भारतीय शेअर बाजार हा काही वर्षांपूर्वी केवळ ठरावीक लोकांच्या चर्चेचा विषय असायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरीकही याच्याशी जोडले गेले. विशेषतः कोविडच काळात देशात उच्चांकी डीमॅट अकाउंट्स (DMAT Account) उघडण्यात आली आहेत. तसेच युट्युबसारख्या सोशल मीडियावरुन आणि वाहिन्यांवरुन सातत्याने शेअर बाजारात उतरा असे आवाहन करणारे असंख्य व्हिडिओ फिरत असतात. त्यामुळे अनेकांना याविषयी कुतुहल निर्माण वाटत असते.
दुसरीकडे शेअर बाजार पडल्याच्या बातम्यांमुळे मनात भीतीही असते. या द्वंद्वातून सुटका मिळवण्यासाठी काही मूलभूत माहिती समजून घेणे गरजेचे आहे. ती घेतल्यास ब्रोकर्सचीही गरज भासणार नाही किंवा जरी ब्रोकर्सच्या माध्यमातून शेअर बाजारात प्रवेश केला तरी तुमची फसगत होण्याची, नुकसान होण्याची शक्यता अत्यल्प असेल.
सर्वप्रथम शेअर बाजारात गुंतवणुकीचे किंवा अर्थार्जन करण्यासाठीचे पर्याय समजून घ्या. ढोबळमानाने यामध्ये तीन प्रमुख प्रकार आहेत.
पहिला प्रकार म्हणजे कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करणे आणि त्याचे मूल्य वाढल्यानंतर विकणे. याला शेअर ट्रेडिंग किंवा बाजाराच्या भाषेत कॅश सेगमेंट (Cash Segment) असे म्हणतात. हा पर्याय कमी जोखमीचा असतो. अर्थात शेअर निवडताना अभ्यास महत्त्वाचा असतो. याबाबत वॉरेन बफेट यांचा एक सोपा नियम सदासर्वकाळ फायद्याचा ठरला आहे, तो म्हणजे बाजारात सर्व जण शेअर्स विकत असतात म्हणजेच बाजार पडलेला असतो तेव्हा तुम्ही दिग्गज कंपन्यांचे समभाग (शेअर्स) खरेदी करा. याला तांत्रिक भाषेत बाय ऑन डिप्स (Buy On Dips) असे म्हणतात. याचा सर्वांत मोठा आणि ताजा अनुभव 2020 च्या मार्च महिन्यात अनेकांनी घेतला.
24 मार्च रोजी जेव्हा सबंध देशात लॉकडाऊन झाले तेव्हा शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण झाली आणि सर्व समभाग कोसळले. ती स्थिती कायम राहणार नव्हती, हे शेअर बाजाराच्या क्षेत्रातील अनेक धुरिणांनी आणि चाणाक्ष गुंतवणूकदारांनी ओळखले आणि अक्षरशः कवडीमोल दरात अनेक कंपन्यांचे समभाग खरेदी करुन ठेवले. त्या शेअर्सच्या किमती आज 200 ते 700 टक्क्यांनी वाढल्या आहेत. म्हणजेच 24 मार्च 2020 रोजी 10 हजार रुपये गुंतवणूक करून एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स 100 रुपयांना एक या दराने खरेदी केले असतील तर त्या शेअर्सची किंमत 2021 मध्ये 20 हजार ते 70 हजार रुपये झाल्याची उदाहरणे आहेत. ‘बाय ऑन डिप्स’मध्ये जोखीम अत्यंत कमी असते. कारण आपण नीचांकी पातळीवर आल्यानंतर त्याची खरेदी करत असतो.
दुसरा पर्याय आहे डेली ट्रेडिंगचा. यामध्ये ऑप्शन, फ्युचर, इंट्राडे असे प्रकार येतात. हा पर्याय झटपट आणि भरपूर पैसे मिळवून देणारा असला तरी यामध्ये नुकसानही भरपूर होण्याची शक्यता असते. तसेच यात जोखीम 100 टक्के असते. शिवाय या प्रकारातून अर्थार्जन करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी रितसर प्रशिक्षण, भरपूर अभ्यास, सराव आणि आकलनशक्ती गरजेची आहे. तसेच जोखीम पत्करण्याची क्षमताही भक्कम असणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत ऑप्शन ट्रेडिंग करणार्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे; मात्र पुरेशा अभ्यासाअभावी ट्रेडिंग केल्यामुळे लाखो जणांनी हजारो कोटी रुपये यामध्ये घालवलेही आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर जरी त्याचे मूल्य घसरले तरी आज ना उद्या ते वधारण्याची आणि किमान गुंतवलेले पैसे तरी परत मिळण्याची शक्यता असतेच. पण ऑप्शन अथवा फ्युचर ट्रेडिंगमध्ये एकदा पैसे गेले की परत मिळत नाहीत.
तिसरा पर्याय सर्वांत सुरक्षित आहे, तो म्हणजे म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करणे. यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील सर्वांत कमी जोखमीचा पर्याय निवडून आपल्याला चांगला परतावा मिळवता येतो. अर्थात जोखीम पत्करण्याची क्षमता जास्त असेल तर अधिक परतावाही मिळू शकतो. आपापल्या कुवतीनुसार याबाबत निर्णय घ्यावा.