Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय? त्या बॅंकेच्या एफडीपेक्षा वेगळ्या कशा आहेत?

Corporate Fixed Deposit

भारतात मुदत ठेवी हा सगळ्यांच्याच आवडीचा गुंतवणुकीचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याला परदेशातील ट्रिप करायची असेल किंवा एखाद्याला निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करायचे असेल, किंवा भविष्यात पैशांची गरज पडेल म्हणून गुंतवणूक करायची असेल तर यासाठी बहुतांश लोकांना एक आणि एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit).

फिक्स डिपॉझिट (मुदत ठेवी) हा गुंतवणूक पर्याय कितीही आवडीचा असला तरी तो दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण जर तुमचं उद्दिष्ट जर अल्पकालीन असेल किंवा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांची पूर्ती होईपर्यंत वाट पाहू शकत नसाल, तस अशा घटनांमध्ये मुदत ठेवी फायद्याची ठरू शकते. याचं कारण असं की, तुम्हाला त्यावर दिल्या जाणाऱ्या परताव्याची हमी मिळते. पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल की, बॅंकेतील मुदत ठेवींवरील व्याजदर कमी झाला तर काय? तर तुमच्यासाठी आणि एका मुदत ठेवींचा पर्याय आहे. तो म्हणजे कॉर्पोरेट मुदत ठेवी (Corporate Fixed Deposits).

या लेखातून आपण कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय? या बॅंकेतील एफडीं सारख्याच असतात का? आणि त्याचे फायदे काय आहेत? हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कॉर्पोरेट एफडी (Corporate FD) म्हणजेच कॉर्पोरेट मुदत ठेवी म्हणजे काय? ते समजून घेऊ.

कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय? What is Corporate FD?

बॅंकाप्रमाणेच काही कंपन्या, नॉन-बॅंकिंग फायनान्शिअल कंपन्या यांना एका निश्चित व्याजदराने ठराविक कालावधीसाठी ठेवी गोळा करण्याची परवानगी आहे. अशा ठेवींना कॉर्पोरेट मुदत ठेवी म्हणतात. बॅंकांप्रमाणेच जमा केलेल्या ठेवींवर परताव्याची हमी आणि गुंतवणुकीचा कार्यकाल निवडण्याचे स्वातंत्र्य यामध्ये आहे. तसेच कॉर्पोरेट एफडी या बॅंकेतील एफडींपेक्षा जास्त व्याज देतात.

कॉर्पोरेट एफडीमध्ये बॅंकेतील एफडीप्रमाणे काय समानता आहे ते पाहुया.

कॉर्पोरेट मुदत ठेवी परताव्याची हमी देतात

कॉर्पोरेट मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, बॅंकेतील मुदत ठेवींप्रमाणेच यातही परताव्याची हमी दिली जाते. समजा तुम्ही कॉर्पोरेट मुदत ठेवींमध्ये 1 लाख रुपये गुंतवले आहेत; आणि संबंधित नॉन-बॅंकिंग कंपनी/कॉर्पोरेट कंपनी तुम्हाला त्यावर वर्षाला 7 टक्के व्याज देणार असेल. तर शेअर मार्केटमधीही कितीही अस्थिरता निर्माण झाली तरीही वर्षाच्या शेवटी तुम्हाला 1 लाख 7 हजार रुपये मिळणार याची खात्री आहे.

याचा आणखी एक फायदा म्हणजे, गुंतवणूक करताना तुम्हाला ठराविक कालावधीनंतर किती रक्कम मिळणार आहे. हे माहित असते. त्यामुळे तुम्ही त्यानुसार नियोजन करू शकता.

ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर

बॅंकेतील मुदत ठेवींप्रमाणेच, बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्याही कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर देतात. उदाहरणार्थ, एका सर्वसाधारण व्यक्तीला कॉर्पोरेट एफडीवर 6 टक्के व्याजदर मिळत असेल तर तेवढ्याच कालावधीसाठी आणि गुंतवणुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6 टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर दिला जातो.
जे ज्येष्ठ नागरिक निवृत्त आहेत;  आणि ते उत्पन्नासाठी मुदत ठेवींवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी हा अतिरिक्त फायदा आहे.

कालावधी निवडण्याची मुभा

कॉर्पोरेट मुदत ठेवींचा कालावधी साधारणत: 1 ते 5 वर्षे यादरम्यान असतो. यापैकी कोणताही  कालावधी निवडण्याची मुभा गुंतवणूकदाराला असते. जर तुमचं उद्दिष्ट 1 वर्षाचं असेल तर तुम्ही वर्षभराची एफडी करा; किंवा अडीच वर्षांची करा. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कालावधी निवडू शकता. पण त्यानुसार तुमच्या व्याजदरातही बदल होऊ शकतो. जसे की, जास्त कालावधीसाठी जास्त व्याजदर दिला जाऊ शकतो.

वर आपण कॉर्पोरेट एफडी आणि बॅंकेतील एफडी यामधील समानता पाहिली. आता बॅंकेच्या एफडीपेक्षा कॉर्पोरेट एफडीमधून मिळणारे अधिकचे फायदे जाणून घेऊया.

कॉर्पोरेट एफडींवर मिळणार व्याजदर हा बॅंकेतील एफडीपेक्षा अधिक

एसबीआय आणि बजाज फायनान्स यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातील फरक

कालावधी

एसबीआयचा व्याजदर

बजाज फायनान्सचा व्याजदर

1 वर्षे ते 2 वर्षे

5.45 %

6.60%

2 ते 3 वर्षे

5.60 %

7.65 %

3 ते 5 वर्षे

5.65

7.65 %

कॉर्पोरेट मुदत ठेवींवर दिला जाणार व्याजदर हा बॅंकेतील मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) सध्या मुदत ठेवींवर वेगवेगळ्या कालावधीसाठी 3.40 ते 6.60 टक्के यादरम्यान व्याज देते. त्याचवेळी, खाजगी क्षेत्रातील बजाज फायनान्स कंपनी 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6.60 ते 7.65 टक्के वार्षिक व्याज देते.

कॉर्पोरेट एफडीमधून पैसे लगेच काढल्यास कमी दंड आकारला जातो

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार, सर्व प्रकारच्या मुदत ठेवींना 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजे 3 महिने पूर्ण होण्याआधीच मुदत ठेवीतून पैसे काढल्यास त्यावर बॅंका आणि कंपन्यांना दंड आकारण्याचा अधिकार आहे. बॅंकेतील मुदत ठेवींच्या तुलनेत कॉर्पोरेट मुदत ठेवींवर कमी दंड आकारला जातो.