Valentine Day: आजकालची तरुणाई खूपच स्मार्ट आहे, असं आपल्याला कुठंही ऐकायला मिळतं. आता तंत्रज्ञान तरुणांच्या लव लाईफमध्येही उतरलं आहे. पुर्वीपासून 'लव लेटर' मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हातानं लिहलं जायचं. मात्र, आता हे काम तरुणाईने चॅट जीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवलं आहे. या व्हॅलेंटाईन डे ला प्रेमपत्र लिहण्यासाठी भारतातील अनेक तरुण AI चॅटबॉटची मदत घेत आहेत. मनाला भावनारं प्रेमपत्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वाराही लिहता येऊ शकतं. एका अभ्यासात सहभागी झालेल्या 60% भारतीय तरुणांनी साथीदाराला प्रेमपत्र लिहण्यासाठी AI चा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली.
मागील काही महिन्यांपासून Chat GPT, Google Bard या सारखी AI चॅटबॉटची सगळीकडे चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील सॅनफ्रँन्सिस्को येथील Open AI कंपनीने तयार केलेल्या Chat GPT ची विशेषत: बरीच चर्चा झाली. तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे. प्रेमपत्र लिहण्यासाठीही चॅटीपीटीसारखे टुल्स तरुणांना मदत करत आहेत. त्यामुळे हा व्हॅलेंटाईन डे तरुणाईसाठी खास असणार आहे.
प्रेमपत्र तेही कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे लिहलेलं, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे. आठ देशातील सुमारे 5 हजार तरुणांना या संबंधित प्रश्न विचारण्यात आले. McAfee या कंपनीने हे सर्वेक्षण केले. यामध्ये भारतातील तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला. 'Modern love' असे या अभ्यासाचे नाव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये तरुणांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
5 हजार तरुणांपैकी भारतातील 62% पुरुषांनी प्रेमपत्र लिहताना चॅट जीपीटीची मदत घेण्याची इच्छा व्यक्त केली. Chat GPT द्वारे लिहलेले प्रेमपत्र इतके खरेखुरे वाटत होते की, 69% सहभागींना व्यक्तीने लिहलेले पत्र आणि चॅटबॉटने लिहलेले पत्र यातील फरक सांगता येत नव्हता. या व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी चॅटबॉट तरुणांच्या मदतीला आला आहे. आज 14 फेब्रुवारीला देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine Day Love letter) साजरा केला जात आहे. तुम्हीही तुमच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला चॅटबॉटद्वारे लिहलेलं प्रेमपत्र पाठवून आनंदाचा धक्का देऊ शकता.
काय आहे चॅट जीपीटी? (What is Chat GPT)
चॅट जिपीटी हे एक AI सॉफ्टवेअर आहे. ज्याद्वारे आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही क्षणात जाणून घेऊ शकतो. तसेच, आपली काही कामेही हे टूल करू शकते. या टुलला अल्पावधीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे हे चर्चेत आले आहे. या तंत्रज्ञानाच्या साहय्याने अनेकांनी वेबसाईट्स, अॅप डेव्हलप केले आहेत. ज्याचा वापर करून आपण भाषांतर, इमेल, लेख, ब्लॉगही लिहला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त चॅटबॉटला विषय सांगावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुम्हाला उत्तर मिळेल.