पीपीएफमध्ये (Public Provident Fund) पैसे गुंतवण्याचा उद्देश चांगला परतावा मिळवणं हा आहे. बँकांपेक्षा चांगलं व्याज (Interest) याठिकाणी मिळत असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा पीपीएफचा विषय येतो तेव्हा पीपीएफवरच्या व्याजाचं गणित समजून घेणं गरजेचं आहे. पीपीएफसाठी 5 तारीख महत्त्वाची आहे. तुम्हीही हे अनेकवेळा ऐकलं असेल. 5 तारखेला पीपीएफच्या खात्यात असं नेमकं काय होतं, ज्यामुळे प्रत्येक पीपीएफ खातेधारकाला ते समजून घेण्याची अधिक गरज आहे, पाहू...
Table of contents [Show]
किती व्याज मिळतं, ते आधी जाणून घ्या
पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 7.1 टक्के दरानं व्याज मिळतं. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून अनेक लहान बचत योजनांचे दर बदलले आहेत, मात्र पीपीएफच्या व्याजदरांमध्ये सरकारकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकार दर तिमाहीत लहान बचत योजना आणि पीपीएफवर भरलेल्या व्याजाचं मूल्यांकन करतं आणि गरजेनुसार त्यात बदल करत असतं.
5 तारखेचा फंडा काय?
पीपीएफवरचा व्याज दर मासिक आधारावर मोजला जातो. हे व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केलं जातं. पीपीएफवर किती व्याज मिळणार, याच्या हिशोबात 5 तारीख अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक महिन्याची 5 तारीख आणि शेवटची तारीख (30 किंवा 31) यादरम्यान पीपीएफ खात्यातल्या सर्वात कमी शिल्लक रकमेवर व्याज दिलं जातं. यामुळेच पीपीएफमध्ये 5 तारखेला किंवा त्यापूर्वी गुंतवणूक करायला हवी. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्याजाचा फायदा मिळेल.
उदाहरणासह 5 तारखेचं गणित 'असं' समजून घ्या
5 तारखेचं गणित समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. समजा आपण 5 एप्रिल किंवा त्यापूर्वी पीपीएफमध्ये 1.5 लाख रुपये जमा केले आहेत, असं गृहीत धरू. या प्रकरणात 7.1 टक्के दरानं तुम्हाला चालू आर्थिक वर्षासाठी एकूण 10,650 रुपये व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही हे पैसे 6 एप्रिल किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी ठेवले तर तुम्हाला या आर्थिक वर्षाच्या 11 महिन्यांसाठीच व्याज मिळेल. म्हणजेच या परिस्थितीत तुम्हाला 9,763 रुपये इतकं व्याज मिळेल. याचाच अर्थ तुम्हाला 887 रुपये कमी व्याज मिळेल.
एकदाच गुंतवणूक फायद्याची?
खरं तर अधिक परतावा म्हणजेच अधिक व्याज मिळवणं हाच मुख्य हेतू असतो. जर तुम्हाला तुमच्या पीपीएफवर अधिक व्याज मिळवायचं असेल, तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही सर्व पैसे एकाच वेळी टाकणं जास्त फायद्याचं ठरेल. याचं कारण म्हणजे जर तुम्ही 5 एप्रिल किंवा त्यापूर्वी संपूर्ण वर्षभरासाठी 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला संपूर्ण पैशावर व्याज मिळणार आहे.
...तर व्याज मिळेल कमी
दुसरीकडे जर तुम्ही दर महिन्याला हप्त्यांमध्ये पैसे जमा केले तर मिळणारं व्याज कमी होईल. त्यामुळे जर तुमच्याकडे पैसे उपलब्ध असतील, तर एकाच वेळी गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर ठरेल, तर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करण्याचा पर्यायदेखील निवडू शकता.