Fixed Deposit: मुदत ठेव म्हणजेच फिक्ड डिपॉजिट (FD) मध्ये गुंतवणूक करण्यास भारतीय मोठ्या प्रमाणात पसंती देतात. तरुणांपेक्षा वयस्कर आणि निवृत्त नागरिक FD चा पर्याय जास्त स्वीकारतात. निश्चित कालावधीसाठी पैसे गुंतवल्यास व्याजही मिळते आणि जोखीमही कमी असते. मात्र, जर तुम्ही योजना परिपक्व (मॅच्युअर) FD बंद करत असाल तर त्याचे तोटेही आहेत.
अचानक पैशांची गरज लागल्यास मुदत ठेवींमधील पैसे तुम्ही काढू शकता. मात्र, मग बँकेकडून दंड आकारला जातो. तसेच कमी व्याजदरानेही पैसे मिळतात. भविष्यात तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
दंड आणि शुल्क
मुदतपूर्व जर तुम्ही एफडी बंद केली तर बँक तुम्हाला विविध शुल्क आणि दंड आकारते. योजना बंद करताना बँक हे पैसे कापून घेते. जेवढे लवकर तुम्ही योजना बंद कराल तेवढे जास्त शुल्क आणि दंड भरावा लागतो. त्यामुळे कोणत्याही FD योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी दंड आणि शुल्क किती आहे याची माहिती घ्या. त्यानंतरच गुंतवणूक करा. एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लँडरिंग ही स्मार्ट पद्धत काय आहे हे जाणून घ्या.
कर्ज मिळण्यास अडचण
एफडी बँकेतून कर्ज घेताना तारणही ठेवता येते. मुदत ठेवींवर तुम्हाला वैयक्तिक किंवा होम लोनही मिळू शकते. मात्र, जर तुम्ही FD वेळेआधी बंद करत असाल तर भविष्यात तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते. कारण, आर्थिकदृष्या तुम्ही अस्थिर आहात. तुम्हाला पैशांची सतत गरज लागते किंवा तुमच्यामध्ये योजना सुरू ठेवण्याची क्षमता नाही, असा त्याचा अर्थ निघतो.
कर्ज देण्यापूर्वी बँक तुमचे बँकेतील आधीचे व्यवहार तपासते. त्यामध्ये योजना परिपक्व होण्याआधी एफडी काढत असाल तर कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे मुदत ठेव परिपक्व होण्यापर्यंत थांबा. चांगला क्रेडिट रिपोर्ट तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यास मदत करेल.
व्याजावर परिणाम
मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवल्यावर तुम्हाला जे व्याज मिळते ते पुन्हा मूळ रकमेत गुंतवता येते. त्यामुळे चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. मात्र, जर तुम्ही योजना परिपक्व होण्याआधीच पैसे काढले तर कमी व्याजदराने पैसे मिळू शकतात. अशा वेळी चक्रावाढ व्याजाचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे वेळेआधी FD बंद करत असाल तर व्याजदरावर काय परिणाम होतो, ते पाहून घ्या.