात येणाऱ्या वस्तू, त्याची बिलं, तुम्ही ज्या जागी काम करता ती भाड्याची असेल तर त्याची घरभाड्याची पावती, वीज बिल, स्टेशनरी या सर्व बाबींसाठी लागणारा पैसा करात सूट देवू शकतो. वीजबिलासोबत पाणी, मोबाइल किंवा फोनचं बिल, तसंच कॉम्प्युटर आणि इतर साधनं ज्याचा वापर तुम्ही कामासाठी करत आहात, त्याची किंमतही उत्पन्नातून वजा करता येवू शकते. एकूणच पगारदार कर्मचारी ऑफिसमधून काम करत असो किंवा घरून विविध सरकारी नियमांनुसार करात सूट मिळवण्यास पात्र असतो.