भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारतीय बाजारपेठेकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारत देश जितकी प्रगती करेल तितके ते जसे भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे, तितकेच ते अमेरिकेसाठी आणि जगासाठी फायदेशीर ठरणार आहे असे मत दक्षिण आणि मध्य आशिया संबंधित सहायक विदेशमंत्री डोनाल्ड लू यांनी व्यक्त केले आहे.
जगाच्या एकूण राजकारणात आणि अर्थकारणात दबदबा असलेल्या अमेरिकेकडून हे वक्तव्य आल्यामुळे भारतीय उद्योगपतींनी यावर समाधान व्यक्त केले आहे. जगभरातील देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना भारतात मात्र सामान्य जनतेला याची झळ पोहोचलेली नाहीये. आर्थिक महागाईचा सामना जरी भरात देश करत असला तरी नुकत्याच जाहीर केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई निर्देशांक कमी झाल्याचे म्हटले आहे. अशातच सहायक विदेशमंत्री डोनाल्ड लू यांनी केलेले हे वक्तव्य भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता महत्वाचे आहे.
Want to be part of India's economic miracle, says US Assistant Secretary Donald Lu https://t.co/aZMgXpfx84
— MSN India (@msnindia) April 21, 2023
भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारताची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे. येत्या 10 वर्षात 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे. त्यासाठी वेगवेगळे आर्थिक धोरण राबविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकारने विशेष लक्ष दिले आहे. “आम्हाला भारताच्या आर्थिक भरभराटीचा भाग व्हायचे आहे आणि त्यात सहभाग देखील घ्यायचा आहे”, असे मत पीटीआयशी बोलताना मंत्री डोनाल्ड लू म्हणाले.
सर्वसमावेश आर्थिक विकास करण्यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी भारत सरकारने आखलेल्या उद्दिष्टांचे अमेरिका सरकार पूर्णपणे समर्थन करते असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.भारताची जितकी आर्थिक प्रगती होईल तितकी ती जगासाठी आणि अमेरिकेसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे असेही मत त्यांनी व्यक्त केली. भारताची आर्थिक उद्दिष्ट्ये आणि धोरणे हे हवामानाचा, पर्यावरणाचा विचार करून करून ठरवली जात आहे. येणाऱ्या काळातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन एक शाश्वत विकासाचा आराखडा सरकार तयार करत असून जगभरातील देशांना तो मार्गदर्शक ठरणार आहे असे देखील मंत्री डोनाल्ड लू म्हणाले.
याबाबत पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, भारतातून दरवर्षी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत येत असतात. आजघडीला अमेरिकन विद्यापीठांमध्ये दोन लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना सोईसुविधा पोहोचवण्याचे काम करताना आम्हांला अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सात टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.