चांगला परतावा (Return) देत असल्यानं म्युच्युअल फंडांवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास सातत्यानं वाढताना दिसत आहे. विशेषकरून मिलेनियल्स (Millennials) गुंतवणुकीच्या दृष्टीनं म्युच्युअल फंड स्कीम्सवर जास्तीत जास्त लक्ष देताना दिसत आहेत. देशातली सर्वात मोठी म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी सीएएमएसच्या (CAMS) रिपोर्टनुसार मिलेनियल्सनं आर्थिक वर्ष 2022-23मध्ये इक्विटी योजनांमध्ये 90 टक्के गुंतवणूक केली. म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment) करण्याचा एसआयपी हा सर्वात लोकप्रिय मार्ग झालाय. आर्थिक वर्ष 2023मध्ये एकूण 1.53 कोटी एसआयपी सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये 51 लाख म्हणजे सुमारे 33 टक्के एसआयपी मिलेनियल्सच्या माध्यमातून नोंदवण्यात आल्या होत्या. झी बिझनेसनं याचा आढावा घेतलाय.
Table of contents [Show]
कमी कालावधीत अधिक परतावा
मिलेनियल्सची स्वप्न मोठी असतात. हे सर्व अॅग्रेसिव्ह इन्व्हेस्टर्स असतात. कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा त्यांना हवा असतो. अशाच पद्धतीनं जर एखाद्या गुंतवणूकदाराला 10 वर्षांत स्वत:साठी 1 कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल, तर नेमकं काय करावं लागेल? प्रत्येक महिन्याला साधारणपणे किती एसआयपी करावी लागेल, पाहूया...
विविध परताव्यासाठी विविध एसआयपी
करोडपती कॅल्क्युलेटरनुसार, वेगवेगळ्या परताव्याचा विचार केल्यास 10 वर्षात करोडपती होण्यासाठी एसआयपीदेखील वेगवेगळ्या असणार आहेत. जर म्युच्युअल फंड योजना वार्षिक आधारावर सरासरी 8 टक्के सीएजीआर (Compound Annual Growth Rate) देत असेल, तर 10 वर्षात करोडपती होण्यासाठी दरमहा सुमारे 54,299 रुपयांची एसआयपी करावी लागणार आहे. 10 टक्क्याचा सीएजीआर मिळाल्यानंतर दरमहा 48,414ची एसआयपी करावी लागणार आहे.
20 टक्के परताव्यावर एसआयपी रक्कम किती?
वार्षिक सरासरी परतावा 15 टक्के असल्यास दरमहा 35,887 रुपयांची एसआयपी करावी लागेल. 20 टक्क्यांच्या सरासरी परताव्यासह दरमहा एसआयपी रक्कम 26,589 असेल. दुसरीकडे 25 टक्के सीएजीआर असल्यास मासिक एसआयपी 18,769 रुपये असेल. या फंडांनी 10 वर्षांत सरासरी 20 परतावा दिलाय.
मिडकॅप फंडांची कामगिरी
मिडकॅप फंडाच्या प्रकारामध्ये, कोटक इमर्जिंग इक्विटी फंड, एडलवाईस मिड कॅप फंड आणि एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड यांनी तब्बल 20 टक्के आणि त्यापेक्षाही जास्त परतावा दिलाय. यासाठी 10 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. (टीप- 2 जूनपर्यंतच्या कामगिरीवर आधारित. स्रोत- AMFI)
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)