Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gurupushyamrut Yog 2023: मुहूर्तांच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी म्हणजे पारंपरिक एसआयपी होती का?

Buying Gold and Silver on Muhurtas a Traditional SIP

Gurupushyamrut Yog 2023: हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथापरंपरेनुसार काही ठराविक दिवशी महत्त्वाची शुभे कामे केली जातात. आज गुरूपुष्यामृत योग दिवस आहे. आजच्या दिवशी मुहूर्ताप्रमाणे लोक आवर्जून सोनं-चांदी खरेदी करतात. ही परंपरा नेमकी काय आहे; त्याबद्दल जाणून घेऊयात.

Gurupushyamrut Yog 2023: आपल्याकडे चांगल्या मुहूर्ताच्या दिवशी शुभ गोष्टी करण्याचे संकेत आहेत. त्यादिवशी महत्त्वाच्या कामांबरोबरच सोने-चांदीची देखील आवर्जून खरेदी केली जाते. पण मुहूर्ताच्या दिवशी खरेदी करण्यामागे फक्त परंपरा आहे की, ही त्याकाळातील गुंतवणुकीची एक सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट पद्धत (Systematic Investment Plan-SIP). चला तर जाणून घेऊयात शुभ मुहूर्ताच्या दिवशी केल्या जाणाऱ्या पद्धतशीर गुंतवणुकीबद्दल.

हिंदू धर्मातील शास्त्रानुसार आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथापरंपरेनुसार गुरूपुष्यामृत योग या दिवशी शुभ गोष्टी केल्या जातात. जसे की, नवीन घराची खरेदी असो किंवा बांधकाम असो, दुकानाचे किंवा ऑफिसचे उद्घाटन असो, किंवा नवीन गाडी खरेदी असो किंवा सोने-चांदी खरेदी असो, या गोष्टींना या दिवशी प्राधान्य दिलं जाते. कारण पूर्वी मुहूर्ताच्या दिवशी खरेदी करणे, ही लोकांची गुंतवणुकीची पारंपरिक SIP (सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन) होती.

आपले विविध सण किंवा महत्त्वाचे शुभ मुहूर्त पाहिले तर ही गोष्ट लक्षात येईल. जसे की, दसरा, गुढीपाडवा, लक्ष्मीपूजन, गुरूपुष्यामृत योग अशा दिवशी महत्त्वाच्या धातुंची पद्धतशीरपणे अगदी थोड्याथोड्या ग्रॅममध्ये खरेदी करून गुंतवणूक केली जात होती.

गुरूपुष्यामृत योग हा दिवस कधी येतो?

गुरूपुष्यामृत योग हा हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील गुरूवारी येतो. या गुरूवारी चंद्र हा पुष्य नक्षत्रात असतो म्हणून त्याला गुरूपुष्यामृत योग असे म्हटले जाते. यावर्षीचा गुरूपुष्यामृत योग हा दिवस गुरूवार दि. 25 मे रोजी आला आहे. आजच्या दिवसातील याचा शुभ काळ हा सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतचा आहे.

नवीन खरेदीला प्राधान्य

हिंदू धर्मातील प्रथे-परंपरेनुसार आपण पाहतो तिथीनुसार शुभ दिवस असलेल्या दिवशी चांगल्या गोष्टी केल्या जातात. यामागे लोकांची भावना असते की, त्यात यश मिळो आणि पुढे अशीच भरभराट होत राहो. त्यामुळे गुरूपुष्यामृत योग या दिवशीही नवीन खरेदी किंवा शुभ व महत्त्वाची कामे केली जातात. त्याचबरोबर गुरूपुष्यामृत योग या दिवसापासून लहान बाळांना सुवर्णप्राशनचा डोस दिला जातो. बाळाची प्रतिकार क्षमता वाढवणे, बुद्धी, स्मृती, एकाग्रता, वर्ण, पचन यासाठी देखील याचा वापर केला जातो.

सोने-चांदी खरेदीला पसंती

गुरूपुष्यामृत योग या दिवशी सर्व शुभ कामांसोबत सोने-चांदीची खरेदी देखील आवर्जून केली जाते. यामध्ये परंपरा हा भाग खूप महत्त्वाचा आहे. पण या परंपरेबरोबरच वर्षातील काही ठराविक दिवशी सोने किंवा चांदी या मौल्यवान धातुंची खरेदी करणे ही त्या काळातील एकप्रकारचा सिस्टेमॅटिक गुंतवणुकीचा प्रकार होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण सोने किंवा चांदी हे धातू पूर्वीपासून मौल्यवान होते, आजही आहेत आणि भविष्यात देखील असणार आहेत. त्यामुळे त्याची थोडीथोडी खरेदी करून त्यात गुंतवणूक केली जात होती.

मुहूर्ताला खरेदी म्हणजे पारंपरिक SIP

सध्याच्या एसआयपी किंवा डिजिटलच्या जमान्यात काही जणांना मुहूर्ताच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे आश्चर्यकारक वाटेल. पण त्यामागची भावना आणि गुंतवणुकीची पद्धत लक्षात घेतली तर ती आताच्या एसआयपीप्रमाणेच काम करते. वर्षभरातील ठराविक मुहूर्तांच्या दिवशी सोने-चांदी करून त्याच्या वर्षभरातील किंमतीचा मागोवा घेणे. भाव कमी झाला असेल तर खरेदी अधिक करणे आणि वाढला असेल तर परवडेल तितक्या भावाने किमान खरेदी करणे. ही दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक असून त्यावर काही वर्षांनी चांगला परतावा मिळतोच. हा पूर्वीच्या लोकांच्या अनुभव होता. तो आपण आकडेवारीद्वारे आता पडताळून देखील पाहू शकतो.

अशाप्रकारे परिस्थितीनुसार किंवा प्रत्येक धर्मातील प्रथा-परंपरेनुसार गुंतवणुकीचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. आता या पद्धतीत नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बदल होत गेले आहेत. गुंतवणूकदारांना दररोज या मौल्यवान धातुंची किंमत, खरेदी-विक्रीतील उलाढाल, जागतिक बाजारपेठेतील त्याचे पडसाद कळत आहेत. त्यामुळे अगदी मुहूर्ताला खरेदी केली नाही तरी बाजारातील चढ-उतारानुसार नक्कीच करू शकतो.