द वॉल्ट डिस्ने कंपनी ही एक बहुराष्ट्रीय कंपनी असून मनोरंजन क्षेत्रात या कंपनीचा विशेष दबदबा आहे. भारतात देखील या कंपनीने चांगला जम बसवला होता आणि Disney+ Hotstar च्या माध्यमातून ही कंपनी चांगला महसूल कमवत होती. मात्र माध्यम क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेचा फटका या कंपनीला देखील बसलेला पाहायला मिळतो आहे. यामुळे वॉल्ट डिस्ने कंपनीने आपला भारतातील स्ट्रीमिंग आणि टेलिव्हिजन व्यवसाय विकण्याची योजना आखली आहे.
काय आहे कारण?
भारतातील ग्राहक संख्या आणि त्यांच्या मध्यम वापर लक्षात घेता अनेक परदेशी कंपन्यांनी FDI अंतर्गत मिडीया क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात भारतीय कंपन्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. याचा थेट परिणाम द वॉल्ट डिस्ने कंपनीवर पहायला मिळतो आहे. कंपनीची ग्राहकसंख्या कमी होत चालल्यामुळे आणि त्याद्वारे महसुलात घट होत असल्याकारणाने कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.
कोण आहे खरेदीसाठी उत्सुक?
द वॉल्ट डिस्ने कंपनी जर भारतातील त्यांचा व्यवसाय बंद करत असेल तर त्यांचा भारतातील सेट अप खरेदी करण्याच्या तयारीत मुकेश अंबानी असल्याचे समजते आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आधीपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत असून, द वॉल्ट डिस्ने कंपनीचा आघाडीचा स्पर्धक राहिलेला आहे.
IPL सामन्यांचे टेलिव्हिजन प्रक्षेपण करण्याचे हक्क द वॉल्ट डिस्ने कंपनीच्या Disney+ Hotstar कडे असून त्याचे डिजिटल प्रक्षेपण हक्क जिओ टेलिव्हिजनकडे आहे. एका अर्थाने डिजिटल प्रक्षेपण हक्क घेऊन रिलायन्स इंडस्ट्रीजने डिस्ने कंपनीचे ग्राहक, प्रेक्षक आपल्याकडे वळवले आहेत.
ब्लूमबर्गच्या बातमीनुसार, वॉल्ट डिस्ने सध्या वेगवगेळ्या पर्यायांवर विचार करत आहे. चांगली डील मिळाल्यास कंपनी भारतातील त्यांचा बिजनेस गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे.